हैदराबादने गाठले 58 चेंडूत 166 धावांचे लक्ष्य
लखनौवर 10 गडी राखून दणदणीत विजय : सामनावीर ट्रेव्हिस हेड-अभिषेक शर्माची तुफानी फटकेबाजी
वृत्तसंस्था/ हैदराबाद
सामनावीर ट्रेव्हिस हेड (नाबाद 89) आणि अभिषेक शर्मा (नाबाद 75) यांच्या वादळी खेळीच्या जोरावर हैदराबादने लखनौवर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. लखनौने दिलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग हैदराबादने 10 विकेट आणि 10 षटके राखून सहज केला. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा या दोघांनी अवघ्या 58 चेंडूतच 166 धावांचा पाऊस पाडला. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. पराभवामुळे लखनौची वाटचाल मात्र बिकट झाली आहे.
लखनौने विजयासाठी दिलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. हेड आणि शर्माच्या माऱ्यापुढे लखनौची गोलंदाजी कमकुवत आणि दुबळी दिसत होती. ट्रेव्हिस हेड 30 चेंडूत 89 धावा करून नाबाद राहिला. त्याने 8 चौकार आणि 8 षटकार लगावले. हेडने 296 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. तर अभिषेक शर्माने 28 चेंडूत 8 चौकार व 6 षटकारासह नाबाद 75 धावा केल्या. या जोडीने अवघ्या 9.4 षटकांतच लक्ष्य पूर्ण करत विजयाला गवसणी घातली. दरम्यान, कृष्णप्पा गौतम, यश ठाकूर, रवि बिश्नोई, नवीन उल हक, आयुष बडोनी यांना विकेट घेता आली नाही.
पराभवामुळे लखनौच्या अडचणीत वाढ
प्रारंभी, लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लखनौला दुसऱ्याच षटकात झटका बसला. विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉक अवघ्या दोन धावा काढून तंबूत परतला, त्याला भुवनेश्वरने माघारी धाडले. यानंतर मार्कस स्टोनिसलाही मोठी खेळी करता आली नाही. 3 धावांवर भुवनेश्वरने त्याला बाद केले. अवघ्या 21 धावांवर लखनौचे दोन फलंदाज तंबूत परतले होते. लखनौचा संघ अडचणीत असताना कर्णधार केएल राहुलने कृणाल पंड्याच्या साथीने डावाला आकार दिला. दोघांनी 36 धावांची भागीदारी केली. कृणाल आणि केएल राहुल यांची जोडी जमली असेच वाटत असताना पॅट कमिन्सने केएल राहुलचा अडथळा दूर केला. राहुलने 33 चेंडूमध्ये 29 धावांची संथ खेळी केली. त्यानं आपल्या खेळीमध्ये एक चौकार आणि एक षटकार ठोकला. केएल माघारी परतल्यानंतर कृणाल पंड्याही लगेच तंबूत परतला. त्याने 21 चेंडूत दोन षटकाराच्या मदतीने 24 धावांचे योगदान दिले.
कृणाल व केएल लागोपाठ बाद झाल्याने लखनौची 11.2 षटकामध्ये 4 बाद 66 अशी स्थिती झाली होती. यावेळी निकोलस पूरन आणि आयुष बडोनी यांनी हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत लखनौची धावसंख्या वाढवली. पूरन आणि बडोनी यांनी 52 चेंडूत 99 धावांची शानदार भागीदारी केली. बडोनीने 30 चेंडूत 9 चौकारासह 55 धावा केल्या तर पूरनने 26 चेंडूत नाबाद 48 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने एक षटकार आणि सहा चौकार ठोकले. हैदराबादकडून भुवनेश्वरने 2 तर कमिन्स एक बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 4 बाद 165 (केएल राहुल 29, डिकॉक 2, स्टोनिस 3, कृणाल पंड्या 24, निकोल्स पूरन 26 चेंडूत नाबाद 48, आयुष बडोनी 30 चेंडूत नाबाद 55, भुवनेश्वर कुमार 2 तर पॅट कमिन्स 1 बळी).
सनरायजर्स हैदराबाद 9.4 षटकांत बिनबाद 167 (अभिषेक शर्मा 28 चेंडूत 8 चौकार व 6 षटकारासह नाबाद 75, ट्रेव्हिस हेड 30 चेंडूत 8 चौकार व 8 षटकारासह नाबाद 89).
Home महत्वाची बातमी हैदराबादने गाठले 58 चेंडूत 166 धावांचे लक्ष्य
हैदराबादने गाठले 58 चेंडूत 166 धावांचे लक्ष्य
लखनौवर 10 गडी राखून दणदणीत विजय : सामनावीर ट्रेव्हिस हेड-अभिषेक शर्माची तुफानी फटकेबाजी वृत्तसंस्था/ हैदराबाद सामनावीर ट्रेव्हिस हेड (नाबाद 89) आणि अभिषेक शर्मा (नाबाद 75) यांच्या वादळी खेळीच्या जोरावर हैदराबादने लखनौवर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. लखनौने दिलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग हैदराबादने 10 विकेट आणि 10 षटके राखून सहज केला. ट्रेविस हेड आणि […]