हिंडलगा श्री मसणाई देवी यात्रेला उत्साहात प्रारंभ

वार्ताहर /हिंडलगा हिंडलगा गावचे ग्रामदैवत श्री मसणाईदेवीची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी आज मंगळवार दि. 27 रोजी सकाळपासूनच उत्साहात प्रारंभ झाली. सकाळपासूनच मंदिरात पुजा करून ओटी भरण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार असून बुधवारी प्रत्येक मंदिराला ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. गावातील देवस्की पंच अध्यक्ष अनिल पावशे, मल्लाप्पा चौगुले, विनोद नाईक, यल्लाप्पा सरप, रवि […]

हिंडलगा श्री मसणाई देवी यात्रेला उत्साहात प्रारंभ

वार्ताहर /हिंडलगा
हिंडलगा गावचे ग्रामदैवत श्री मसणाईदेवीची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी आज मंगळवार दि. 27 रोजी सकाळपासूनच उत्साहात प्रारंभ झाली. सकाळपासूनच मंदिरात पुजा करून ओटी भरण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार असून बुधवारी प्रत्येक मंदिराला ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. गावातील देवस्की पंच अध्यक्ष अनिल पावशे, मल्लाप्पा चौगुले, विनोद नाईक, यल्लाप्पा सरप, रवि किणेकर, दुर्गाप्पा देवरमनी, चंद्रकांत अगसगेकर, रमेश कडोलकर, मनोहर नाईक, नागेश किल्लेकर, थाबाण्णा शिंदे, सुधाकर शिंदे यांनी यात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत होते. सकाळी दहा वाजता गावातील प्रमुख मार्ग लक्ष्मी गल्ली, मरगाई गल्ली, महादेव गल्ली, रामदेव गल्ली, मांजरेकर नगर, नवीन वसाहत या भागातून पारंपरिक पद्धतीने सजविलेला बैलगाडा फिरविण्यात आला. यावेळी घरोघरी या बैलगाड्याचे पूजन भाविक करीत होते. अग्रभागी तुतारी वादक व वाजंत्री मोठ्या उत्साहात वाद्ये वाजवित होते. गावातील सर्व मंदिरांतून पंचमंडळी पुजा करीत होते.
दुपारनंतर भाविकांची गर्दी
मंदिरापर्यंत जाण्याच्या मार्गावर नारळ, हार, ओटी भरण्याचे साहित्य, खेळणी, मिठाईची दुकाने मोठ्या प्रमाणात येत असल्याने यात्रेकरूंना अडचण होवू नये यासाठी वडगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी प्रयत्न करीत होते. दुपारी 4 नंतर मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत होते. हिंडलगा गावची व्याप्ती उपनगरामुळे वाढल्याने भाविकांची गर्दी होत आहे. यात्रेच्या ठिकाणी विद्युत रोषणाई व लाईटची व्यवस्था केलेली असून पुजारी सुरेश सुणगार व कुटुंबीय योग्यप्रकारे भाविकांना सहकार्य करीत आहेत. गावातील प्रमुख मार्गावरून भाविकांचे स्वागत करण्याचे फलक मोठ्या प्रमाणात लागले असून यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी देवस्की पंच व ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत. उद्या बुधवार दि. 28 रोजी ओटी भरण्यासाठी भाविकांची गर्दी मोठ्या संख्येने होणार असल्याचे पुजाऱ्यांनी ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’शी बोलताना सांगितले.