येळ्ळूरमध्ये अवतरली अश्वारुढ शिवमूर्ती…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक : संपूर्ण येळ्ळूर भगवेमय येळ्ळूर : येळ्ळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पंचधातू मूर्तीची प्रतिष्ठापना 25 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी रविवारी शहापूर, वडगाव परिसरातून या अश्वारुढ मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘जय शिवाजी, जय भवानी’ असा जयघोष करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी येळ्ळूर येथील सैनिक भवन येथे […]

येळ्ळूरमध्ये अवतरली अश्वारुढ शिवमूर्ती…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक : संपूर्ण येळ्ळूर भगवेमय
येळ्ळूर : येळ्ळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पंचधातू मूर्तीची प्रतिष्ठापना 25 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी रविवारी शहापूर, वडगाव परिसरातून या अश्वारुढ मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘जय शिवाजी, जय भवानी’ असा जयघोष करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी येळ्ळूर येथील सैनिक भवन येथे मूर्ती पोहोचली. सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पंचधातू मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. हिंदवी स्वराज्य युवा संघटनेचे उपाध्यक्ष परशराम पाटील आणि खजिनदार दिनकर घाडी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अध्यक्षस्थानी ग्राम विकास कमिटीचे नारायण कंग्राळकर होते.
17 वर्षांनंतर काम पूर्णत्वाला
विधिवत पूजनानंतर गावातून या शिवमूर्तीच्या भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी झांजपथक, धनगरी वाद्य, टाळ-मृदंगाच्या गजरात व इतर वाद्यांच्या गजर करत भव्य आणि दिव्य अशी ही मिरवणूक काढण्यात आली. गावामध्ये सर्वत्र रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. तब्बल 17 वर्षांनंतर हे काम पूर्णत्वाला आल्याने साऱ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. बाल चमूंसह आबालवृद्ध आणि महिलांनी भगवे ध्वज आणि भगवे फेटे परिधान करून आपला सहभाग दर्शविला. या मिरवणुकीमुळे संपूर्ण गाव भगवेमय झाले होते.  विविध ठिकाणी महाआरतीदेखील करण्यात आली. गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण गावामध्ये मूर्ती आगमनाची जोरदार तयारी सुरू होती. सोमवारी सकाळी 10 वाजता पूजा झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी महिलांनीही मोठ्या संख्येने भाग घेतला होता. डोकीवर कलश घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. उन्हाची तमा न बाळगता सारेजण छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत होते.
मुलांकडून कलागुणांचे प्रदर्शन
प्रत्येक गल्लीतून ही मिरवणूक काढण्यात येत होती. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी’ अशा जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. याचबरोबर मुलींनी तसेच लहान मुलांनी कलागुणांचे प्रदर्शनही सादर केले. विविध चौकांमध्ये हे प्रदर्शन सादर केल्यामुळे ते पाहण्यासाठी साऱ्यांनीच गर्दी केली होती. येळ्ळूर वेशीतून गावामध्ये ही मिरवणूक काढण्यात आली. सैनिक भवन येथे विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याचबरोबर श्री गणेश पूजन, कलश पूजन, ध्वज पूजन, वाद्य पूजन, अश्वारुढ मूर्तीचे पूजन, रथ पूजन करण्यात आले. बैलगाडे सजवून रयतेच्या राजाचा देखावादेखील सादर करण्यात आला होता. अक्षरश: सर्वत्र भक्तिमय आणि जल्लोषी वातावरणात ही मिरवणूक शिस्तबद्धरीत्या काढण्यात आली. प्रारंभी सैनिक सोसायटी, श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था, नवहिंद परिवार, गावातील विविध संघटनांचे पदाधिकारी, नेताजी को-ऑप. सोसायटी, स्वामी विवेकानंद सोसायटी, न्यू नवहिंद मल्टिपर्पज सोसायटी यासह ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्य यांनी या मिरवणुकीचे स्वागत केले. या मिरवणुकीमध्ये हिंदवी स्वराज्य युवा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मजुकर, ग्रा. पं. माजी अध्यक्ष सतीश पाटील, संघटनेचे कार्याध्यक्ष अश्विनकुमार मालुचे, सेक्रेटरी चांगदेव मुरकुटे, राहुल उडकेकर, रमाकांत कोंडुस्कर, ग्रा. पं. उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सदस्य दयानंद उघाडे, परशराम सांबरेकर, प्रसाद कानशिडे, पुंडलिक मजुकर, हणमंत पाटील, सतीश कुगजी, एन. डी. पाटील यांच्यासह  विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणुकीत सहभाग दर्शविला.