प्रेम प्रकरणातून नावगे येथे घरांवर हल्ला
नावगे येथील घटनेने तणाव, बंदोबस्त वाढवला : महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची नावगेला भेट
फिल्मी स्टाईलने हल्ला
दुचाकीवरून आलेल्या 30 हून अधिक तरुणांकडून चार घरांवर दगडफेक
वाहनांचीही मोडतोड तर कार, दुचाकी, टिव्हींची तोडफोड
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गावकरी भयभीत
बेळगाव : प्रेम प्रकरणातून पलायन केलेल्या युगुलाच्या घरावर हल्ला करून तरुणाच्या आईला खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच प्रेम प्रकरणातून चार घरांवर फिल्मी स्टाईलने हल्ला करून तुफान दगडफेक करण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा नावगे येथे ही घटना घडली असून दगडफेकीत घराचे व वाहनांचेही नुकसान झाले आहे. या घटनेनंतर गावात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून ही घटना घडली असून घटनेची माहिती समजताच महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नावगेला भेट देऊन संबंधित कुटुंबीयांना धीर दिला आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणाने स्टेट्स ठेवल्याचे निमित्त होऊन दोन गटांमध्ये बाचाबाची झाली होती. नावगे येथील काही प्रमुखांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले होते. मात्र, बहाद्दरवाडी गावातील काही तरुणांनी आपल्या मित्रांच्या मदतीने सोमवारी रात्री चार घरांवर हल्ला केला. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता.
30 हून अधिक तरुणांकडून चार घरांवर दगडफेक
सोमवारी रात्री नावगे गावातील नागरिक झोपण्याच्या तयारीत असतानाच दुचाकीवरून आलेल्या 30 हून अधिक तरुणांनी चार घरांवर दगडफेक सुरू केली. या तरुणांनी तोंडाला मास्क व कपडा बांधला होता. वाहनांचीही मोडतोड करण्यात आली. कार, दुचाकी, टिव्हींची तोडफोड करण्यात आली. तोपर्यंत स्थानिक नागरिकांना याबद्दल कोणतीच माहिती नव्हती. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गावकरी भयभीत झाले होते. उपलब्ध माहितीनुसार नावगे व बहाद्दरवाडी येथील दोन तरुणांचे याच भागातील एकाच तरुणीवर प्रेम जडले होते. यातील एकाने आपल्या मोबाईलवर स्टेट्स ठेवला होता. त्यानंतर दोन्ही तरुण व त्यांच्या साथीदारांमध्ये रविवार दि. 31 डिसेंबर रोजी रात्री किरकोळ हाणामारीची घटनाही घडली होती. यावेळी नावगे गावातील काही प्रमुख पंचमंडळींनी दोन्ही तरुणांना समज देऊन प्रकरणावर पडदा टाकला होता. बेळगाव ग्रामीण पोलीसही नावगे येथे दाखल झाले होते. पोलिसांनीही संबंधित तरुणांना ताकीद दिली होती. स्टेट्सवरून दोन गावातील तरुणांमध्ये निर्माण झालेला संघर्ष समेटानंतरही संपला नव्हता. बहाद्दरवाडी येथल काही तरुण अन्य गावातील आपल्या मित्रांना बोलावून घेऊन हल्ला केला आहे. सोमवारी दुपारपासून यासाठी तयारी सुरू होती. आपल्यावर दादागिरी केलेल्याचा सूड घेण्याचा जणू त्यांनी जंगच बांधला होता. सोमवारी रात्री उशिरा प्रत्यक्षात हल्ला करण्यात आला.
मारुती हुरकडली यांच्या घरासमोर लावण्यात आलेली कार फोडण्यात आली आहे. बाजूलाच असलेल्या दोन दुचाकीचीही तोडफोड करण्यात आली असून घरात प्रवेश करून टीव्ही व इतर वस्तूंचीही तोडफोड करण्यात आली आहे. आमच्या घरावर कशासाठी हल्ला झाला आहे, हेच आम्हाला कळाले नाही. 31 डिसेंबर रोजी प्रेम प्रकरणातून काही तरुणांमध्ये बाचाबाची झाली होती. नावगे व बहाद्दरवाडी येथील तरुणांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळेच आपल्या घरावर हल्ला झाल्याचे मारुती यांनी सांगितले. याच गावातील शंकर अर्जुन सुतार यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली आहे. त्यांच्या घरासमोर उभी करण्यात आलेली मारुती ओमनी फोडण्यात आली असून दगडफेकीच्यावेळी दरवाजा लावण्यासाठी पुढे आलेल्या मारुती यांच्या छातीवर दगड बसला आहे. त्यामुळे त्यांना दुखापत झाली आहे. रवळनाथ येळ्ळूरकर, बाळू शिगरे, मायाप्पा कर्लेकर, व सुरतकर यांच्या घरावरही दगडफेक करून नुकसान करण्यात आले आहे. हल्ल्याची माहिती गावात सर्वत्र पसरताच नावगे येथील काही गावकऱ्यांनी हल्ला करणाऱ्या तरुणांचा पाठलाग केला. त्यांच्याजवळ जांबिया व इतर शस्त्रेही होती. गावकऱ्यांनी पाठलाग करताच हिरोहोंडा सीडी डिलक्स मोटारसायकल तेथेच टाकून बहाद्दरवाडी येथील तरुणांनी पलायन केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. केवळ अर्धातासात हा संपूर्ण प्रकार घडला असून त्यानंतर गावात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांचे सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, पी. व्ही. स्नेहा, आदी अधिकारी नावगे येथे दाखल झाले. सध्या गावात शांतता असून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बहाद्दरवाडी येथेही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात गुंतलेले तरुण फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
शांततेचे आवाहन
घटनेची माहिती समजताच महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नावगे येथे धाव घेतली. तरुणांनी केलेल्या या प्रकारामुळे पालकांची चिंता वाढली आहे. याचा विचार हे तरुण का करत नाहीत? नावगे व बहाद्दरवाडी दोन्ही गावे आपल्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघात येतात. त्यामुळे दोन्ही गावातील प्रमुख मंडळींनी एकत्र येऊन यावर तोडगा काढावा यासाठी मदत लागल्यास सहकार्य करण्यासाठी आपण तयार आहोत, असे त्यांनी सांगितले. दोन्ही गावच्या नागरिकांनी शांतता पाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.