पती-पत्नीचे नाते हे इतर नातेसंबंधांपेक्षा वेगळे असते. कधी हसणे तर कधी रागावणे खूप सामान्य आहे. अनेक वेळा ते एकमेकांची चेष्टाही करतात. पण कधीकधी हा विनोद जोडीदाराला दुखावतो आणि घटस्फोटापर्यंत पोहोचतो. अशीच एक घटना मुंबईतून समोर आली आहे. जिथे पत्नीला सेकंड हँड म्हणणे पतीला महागात पडले. दुखावलेल्या पत्नीने थेट कोर्टात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने पतीला पत्नीला नुकसानभरपाई म्हणून 3 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
अमेरिकन नागरिकाने मुंबई उच्च न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. कोर्टाने म्हटले आहे की, पत्नीवरील घरगुती हिंसाचाराचा तिच्या आत्मसन्मानावर परिणाम होतो. हनीमून दरम्यान पतीने महिलेवर अत्याचार केल्याचे न्यायालयाने नमूद केले. तो तिला ‘सेकंड हँड’ म्हणायचा. यामुळे हायकोर्टाने याचिकाकर्त्या पतीला फटकारले. न्यायालयाने पतीला त्याच्या वेगळ्या राहत असलेल्या पत्नीला तीन कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपे अमेरिकन नागरिक असून दोघांनी 3 जानेवारी 1994 रोजी मुंबईत लग्न केले होते. त्यांनी अमेरिकेत दुसरे लग्न देखील केले, परंतु 2005-2006 च्या सुमारास ते मुंबईत आले आणि एकत्र राहू लागले. पत्नी मुंबईत एका कंपनीत कामाला होती. यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याने पत्नी माहेरी गेली.
2014-15 मध्ये पती पुन्हा अमेरिकेला गेला आणि 2017 मध्ये तिथल्या कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली. याप्रकरणी न्यायालयाने पत्नीला नोटीसही पाठवली आहे. यानंतर पत्नीने मुंबई दंडाधिकारी न्यायालयात घरगुती हिंसाचार (डीव्ही) कायद्यांतर्गत याचिकाही दाखल केली. दरम्यान 2018 मध्ये अमेरिकन कोर्टाने या जोडप्याच्या घटस्फोटाला मंजुरी दिली.
दुसरीकडे 2023 मध्ये मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने आदेश देताना ही महिला घरगुती हिंसाचाराची बळी असल्याचे मान्य केले. न्यायालयाने पतीला 2017 पासून पत्नीच्या देखभालीसाठी दरमहा 1,50,000 रुपये, तसेच तीन कोटी रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर पतीने ट्रायल कोर्टाच्या आदेशाला सत्र न्यायालयात आव्हान दिले, जिथे त्याची याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर पतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पण पतीला तिथेही धक्का बसला आणि उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे.
पत्नीने पतीवर अनेक आरोप केले आहेत. दोघेही हनिमूनसाठी नेपाळला गेले असताना पतीने तिला ‘सेकंड हँड’ म्हणत मानसिक छळ केल्याचे पीडितेने सांगितले. महिलेची पूर्वीची एंगेजमेंट काही कारणास्तव तुटली होती, त्यामुळे पती तिला ‘सेकंड हँड’ म्हणत चिडवत असे. अमेरिकेत गेल्यावर पतीने तिचा छळ सुरू केला. एवढेच नाही तर महिलेच्या चारित्र्यावरही संशय घेतला. तसेच त्याने पीडितेला मारहाण केली आणि तिला कबूल करण्यास भाग पाडले.
पीडितेने न्यायालयात सांगितले की, तिचे आई-वडील 2000 मध्ये अमेरिकेला गेले होते, तेव्हा तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिच्या पतीने तिला वडिलांसोबत राहू देण्यास नकार दिला. भारतात परतल्यानंतरही पतीने तिचे इतर पुरुषांशी संबंध असल्याचा आरोप करून तिचा मानसिक छळ केला.
महिलेचा आरोप आहे की 2008 मध्ये तिच्या पतीने तिला उशीने गुदमरण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर ती आईच्या घरी राहायला गेली. पीडितेने पतीवर दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा आरोपही केला आहे. नोव्हेंबर 1999 मध्ये, पतीने कथितपणे तिला इतकी क्रूर मारहाण केली की शेजाऱ्यांनी आवाज ऐकला आणि स्थानिक पोलिसांना बोलावले, ज्यांनी पतीला घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक केली.
2017 पासून पतीने पत्नीला देखभालीसाठी 1.5 लाख रुपये आणि दोन महिन्यांत 3 कोटी रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. याशिवाय पतीला 50 हजार रुपयांचा खर्च उचलण्यास सांगितले आहे.