यजमान भारताच्या मोहीमेला विजयाने प्रारंभ

अमेरिकेचा 29 धावांनी पराभव, सूर्यकुमार यादव ‘सामनावीर’ वृत्तसंस्था / मुंबई 2026 च्या आयसीसी पुरूषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या मोहीमेला यजमान भारताने विजयी सलामीने प्रारंभ केला. मात्र हा विजय मिळविताना नवोदित अमेरिका संघाने कडवा प्रतिकार दर्शविला. ‘सामनावीर’ आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नाबाद 84 धावांच्या कप्तानी खेळीच्या जोरावर भारताला हा सामना जिंकणे शक्य झाले. गोलंदाजीत मोहम्मद सिराज, […]

यजमान भारताच्या मोहीमेला विजयाने प्रारंभ

अमेरिकेचा 29 धावांनी पराभव, सूर्यकुमार यादव ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / मुंबई
2026 च्या आयसीसी पुरूषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या मोहीमेला यजमान भारताने विजयी सलामीने प्रारंभ केला. मात्र हा विजय मिळविताना नवोदित अमेरिका संघाने कडवा प्रतिकार दर्शविला. ‘सामनावीर’ आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नाबाद 84 धावांच्या कप्तानी खेळीच्या जोरावर भारताला हा सामना जिंकणे शक्य झाले. गोलंदाजीत मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांची कामगिरी मोलाची झाली.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना होता. अ गटातील या सामन्यात अमेरिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. पण नवख्या अमेरिकन संघातील गोलंदाजांनी भारताच्या फळीतील फलंदाजांना लवकर बाद करुन चांगलेच दडपण आणले. भारताने 20 षटकांत 9 बाद 161 धावा जमविल्या. त्यानंतर अमेरिका संघाने 20 षटकांत 8 बाद 132 धावांपर्यंत मजल मारली.
 
भारताच्या डावामध्ये दुसऱ्याच षटकातील दुसऱ्याच चेंडूवर अमेरिकेच्या अली खानने स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माला खाते उघडण्यापुर्वीच झेलबाद केले. इशान किसन आणि दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या तिलक वर्माने दुसऱ्या गड्यासाठी 37 धावांची भागिदारी केली. इशान किसनने 16 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 20 तर तिलक वर्माने 16 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 25 धावा जमविल्या. शिवम दुबेला खातेही उघडता आले नाही. रिंकू सिंग आणि हार्दीक पंड्या यांनी अनुक्रमे 6 आणि 5 धावा जमविल्याने भारताची 12.4 षटकात स्थिती 6 बाद 77 अशी केविलवाणी होती. सूर्यकुमार यादवने एका बाजुने भक्कम खेळी करताना अक्षर पटेलसमवेत सातव्या गड्यासाठी 41 धावांची भागिदारी केली. पटेलने 11 चेंडूत 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. अर्शदीप सिंग 4 धावांवर बाद झाला. वरुण चक्रवती डावातील शेवटच्या चेंडूवर धावचीत झाली. कर्णधार यादवने 49 चेंडूत 4 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 84 धावांची खेळी केली. भारताच्या डावामध्ये 7 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. भारताने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 46 धावा जमविताना 4 गडी गमविले. यादवने 36 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक झळकविले. अमेरिकेतर्फे शॅडेली व्हॅन स्केलव्हिकने 25 धावांत 4 गडी बाद केले. अली खान मोहम्मद मोहसीन यांनी प्रत्येकी 1 तर हरमितसिंगने 26 धावांत 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अमेरिकेच्या डावात केवळ तीन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. मिलिंदकुमारने 34 चेंडूत 1 षटकार आण 3 चौकारांसह 34, संजय कृष्णमूर्तीने 31 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह 37, शूभम रांजणेने 22 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 37 धावा जमविल्या. अमेरिकेच्या डावात 7 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. अमेरिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 31 धावा जमविताना 3 गडी गमविले. भारतातर्फे मोहम्मदसिराजने 29 धावांत 3 तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2, वरुण चक्रवर्तीने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: भारत 20 षटकांत 9 बाद 161  (सूर्यकुमार यादव नाबाद 84, तिलक वर्मा 25, इशान किसन 20, अक्षर पटेल 14, शॅडले व्हॅन स्केलव्हिक 4-25, हरमित सिंग 2-26, मोहम्मद मोहसीन व अली खान प्रत्येकी 1 बळी). अमेरिका 20 षटकांत 8 बाद 132 (संजय कृष्णमूर्ती 37, शुभम रांजणे 37, मिलिंदकुमार 34, मोहम्मद सिराज 3-29, अर्शदीप सिंग 2-18, अक्षर पटेल 2-24, चक्रवर्ती 1-24).