करंबळ-बेकवाड यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी

रविवारी मोठ्या प्रमाणात वाहने दाखल झाल्याने वाहतूक ठप्प : यात्रेचा आनंद अनेकांनी लुटला वार्ताहर /नंदगड खानापूर तालुक्यातील करंबळ व बेकवाड येथील लक्ष्मी यात्रा गेल्या पाच दिवसांपासून मोठ्या धामधुमीत सुरू आहेत. लक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी भाविक व पै-पाहूणे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यामुळे लोकांची सर्वत्र गर्दीच दिसून येत आहे. खानापूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या करंबळ […]

करंबळ-बेकवाड यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी

रविवारी मोठ्या प्रमाणात वाहने दाखल झाल्याने वाहतूक ठप्प : यात्रेचा आनंद अनेकांनी लुटला
वार्ताहर /नंदगड
खानापूर तालुक्यातील करंबळ व बेकवाड येथील लक्ष्मी यात्रा गेल्या पाच दिवसांपासून मोठ्या धामधुमीत सुरू आहेत. लक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी भाविक व पै-पाहूणे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यामुळे लोकांची सर्वत्र गर्दीच दिसून येत आहे. खानापूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या करंबळ गावात लक्ष्मी देवीची यात्रा बुधवार दि. 28 पासून सुरू झाली आहे. यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. गुरुवार दि. 7 मार्च 2024 पर्यंत यात्रा राहणार आहे. आज रविवार यात्रेचा महत्त्वाचा दिवस होता. रविवारी सर्व कार्यालये, शाळांना सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक आज दाखल झाले होते. करंबळ गावच्या लक्ष्मी देवी यात्रेच्या हद्दीत करंबळ, जळगे, रूमेवाडी, होनकल व कौंदल ही पाच गावे येतात. त्यामुळे पाचही गावात माहेरवासिनी, पै-पाहूणे, मित्रपरिवार आपापल्या पाहुण्यांच्या घरी दाखल झाले आहेत. बहुतेक लोक दुचाकी चार-चाकीने दाखल झाल्याने पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. जिथे जागा मिळेल तिथे वाहने लावली जात होती. करंबळ ग्राम पंचायतीपासून गोवा क्रॉसपर्यंत खानापूर-यल्लापूर राज्य मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प होती.
बेकवाड लक्ष्मी यात्रेत वाहनामुळे वाढली गर्दी
खानापूर-यल्लापूर राज्य मार्गालगत नंदगडपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेकवाड येथील लक्ष्मी देवीची यात्रा बुधवार दि. 28 पासून सुरू झाली आहे. बुधवार दि. 6 मार्च 2024 पर्यंत यात्रा उत्सव राहणार आहे. रविवारी यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाल्याने बेकवाडमध्ये सर्वत्र लोकांची गर्दी झाली होती. बेकवाड क्रॉसपासून बेकवाड गावच्या शेवटच्या टोकापर्यंत बेकवाड-इटगी रस्त्यावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. जिकडे मिळेल तिकडे वाहने पार्क करण्यात आली होती. वाहने बाहेर काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम झाले.