भटक्या कुत्र्यावर ओतले गरम तेल

कॅम्प परिसरातील हॉटेलचालकाचा निर्दयीपणा बेळगाव : रात्रीच्यावेळी हॉटेलच्या दारात थांबून ग्राहकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला कंटाळून एका हॉटेलचालकाने त्यांच्या अंगावर गरम तेल ओतल्याची घटना गुरुवारी कॅम्प परिसरात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून सामाजिक कार्यकर्ते व प्राणीदया संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलचालकाला धारेवर धरले. कॅम्प येथील एका हॉटेलसमोर रोज भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. हॉटेलमधून बाहेर पडणाऱ्या […]

भटक्या कुत्र्यावर ओतले गरम तेल

कॅम्प परिसरातील हॉटेलचालकाचा निर्दयीपणा
बेळगाव : रात्रीच्यावेळी हॉटेलच्या दारात थांबून ग्राहकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला कंटाळून एका हॉटेलचालकाने त्यांच्या अंगावर गरम तेल ओतल्याची घटना गुरुवारी कॅम्प परिसरात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून सामाजिक कार्यकर्ते व प्राणीदया संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलचालकाला धारेवर धरले. कॅम्प येथील एका हॉटेलसमोर रोज भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. हॉटेलमधून बाहेर पडणाऱ्या ग्राहकांच्या अंगावर ही कुत्री धावून जातात. म्हणून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हॉटेलचालकाने कुत्र्यांच्या अंगावर गरम तेल ओतले. या घटनेत एक कुत्रा दगावला आहे. त्यामुळे प्राणीदया संघटनेचे कार्यकर्ते हॉटेलचालकावर पार भडकले आहेत. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते खानापूर रोडवरील त्या हॉटेलसमोर जमा झाले. त्यांनी हॉटेलचालकाला जाब विचारला.
संतप्त नागरिकांनी धारेवर धरताच जखमी कुत्र्यावर उपचार करण्याची तयारी हॉटेलचालकाने दर्शविली. मात्र, पशुवैद्यांकडे नेण्याआधीच त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आपण त्या कुत्र्याला पुरल्याचे हॉटेलचालकाने कार्यकर्त्यांना सांगितले. खरोखरच जखमी कुत्र्याचा मृत्यू झाला आहे की हॉटेलचालकाने त्याला दूर कोठे तरी सोडून दिले आहे, याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. संबंधित हॉटेलचालकाविरुद्ध तक्रार नोंदविण्यासाठी कार्यकर्ते कॅम्प पोलीस स्थानकात पोहोचले. त्यावेळी या घटनेसंबंधी काही तरी पुरावा द्या, केवळ तुमच्या सांगण्यावरून तक्रार दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. बेळगाव शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मात्र, त्यांचा बंदोबस्त अशा पद्धतीने होऊ नये, तर महानगरपालिकेने तातडीने त्याची जबाबदारी घ्यावी. ही समस्या तीव्र स्वरूप धारण करण्याआधी योग्य ती कृती करावी, अशी मागणी केली जात आहे.