भारतीय तिरंदाजांना ऐतिहासिक सुवर्ण

कोरियाला नमवून 14 वर्षांनंतर रिकर्व्ह संघाने मिळविले यश वृत्तसंस्था/ शांघाय भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघाने दक्षिण कोरियाच्या विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन संघाला पराभवाचा धक्का देत तिरंदाजी वर्ल्ड कप स्टेज 1 मध्ये सुवर्णपदक पटकावत नवा इतिहास घडविला. 14 वर्षांच्या खंडानंतर भारतीय तिरंदाजांना हे यश मिळविता आले आहे. भारतीय संघात धीरज बोम्मदेवरा, अनुभवी तरुणदीप राय व प्रवीण जाधव यांचा […]

भारतीय तिरंदाजांना ऐतिहासिक सुवर्ण

कोरियाला नमवून 14 वर्षांनंतर रिकर्व्ह संघाने मिळविले यश
वृत्तसंस्था/ शांघाय
भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघाने दक्षिण कोरियाच्या विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन संघाला पराभवाचा धक्का देत तिरंदाजी वर्ल्ड कप स्टेज 1 मध्ये सुवर्णपदक पटकावत नवा इतिहास घडविला. 14 वर्षांच्या खंडानंतर भारतीय तिरंदाजांना हे यश मिळविता आले आहे. भारतीय संघात धीरज बोम्मदेवरा, अनुभवी तरुणदीप राय व प्रवीण जाधव यांचा तर कोरियन संघात किम वूजिन, किम जे देओन ली वू सेओक यांचा समावेश आहे.
तिरंदाजीतील पॉवरहाऊस असणाऱ्या कोरियावर वर्ल्ड कप अंतिम लढतीत भारतीय तिरंदाजांनी मिळविलेला हा पहिला विजय आहे. या यशामुळे त्यांच्या ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्याच्या आशा बळावल्या आहेत. धीरज, तरुणदीप व प्रवीण या त्रिकुटाने अतिशय संयम राखत बलाढ्या कोरियन्सवर एकही सेट न गमविता विजय मिळविला. 40 वर्षीय तरुणदीप हा ऑगस्ट 2010 मध्ये झालेल्या शांघाय वर्ल्ड कप स्टेज 4 मध्ये भारताने सुवर्णपदक मिळविलेल्या संघाचाही सदस्य होता. त्यावेळी तरुणदीपसोबत राहुल बॅनर्जी, जयंत तालुकदार यांचा समावेश होता. आणि भारताने जपानला हरवून जेतेपद पटकावले होते.
दोन अव्वल संघात येथे झालेल्या अंतिम लढतीत भारताने कोरियावर 5-1 (57-57, 57-55, 55-53) अशी मात केली. या मोसमात त्यांनी पटकावलेले स्टेज 1 वर्ल्ड कपमधील पाचवे सुवर्णपदक आहे. याशिवाय मिश्र संघ अंकिता भगत व धीरज बोम्मदेवरा यांनी मेक्सिकोच्या अलेजांद्रो व्हॅलेन्सिया व मतायस ग्रँडे यांचा 6-0 (35-31, 38-35, 39-37) अशी एकतर्फी मात करीत कांस्यपदक मिळविले.  भारताने या स्पर्धेत एकूण 5 सुवर्ण, 1 रौप्य व एक कांस्यपदक पटकावले आहे. माजी अग्रमानांकित दीपिका कुमारीही पदक मिळविण्याच्या मार्गावर असून तिची वैयक्तिक रिकर्व्हची उपांत्य लढत होत आहे.
पुरुषांनी कोरियन संघाला हरविण्याआधी भारतीय महिला संघाने यापूर्वी जुलै 2013 वर्ल्ड कप मेडेलिन स्टेज 3 व ऑगस्टमध्ये व्रॉक्लॉ स्टेज 4 स्पर्धेत असे दोनदा कोरियन महिला संघाला हरविले होते.
भारताने तिरंदाजीमध्ये आतापर्यंत एकच कोटा मिळविला असून पुरुषांच्या वैयक्तिक विभागात धीरजने हे स्थान मिळविले आहे. तुर्कीतील अंटाल्या येथे 18-23 जूनमध्ये होणारी वर्ल्ड कप स्टेज 3 स्पर्धा ही ऑलिम्पिकसाठी पात्र मिळविण्याची शेवटची स्पर्धा असेल. अव्वल दोन मानांकित संघांना ऑलिम्पिक पात्रता मिळविता न आल्यास त्यांच्या मानांकनाच्या आधारे ऑलिम्पिकमध्ये स्थान दिले जाणार आहे. भारतीय संघ सध्या 231 गुणांसह तिसऱ्या, चीन 241 गुणांसह दुसऱ्या व दक्षिण कोरिया 340 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.