तातडीने आपत्ती निवारण समितीची बैठक बोलवा

महापौरांसह नगरसेवकांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी बेळगाव : सध्या वळीव पावसाबरोबरच मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपत्ती निवारण व नियंत्रण समिती बैठक घेणे अत्यावश्यक आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे समस्या निर्माण झाली तरी तातडीने नगरसेवकांची बैठक घेवून त्यावर चर्चा करावी, अशी मागणी महापौर सविता कांबळे यांच्यासह नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. वळिवाचा पाऊस झाल्यामुळे विविध […]

तातडीने आपत्ती निवारण समितीची बैठक बोलवा

महापौरांसह नगरसेवकांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
बेळगाव : सध्या वळीव पावसाबरोबरच मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपत्ती निवारण व नियंत्रण समिती बैठक घेणे अत्यावश्यक आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे समस्या निर्माण झाली तरी तातडीने नगरसेवकांची बैठक घेवून त्यावर चर्चा करावी, अशी मागणी महापौर सविता कांबळे यांच्यासह नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. वळिवाचा पाऊस झाल्यामुळे विविध ठिकाणी पुराची समस्या निर्माण झाली. शहरामध्ये असलेल्या नाल्यांची सफाई होणे गरजेचे आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक झाडे आहेत. ती झाडे हटविणे गरजेचे आहे. याचबरोबर काही वृक्षांच्या फांद्याही हटविल्या पाहिजे. याबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र आचारसंहिता असल्यामुळे पूर नियंत्रण बैठक घेणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे. पण कोणतीही समस्या निर्माण झाली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.
आचारसंहिता असली तरी महानगरपालिकेमधील सभागृह अस्तित्वात असल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केलीच पाहिजे. प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागातील धोकादायक असलेल्या समस्यांची मांडणी करता येणे शक्य आहे. जर बैठक झाली नाही तर कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा घटना घडली तर त्याला सर्वस्वी मनपातील अधिकारीच जबाबदार असतील, असेही यावेळी सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीचे कारण पुढे करून महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना त्या कामाला जुंपले आहे. मात्र त्याचा परिणाम महानगरपालिकेतील दैनंदिन कामांवर होत आहे. काही जणांना निवडणुकीचे काम लावण्यात आले नाही. तरीदेखील ते कारण सांगून काम करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तेव्हा संबंधित कर्मचाऱ्यांना दैनंदिन काम नियमित करावे, अशी सूचना करावी, अशी मागणी महापौरांनी केली. यावेळी नगरसेवक रवी धोत्रे, अॅड. हणमंत कोंगाली, नगरसेवक संदीप जिरग्याळ यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.