हिंदू सहनशील, म्हणून लोकशाही जिवंत

पंतप्रधान मोदी यांचा लोकसभेत घणाघात, गांधींवर नाव न घेता कठोर प्रहार, वृत्तसंस्था / नवी दिल्ली ‘सहिष्णू हिंदू समाजावर आज विरोधी पक्षांकडून हिंसाचार, असत्य आणि द्वेष पसरविण्याचे अश्लाघ्य आरोप होत असून याची किंमत या पक्षांना भोगावी लागेल, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला आहे. या देशातील हिंदू सहनशील आहे, म्हणून देशात लोकशाही जिवंत आहे, […]

हिंदू सहनशील, म्हणून लोकशाही जिवंत

पंतप्रधान मोदी यांचा लोकसभेत घणाघात, गांधींवर नाव न घेता कठोर प्रहार,
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘सहिष्णू हिंदू समाजावर आज विरोधी पक्षांकडून हिंसाचार, असत्य आणि द्वेष पसरविण्याचे अश्लाघ्य आरोप होत असून याची किंमत या पक्षांना भोगावी लागेल, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला आहे. या देशातील हिंदू सहनशील आहे, म्हणून देशात लोकशाही जिवंत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत होते. आपल्या दोन तासांच्या भाषणात त्यांनी सोमवारी विरोधी पक्षांकडून करण्यात आलेल्या सर्व आरोपांचा यथास्थित समाचार घेतला. तसेच गेल्या 10 वर्षांमध्ये देशाने केलेल्या चहुमुखी विकासाचाही लेखाजोखा मांडला. त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न झुगारत त्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांमधील विसंगती आणि असत्य समागृहासमोर उघडे पेले आहे. तसेच या प्रकारांकडे आता गंभीरपणे पहावे लागणार आहे, असा इशाराही दिला.
विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात धडधडीत खोटी विधाने करुन सभागृहाचा अवमान केला आहे. अग्निवीर योजनेसंदर्भात जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधी नेत्यांनी केला. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत दिली जात नाही, असे धादांत असत्य वक्तव्य या नेत्यांनी केले. हिंदू समाजाला हिंसाचारी संबोधून त्याची मानहानी करण्याचा प्रयत्न केला. हिंदू समाजावर असत्य आरोप करणे आणि त्याचे नीतीधैर्य खचविण्याचा प्रयत्न करणे, हे विरोधी पक्षांचे दीर्घकाळापासून चाललेले कारस्थान आहे. मात्र, या देशातील जनता या असत्य वर्तनाची किंमत त्यांना भोगायला लावल्यावाचून राहणार नाही, अशी टीका त्यांनी भाषणात केली.
देशाच्या प्रगतीचा आढावा
भाषणाच्या प्रारंभी त्यांनी देशाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षांमध्ये करण्यात आलेल्या विकासकामांचा आणि सामाजिक कामांचा आढावा घेतला. पायाभूत सुविधा विकास, गरीबांसाठी घरे, 12 कोटी शौचालये, राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती, देशाला सेमीकंडक्टर उत्पादनाचे केंद्र बनविणे, मोबाईल उत्पादनात देशाने 10 वर्षांमध्ये घेतलेली भरारी, संरक्षण सज्जतेत वाढ, अंतराळ संशोधन कार्यक्रमात प्रगती, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये सरकारने घेतलेले निर्णय, परराष्ट्र धोरणातील सातत्य आणि व्यवहार्यता यामुळे विदेशांमध्ये भारताचे वाढलेले महत्त्व, आगामी पाच वर्षांमध्ये गरीबांसाठी होणार असलेले तीन कोटी घरांचे निर्माणकार्य, नळपाणी योजना इत्यादी बाबींचा त्यांनी उल्लेख केला. तसेच 2047 पर्यंत भारताला विकसीत देश बनविण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला.
काँग्रेसकडून आर्थिक अराजक
देशाची सत्ता मिळविण्यासाठी आतुरलेला काँग्रेस पक्ष आता आर्थिक अराजकतेच्या मार्गावर चालू लागलेला आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने देशाच्या दिवाळखोरीला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. अशी आश्वासने केवळ मते मिळविण्यासाठी देण्यात आली होती. निवडणुकीनंतर अनेक महिलांनी पैसे मागण्यासाठी काँग्रेसच्या कार्यालयांसमोर लावलेल्या रांगा ही या आश्वासनांची परिणीती आहे. अर्थव्यवस्थेचा विचार न करता देण्यात आलेली वारेमाप आश्वासने अंतिमत: अधोगतीच घडवितील. सर्वसामान्य जनतेने सावधपणे या आश्वासनांकडे आणि घडामोडींकडे पाहिले पाहिजे, अशा इशारा त्यांनी दिला.
त्यामुळे विरोधकांचा जळफळाट
भारतीय जनतेने सलग तिसऱ्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर विश्वास दर्शवून पूर्ण बहुमत दिले, हे विरोधकांचे खरे दुखणे आहे. काँग्रेस पक्ष सलग तीनवेळा हरप्रयत्न करुनही 100 चा आकडा ओलांडू शकलेला नाही. भारतीय जनता पक्षाशी आजही तो स्वबळावर संघर्ष करु शकत नाही. यामुळे हा पक्ष निराश झालेला असून खोटे आरोप करु लागला आहे, अशी टिप्पणी त्यांनी भाषणात केली.
बालकबुद्धीचे प्रदर्शन
आपल्या विशेष शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर खोचक टोमणेही मारले. सोमवारी लोकसभेत काही विरोधी पक्षनेत्यांनी ‘बालक बुद्धी’चे प्रदर्शन घडविले. केंद्र सरकारच्या योजनांवर टीका करताना अनेक धादांत खोटी विधाने केली. आपल्या पदाचे गांभीर्य न ओळखून वक्तव्ये केली. यामुळे जनतेत त्यांचीच नाचक्की झाली.  आपले हसे होत आहे, हे त्यांना कळत नाही. हे टाळता आले असते, अशी खोचक टिप्पणी त्यांनी राहुल गांधींचे नाव न घेता केली.
न मिळालेल्या विजयाचा खोटा आनंद
आपल्या 99 जागा निवडून आल्या, याचा काँग्रेसला कोण आनंद झाला आहे. तथापि, हा या पक्षाचा सलग तिसरा पराभव आहे. पराभवातून आलेले नैराश्य लोकांना कळू नये म्हणून पराभवालाच विजय मानण्याचा आविर्भाव केला जात आहे. या निवडणुकीत जनतेने पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच जनादेश दिला. पण तो जनादेशच नाही, असा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. यावरुन त्यांना त्यांच्या पराभवाचे दु:ख किती झाले आहे याची कल्पना येते. आपण सत्तेत नाही, हे आता त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली.
काँग्रेसच्या जागा मित्रपक्षांमुळे
ज्या न झालेल्या विजयाचा टेंभा काँग्रेस मिरवत आहे आणि जागा वाढल्याच्या संदर्भात स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे, ती जागावाढ मित्रपक्षांचा टेकू घेतल्याने झाली आहे. भारतीय जनता पक्षाशी जेथे काँग्रेसचा थेट संघर्ष झाला तेथे काँग्रेसच्या विजयाचे प्रमाण केवळ 26 टक्के आहे. त्यामुळे देशातील सर्वात जुना असणारा आणि सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्ष आज परोपजीवी झाला आहे. या परोपजीवीपणातच त्याला धन्यता मानावी लागत आहे, अशीही टीका त्यांनी केली.
जनतेची दिशाभूल हेच ध्येय
भारताच्या घटनेसंदर्भात आणि केंद्र सरकारच्या योजनांसंदर्भात काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीच्या काळात केला. तरीही जनतेने त्यांना नाकारले. यावरुन असे राजकारण पुढच्या काळात चालणार नाही, हे सिद्ध झाले. तथापि, यातून धडा न घेता विरोधी पक्ष जनतेची दिशाभूल करण्याचे नवे नवे मार्ग शोधत आहे, असा आरोप त्यांनी केला.
नकारात्मक विचारसरणी घातक
2014 पूर्वी देशात एक नकारात्मक वातावरण होते. काही होणार नाही, काही जमणार नाही, अशी भावना होती. मात्र, आमच्या सुयोग्य आणि भारतहितैषी धोरणांमुळे ही वृत्ती नाहीशी झाली आहे. भारताचा युवावर्गात आता नवा उत्साह जागृत झाला असून तो अधिक कार्यरत झाला आहे. त्याची प्रचीती आता प्रत्येक क्षेत्रात अनुभवास येत आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
हाथरस दुर्घटनेसंबंधी शोक व्यक्त
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका धार्मिक सम्मेलनात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविकांचा मृत्यू झाला आहे. हे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतून या घटनेसंबंधी शोक व्यक्त केला. तसेच मृतांच्या नातेवाईकांच्या दु:खात आपण सहभागी असून जखमींना साहाय्य केले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
प्रत्येक आरोपाला चोख प्रत्युत्तर
ड सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेला काँग्रेस पक्ष आता झालाय परोपजीवी
ड सलग तिसरा पराभव पचविता न आल्याने विरोधकांना नैराश्याने घेरले
ड काँग्रेसची आतबट्ट्याची आर्थिक धोरणे आर्थिक अराजकाकडे नेणारी
ड 2047 पर्यंत देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त