पश्चिम भागासह मच्छे-पिरनवाडी परिसरात जोरदार पाऊस
ढगांच्या गडगडाटासह पाऊस : बऱ्याच ठिकाणी गटारीतून पाणी रस्त्यावर; नागरिकांची तारांबळ, पावसामुळे गारवा
वार्ताहर /किणये
तालुक्याच्या पश्चिम भागासह मच्छे-पिरनवाडी व उद्यमबाग परिसरात शुक्रवारी दुपारी जोरदार वळिवाचा पाऊस झाला. या पावसामुळे काही ठिकाणी गटारीतून पाणी थेट रस्त्यावर आले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. वादळी वाराही आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात उष्णतेचे प्रमाण अधिक वाढले आहे. यामुळे सारे जण हैराण झालेले आहेत. गेले दोन-तीन दिवसही कडक ऊन पडले होते. यामुळे घरातून बाहेर पडणे साऱ्यांनाच अवघड झाले होते. अशा उष्णतेच्या वातावरणात शुक्रवारी दुपारी या भागात पाऊस झाल्यामुळे हवामानात थोड्या प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. मच्छे व पिरनवाडी परिसरात अधिक पाऊस झाला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारींची योग्यप्रकारे साफसफाई करण्यात आली नव्हती. यामुळे पाऊस आला आणि गटारीमध्ये पाणी गेले. या गटारी तुंबल्या आणि गटारीतील सांडपाणी व केरकचरा थेट रस्त्यांवर आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली पहावयास मिळाली.
दुकानांमध्ये शिरले पाणी पिरनवाडी पाटील गल्लीच्या
कॉर्नरला काही दुकानांमध्येही पाणी शिरले. यामुळे सदर दुकानदार व व्यावसायिकांना दुकानात आलेले पाणी काढताना बराच त्रास सहन करावा लागला. मच्छे गावातही बऱ्याच ठिकाणी गटारीच्या साफसफाईकडे दुर्लक्ष झालेले आहे. यामुळे पावसाचे पाणी गटारीतून आल्यामुळे सांडपाणी व केरकचरा बऱ्याच ठिकाणी दिसून आला. त्यामुळे आपापल्या घरात समोर आलेला केरकचरा काढताना नागरिक दिसत होते. उद्यमबाग परिसरातील बेळगाव-पणजी महामार्गावरील बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेले दिसून आले. किणये, कर्ले, बहाद्दरवाडी, जानेवाडी, बिजगर्णी, नावगे, बेळगुंदी, बामणवाडी, बाळगट्टी, संतिबस्तवाड, वाघवडे भागात सुमारे अर्धा तासभर पाऊस झाला. पावसाचा अंदाज नसल्यामुळे व कडक उन्हात सारेजण बाहेर पडल्यामुळे या पावसातून घरी जाताना भिजतच गेले.
वीट व्यावसायिकांचे नुकसान
सध्या उष्णतेमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे यापेक्षाही दमदार पाऊस हवा होता, असे बऱ्याच नागरिकांचे म्हणणे आहे. देसूर, नंदीहळळी भागात विटांचे उत्पादन अधिक प्रमाणात घेण्यात येते. या पावसामुळे कच्च्या विटा भिजलेल्या आहेत. त्यामुळे वीट व्यावसायिकांचे नुकसान झाले. या पावसामुळे वीट व्यावसायिकांची विटांवर ताडपत्री, प्लास्टिक कागद झाकण्यासाठीची धडपड दिसून आली. तालुक्याच्या पश्चिम भागात काजू बागायती मोठ्या प्रमाणात आहेत. दमदार पाऊस झाला तर काजू उत्पादनात वाढ होऊ शकते, असे काजू उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच
उष्णतेमुळे व पावसाअभावी काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तसेच शिवारातील विहिरी व कूपनलिका यांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. सध्यातरी पाण्याची समस्या दूर होण्यासाठी दमदार आणि यापेक्षाही मोठ्या पावसाची आपल्याला प्रतीक्षा आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
Home महत्वाची बातमी पश्चिम भागासह मच्छे-पिरनवाडी परिसरात जोरदार पाऊस
पश्चिम भागासह मच्छे-पिरनवाडी परिसरात जोरदार पाऊस
ढगांच्या गडगडाटासह पाऊस : बऱ्याच ठिकाणी गटारीतून पाणी रस्त्यावर; नागरिकांची तारांबळ, पावसामुळे गारवा वार्ताहर /किणये तालुक्याच्या पश्चिम भागासह मच्छे-पिरनवाडी व उद्यमबाग परिसरात शुक्रवारी दुपारी जोरदार वळिवाचा पाऊस झाला. या पावसामुळे काही ठिकाणी गटारीतून पाणी थेट रस्त्यावर आले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. वादळी वाराही आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या […]