Satara : सातारा-कास रोडवर डंपर-एसटी बसची जोरदार धडक
अंधारी गावानजीक अपघात, १५हून अधिक प्रवासी जखमी
कास : सातारा-कास-बामणोली रोडवर अंधारी गावानजीक नागमोडी वळणावरील अरुंद घाटरस्त्यावर समोरून आलेल्या डंपरने एसटी बसला जोराची धडक दिली. यामध्ये १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले.
रविवारी दुपारी चारच्या सुमारास सातारच्या दिशेने निघालेल्या तेटली-सातारा एसटी बसला अंधारी-कास मार्गावरील घाटरस्त्यावर समोरून खडी भरून आलेल्या डंपरने समोरासमोर धडक दिली. यामध्ये बस शंभर ते दोनशे फुट मागे फरफटत जाऊन झाडावर अडकल्याने पुढील अनर्थ टळला; अन्यथा बस व डंपर दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली असती.
या अपघातात बसमधील २९ पैकी १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. घटनास्थळी एसटी प्रशासन व पोलीस दाखल झाले होते.
रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष
सातारा-कास-बामणोली मार्गावरील कास ते अंधारी फाटा हा नागमोडी वळणांचा घाटरस्ता आहे. झाडाझुडपांनी वेढलेला अरुंद मार्ग, खचलेली साईटपट्टी व ओव्हरलोड भरधाव जाणारी मोठी बाडने येथे अपघाताला निमंत्रण देत आहेत. रस्त्याच्या दुरूस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची नेहमीच उदासीनता राहिली आहे. समोरून आलेले वाहन काही ठिकाणी दिसत नाही. ओव्हरटेक करताना साईटपट्टीच सुरक्षित नसल्याने अपघाताची भीती आहे.
