हेन्रिच क्लासेनची कसोटीमधून निवृत्ती

द. आफ्रिकेला मोठा धक्का : वनडे , टी-20 मध्ये खेळत राहणार असल्याचे स्पष्टीकरण वृत्तसंस्था/ केपटाऊन दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज हेन्रिच क्लासेनने कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 32 वर्षीय क्लासेनने आफ्रिकेसाठी चार कसोटी सामने खेळले आहेत. हेन्रिचने ऑक्टोबर 2019 मध्ये रांची येथे भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले. […]

हेन्रिच क्लासेनची कसोटीमधून निवृत्ती

द. आफ्रिकेला मोठा धक्का : वनडे , टी-20 मध्ये खेळत राहणार असल्याचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था/ केपटाऊन
दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज हेन्रिच क्लासेनने कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 32 वर्षीय क्लासेनने आफ्रिकेसाठी चार कसोटी सामने खेळले आहेत. हेन्रिचने ऑक्टोबर 2019 मध्ये रांची येथे भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले. तब्बल 4 वर्षांनंतर त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यातच आफ्रिकेचा स्टार फलंदाज डीन एल्गारने कसोटीमधून निवृत्ती स्वीकारली होती. एल्गारपाठोपाठ क्लासेनने घेतलेल्या या तडकाफडकी निर्णयाने आफ्रिकन संघाला मोठा धक्का बसला आहे.
क्लासेन म्हणाला, दीर्घ काळ विचार केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. कसोटी हा माझा आवडता फॉरमॅट आहे. मी मैदानावर आणि मैदानाबाहेर ज्या लढायांचा सामना केला त्यामुळे मी आज क्रिकेटपटू आहे. हा एक चांगला प्रवास आहे आणि मला आनंद आहे की मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकलो. माझ्या मते कसोटी कॅप मला दिलेली सर्वात महागडी कॅप होती. माझ्या कसोटी कारकिर्दीत ज्यांनी मोलाची भूमिका बजावली आणि ज्यांनी मला एक क्रिकेटर म्हणून आकार दिला त्या सर्वांचे आभार. आफ्रिकन क्रिकेट बोर्ड व चाहत्यांनी मला कसोटी खेळताना खूप प्रेम दिले, या सर्वांचेही त्याने यावेळी आभार मानले.
क्लासेन आफ्रिकेसाठी केवळ चार कसोटी सामने खेळला. या चार सामन्यात त्याने 104 धावा केल्या, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 35 होती. कसोटी कारकीर्द छोटी असली तरी वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी मोलाची भूमिका बजावली आहे. क्लासेन आफ्रिकेसाठी आतापर्यंत 54 वनडे आणि 43 टी-20 सामने खेळला आहे. वनडेमध्ये त्याने 1723 धावा आणि टी-20 मध्ये 722 धावा केल्या आहेत. कसोटीमधून त्याने निवृत्ती स्वीकारली असली तरी वनडे व टी-20 क्रिकेटमध्ये मात्र खेळत राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.