सोमवारी शहरात कोसळधारेमुळे पाणीच पाणी

फोर्ट रोड-जुन्या धारवाड रोडवर नाल्याचे पाणी दुकानांमध्ये : व्यापाऱ्यांचे नुकसान : झाडे कोसळल्याने वीजपुरवठा खंडित बेळगाव : पावसाची संततधार सुरूच असून सोमवारी दिवसभरात पुन्हा एकदा बेळगाव शहरासह तालुक्यात धुवाधार पाऊस झाला. फोर्ट रोड, जुना धारवाड रोड व कॉलेज रोड येथे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले. नाल्याचे पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर आल्याने वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. धारवाड रोड येथील नाल्याचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून […]

सोमवारी शहरात कोसळधारेमुळे पाणीच पाणी

फोर्ट रोड-जुन्या धारवाड रोडवर नाल्याचे पाणी दुकानांमध्ये : व्यापाऱ्यांचे नुकसान : झाडे कोसळल्याने वीजपुरवठा खंडित
बेळगाव : पावसाची संततधार सुरूच असून सोमवारी दिवसभरात पुन्हा एकदा बेळगाव शहरासह तालुक्यात धुवाधार पाऊस झाला. फोर्ट रोड, जुना धारवाड रोड व कॉलेज रोड येथे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले. नाल्याचे पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर आल्याने वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. धारवाड रोड येथील नाल्याचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांमधून करण्यात आली. सोमवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे सायंकाळी 4 नंतर जुना धारवाड रोड ओव्हरब्रिजखाली पाणी साचू लागले. उड्डाणपुलाच्या शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा येऊन साचल्याने नाल्यातील पाणी रस्त्यावर येऊ लागले. प्रवाह मोठा असल्याने काही वेळातच रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी आल्याने उड्डाणपुलापासून होसूरकडे जाणारी वाहतूक खोळंबली. केवळ अवजड वाहने या पाण्यातून ये-जा करत होती. त्यामुळे ओव्हरब्रिजवर तब्बल अर्धा ते पाऊण तास वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
नाल्यातील पाणी रस्त्यासोबत परिसरात पसरले. पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे आसपासच्या दुकानांमध्ये पाणी शिरले. धारवाड रोड परिसरात ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित अनेक लहान-मोठी दुकाने आहेत. वाहनांच्या बॅटरी, दुरुस्ती यासह इतर महागडे साहित्य पावसाच्या पाण्यामुळे खराब झाले. धोका टाळण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाचा वीजपुरवठा बंद केला. रविवारीही थोड्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने सोमवारी सकाळी महापालिकेकडून जेसीबीच्या साहाय्याने नाल्याची सफाई करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, नेमका कचरा कोठे साचला आहे, हे न कळाल्याने काम अर्धवट सोडण्यात आले.
कॉलेज रोडवर पाणीच पाणी
यंदे खूटपासून कॉलेज रोडपर्यंतच्या डाव्या बाजूच्या गटारीत कचरा अडकल्याने गटारीचे पाणी ओव्हर फ्लो होऊन बाहेर पडत होते. गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने कॉलेज रोड, लिंगराज कॉलेज प्रवेशद्वारानजीक पावसाचे पाणीच पाणी झाले. यामुळे महाविद्यालयातून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्याचा फटका बसला. त्यामुळे धर्मवीर संभाजी चौकातून चन्नम्मा चौकाकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.
जिल्ह्यात सर्वाधिक खानापुरात
रविवारपेक्षा सोमवारी पावसाचा जोर कमी असला तरी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. रविवारी बेळगावमध्ये 40 मि. मी. पाऊस झाला होता. तर सोमवारी 33.2 मि. मी. इतका पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर खानापूर तालुक्यात रविवारी 51.2 मि.मी. पाऊस झाला होता. तर सोमवारी 48 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा खानापूर तालुक्यात झाला असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
अनेक ठिकाणी झाडांची पडझड
रविवारी व सोमवारी झालेल्या पावसामुळे बेळगाव शहराच्या उत्तर भागात अधिकाधिक झाडे कोसळली. बिम्स, कोर्ट परिसर, अयोध्यानगर, सदाशिवनगर, कणबर्गी रोड, जिल्हा क्रीडांगण रोड परिसरामध्ये वृक्ष विद्युत वाहिन्यांवर कोसळले. यामुळे शहरातील विविध भागात सोमवारी वीजपुरवठा ठप्प होता. त्याचबरोबर सदाशिवनगर दहावा  क्रॉस येथे मोठा वृक्ष कोसळल्याने दुपारपर्यंत वीजपुरवठा बंद होता. या परिसरात तातडीने इतर मार्गाने वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता.
अभिषेक लोहार (व्यापारी)
छत्रपती शिवाजी उड्डाण पुलाच्या शेजारी नाल्यामध्ये कचरा अडकल्याने नाल्याचे पाणी ओव्हरफ्लो होऊन बाहेर पडले. हे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. आमचा वाहनांच्या बॅटऱ्यांचा व्यवसाय असून बॅटऱ्या पाण्यामध्ये भिजल्या आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
संतोष यलजी (गॅरेज मेकॅनिक)
अचानक पावसाचे पाणी भरू लागल्यामुळे काही समजण्याच्या आतच दुकानामध्ये तीन ते चार फूट पाणी शिरले. त्यामध्ये दुरुस्तीसाठी लागणारे कॉम्प्रेसर तसेच इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. वरचेवर असे नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण? महानगरपालिकेने या समस्येकडे लक्ष देऊन नाल्याची स्वच्छता करावी.