हिजबुल्लाहचा 300 हून अधिक रॉकेट्सचा मारा, प्रत्युत्तरात इस्रायलचा लेबनॉनवर हल्ला
इस्रायलच्या लष्करानं त्यांची लढाऊ विमानं लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांवर हल्ले करत असल्याची माहिती दिली आहे. इस्रायली डिफेन्स फोर्स (IDF) चे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितलं की, धोक्यांचा विचार करता स्वसंरक्षणासाठी ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळेच दहशतवादी तळांना लक्ष्य केलं गेलंय.
लेबनॉनमध्ये हल्ला करण्यापूर्वी हिजबुल्लाहचं तळ असलेल्या परिसरातून सामान्य नागरिकांना बाजूला जाण्याच्या सूचना दिल्याचंही इस्रायलनं सांगितलं.गेल्या महिन्यात हिजबुल्लाहच्या कमांडरच्या मृत्यूनंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केल्याचा दावा इस्रायलनं केला.
इस्रायलच्या उत्तरेकडील भागात सायरनचे आवाज
आज (25 ऑगस्ट) इस्रायलच्या उत्तरेकडील भागात रॉकेट हल्ल्यांमुळे सायरन वाजत असल्याचं ऐकू येत होतं.
यात कोणत्याही प्रकारची हानी झाल्याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.
हिजबुल्लाहनं ‘लेबनॉनकडून इस्रायलच्या दिशेनं 150 रॉकेट हल्ले केले’ अशी माहिती आयडीएफनं दिली.
डॅनियल हगारी यांनी सांगितलं की, ‘इस्रायली एअर फोर्सच्या अनेक विमानांनी दक्षिण लेबनानच्या अनेक भागांना लक्ष्य केलं आहे.’मात्र, हिजबुल्लाहनं म्हटलं की, त्यांनी 320 पेक्षा जास्त कत्युशा रॉकेटचे हल्ले केले आहेत. त्यानं इस्रायलच्या 11 लष्करी तळं आणि बराक यांना लक्ष्य केलं आहे.
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू काय म्हणाले ?
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संरक्षण मंत्रिमंडळाची तातडीनं बैठक बोलावली असल्याचं म्हटलं आहे.बैठकीपूर्वी नेतन्याहू म्हणाले की, “आम्ही आमच्या देशाचं संरक्षण करण्यासाठी उत्तरेत सामान्य नागरिकांना घरी परतवण्यासाठी आणि नियम लागू करण्यासाठी दृढ निश्चय केला आहे. जो आमचं नुकसान करेल, त्याला तसंच उत्तर देऊ.”
इस्रायलवर हल्ला करण्यासाठी हिजबुल्लाहनं जी तयारी केली होती, त्याचा तपास करण्यासाठी आमच्या लष्करानं रात्रं-दिवस काम केलं आहे, असंही नेतन्याहू म्हणाले.आमचं लष्कर सज्ज होतं, त्यामुळं आम्ही हिजबुल्लाहचे रॉकेट नष्ट करण्यात यशस्वी होऊ शकतो, असंही ते म्हणाले.
हिजबुल्लाहच्या तळांवर हल्ला करण्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये सतर्कता म्हणून 48 तासांसाठी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री योआव्ह गॅलेंट तेल अविवमध्ये IDF च्या लष्करी तळावर ‘परिस्थिता हाताळत’ आहेत, असं नेतन्याहूंच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
तर हिजबुल्लाहनं एका निवेदनात इस्रायलवर हल्ल्याचं कारण सांगितलं आहे. ‘ज्यू शासनानं केलेल्या निर्घृण हल्ल्यात फौद शाकीर शहीद झाले होते’, त्याला उत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं ते म्हणाले.जुलै महिन्यात लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये वरिष्ठ सैन्य कमांडर शाकीर इस्रायली हवाई हल्ल्यात मारले गेले होते.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात हमासनं इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर गाझामध्ये युद्ध सुरू झालं. त्यानंतर लेबनॉनमधील हिजबुल्लाहनं सातत्यानं इस्रायवर हल्ले केले आहेत. हमासप्रमाणेच हिजबुल्लाहलाही इराणचा पाठिंबा आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published By- Priya Dixit