यशस्वीसमोर यजमानांचे लोटांगण

चौथ्या टी 20 सामन्यात झिम्बाब्वेचा 10 विकेट्सनी उडवला धुव्वा : सामनावीर जैस्वालची 93 धावांची धमाकेदार खेळी वृत्तसंस्था/ हरारे यशस्वी जैस्वाल (नाबाद 93) आणि कर्णधार शुभमन गिल (नाबाद 58) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर चौथ्या टी 20 सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा दहा विकेट्सनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या […]

यशस्वीसमोर यजमानांचे लोटांगण

चौथ्या टी 20 सामन्यात झिम्बाब्वेचा 10 विकेट्सनी उडवला धुव्वा : सामनावीर जैस्वालची 93 धावांची धमाकेदार खेळी
वृत्तसंस्था/ हरारे
यशस्वी जैस्वाल (नाबाद 93) आणि कर्णधार शुभमन गिल (नाबाद 58) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर चौथ्या टी 20 सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा दहा विकेट्सनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या टी 20 सामन्यात झिम्बाब्वेने शानदार विजय मिळवला होता. पण त्यानंतर भारताच्या युवा संघाने शानदार कामगिरी करत सलग 3 सामने जिंकत मालिका खिशात घातली.
झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत भारतापुढे 153 धावांचे माफक आव्हान दिले होते. सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी झंझावाती फलंदाजी करत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा धुराळा उडवला. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी 15.2 षटकत 156 धावांची अभेद्य भागीदारी करत भारताला सहज विजय मिळवून दिला.
जैस्वालची तुफान फटकेबाजी, गिलचेही तिसरे अर्धशतक
यशस्वी जैस्वालने वादळी फलंदाजी करत झिम्बाब्वेची गोलंदाजी फोडून काढली. दुसऱ्या बाजूला शुभमन गिलने मात्र संयमी फलंदाजी केली. दोघापुढे झिम्बाब्वेचे गोलंदाज मात्र फिके ठरले. जैस्वालने 176 च्या स्ट्राईक रेटने 53 चेंडूमध्ये नाबाद 93 धावांची खेळी साकारली. जैस्वालच्या या खेळीला 2 षटकार आणि 13 चौकारांचा साज होता. तर शुभमन गिलने मालिकेतील तिसरे अर्धशतक साजरे करताना 39 चेंडूत नाबाद 58 धावा फटकावल्या. या खेळीमध्ये गिलने सहा चौकार आणि दोन षटकार ठोकले. झिम्बाब्वेच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. नाबाद 93 धावांची खेळी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता, उभय संघातील पाचवा व शेवटचा सामना दि. 14 रोजी हरारे येथे खेळवण्यात येईल.
हरारे स्पोर्ट्स क्लॉप्लेसक्वर खेळवण्यात आलेल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेला वेसली मधेवेरे आणि तादिवानाशे मारुमनी यांनी शानदर सुरुवात दिली. या दोघांनी आठ षटकांत 63 धावा जोडल्या. पण नवव्या षटकत अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिली विकेट घेत ही जोडी फोडली. अभिषेक शर्माने मारुमानीला 32 धावांवर बाद केले. त्यानंतर लगेच जम बसलेला मधेवेरेही मोठा फटका मारण्याच्या नादात 25 धावांवर बाद झाला. सलामीचे दोघेही लागोपाठ बाद झाल्यानंतर झिम्बाब्वेच्या धावसंख्येला खिळ बसली. ब्रायन बेनेटही स्वस्तात बाद झाला. 9 धावांवर वॉशिंग्टन सुंदरने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
कर्णधार सिकंदर रजाने मात्र कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी केली. त्याने आधी ब्रायन बॅनेटसोबत 25 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मायर्ससोबत डावाला आकार दिला. दोघांनी 45 धावांची भागीदारी केली. सिकंदर रजाने 28 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि दोन चौकार ठोकले.  डेथ ओव्हर्समध्ये टीम इंडियाने शानदार कमबॅक केले. सिकंदर रजा बाद झाल्यानंतर झिम्बाब्वेचा डाव कोसळला. मेयर्सने 12 धावांचे योगदान दिले. कॅम्पबेल 3 तर मंडाडे 7 धावा काढून बाद झाला. झिम्बाब्वेला 20 षटकांत 7 बाद 152 धावापर्यंत मजल मारता आली. भारताकडून खलील अहमद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. याशिवाय तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक
झिम्बाब्वे 20 षटकांत 7 बाद 152 (मधेवेरे 25, मारुमणी 32, सिकंदर रजा 28 चेंडूत 46, कॅम्पबेल 3, डियॉन मेयर्स 12, खलील अहमद 2 बळी, तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा व शिवम दुबे प्रत्येकी एक बळी).
भारत 15.2 षटकांत बिनबाद 156 (यशस्वी जैस्वाल 53 चेंडूत 13 चौकार व 2 षटकरासह नाबाद 93, शुभमन गिल 39 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारासह नाबाद 58, मुजारबानी, चटारा एकही बळी नाही).
तुषार देशपांडेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
झिम्बाब्वेविरुद्ध टी 20 मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताकडून वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने पदार्पण केले. त्याला आवेश खानच्या जागी संघात संधी मिळाली आहे. 29 वर्षीय तुषारला आयपीएलमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे. त्याने आयपीएलच्या मागील दोन हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना 21 आणि 17 बळी घेतले आहेत. तुषार देशपांडेला जेव्हा पदार्पणाची कॅप मिळाली, तेव्हा त्याच्यासोबत त्याची पत्नी नभा ग•मवारही उपस्थित होती. दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत टीम इंडियासाठी पदार्पण करणारा तुषार देशपांडे हा चौथा खेळाडू आहे. त्याच्याआधी अभिषेक शर्मा, रियान पराग आणि साई सुदर्शन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
टी 20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा भन्नाट विक्रम
टी 20 क्रिकेटच्या इतिहासात भारताने दुसऱ्यांदा 10 विकेटने विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे. याआधी भारताने पहिल्यांदा 2016 मध्ये पहिल्यांदा दहा विकेटने विजय मिळवला होता. त्यावेळीही प्रतिस्पर्धी संघ झिम्बाब्वेच होता. तो सामनाही हरारे येथे खेळवण्यात आला होता.