तोडणी कामगार फडात…साखर कारखाने जोमात

जिल्ह्यात ऊसतोडणी कामाला वेग : कारखान्यांकडून उसाची पळवापळवी सुरू बेळगाव : साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे ऊसतोडणीला वेग आला आहे. जिल्ह्यात 26 साखर कारखान्यांपैकी 20 हून अधिक साखर कारखान्याचे गाळप सुरू झाले आहे. त्यामुळे ऊसतोडणी कामगार फडात अन् साखर कारखाने जोमात असे चित्र पहावयास मिळत आहे. गतवर्षी उसाची लागवडही अधिक प्रमाणात झाली […]

तोडणी कामगार फडात…साखर कारखाने जोमात

जिल्ह्यात ऊसतोडणी कामाला वेग : कारखान्यांकडून उसाची पळवापळवी सुरू
बेळगाव : साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे ऊसतोडणीला वेग आला आहे. जिल्ह्यात 26 साखर कारखान्यांपैकी 20 हून अधिक साखर कारखान्याचे गाळप सुरू झाले आहे. त्यामुळे ऊसतोडणी कामगार फडात अन् साखर कारखाने जोमात असे चित्र पहावयास मिळत आहे. गतवर्षी उसाची लागवडही अधिक प्रमाणात झाली आहे. त्यामुळे साहजिकच यंदा उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षाही कारखान्यांना आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि आहार पद्धतीतील बदलामुळे अलीकडे साखरेला झपाट्याने मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे साखर उत्पादनात देखील वाढ होत आहे. गतवर्षी जिल्ह्यात 13.21 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ऊस क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे 15 टनांहून अधिक साखरेचे उत्पादन होईल, असा विश्वास देखील कृषी खात्याने वर्तविला आहे.
ऊस पळविण्यासाठी कारखानदारांचा संघर्ष
उसाच्या एफआरपी किमतीबाबत मध्यंतरी आंदोलन हाती घेण्यात आले होते. त्यामुळे ऊसतोडणीला उशीर झाला होता. आता सर्वच साखर कारखान्यांच्या चिमण्या पेटल्या आहेत. मात्र, यंदा पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने उत्पादनात घट होण्याची चिंताही व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, लवकर ऊस पळविण्यासाठी कारखानदारांचा संघर्ष सुरू आहे. शिवाय तोडणी कामगारही महाराष्ट्रातून दाखल झाले आहेत. त्यामुळे ऊसतोडणीला वेग येऊ लागला आहे. जिल्ह्यातील बेळगाव, चिकोडी, अथणी, खानापूर भागात उसाचे क्षेत्र आहे. चिकोडीत सर्वाधिक उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे एका चिकोडी तालुक्यात 12 लाख टनाहून अधिक साखरेचे उत्पादन होते.
ऊस वजनात तूट
मागील चार वर्षात अतिवृष्टीमुळे ऊस पिकाला फटका बसला होता. नदीकाठी पावसाचे पाणी साचून राहिल्याने ऊस खराब झाला होता. त्यामुळे ऊसतोडणीही लांबणीवर पडली होती. मात्र, यंदा ऊसतोडणी वेळेत सुरू झाली असली तरी पावसाअभावी ऊस पिकाला फटका बसला आहे. उसाच्या वजनात तूट येऊ लागली आहे, अशी तक्रारही उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.
काटामारीमुळे शेतकरी दुहेरी संकटात
सरकारने ऊस वजन व्यवस्थित द्यावे, अशा सूचना कारखानदारांना केल्या आहेत. मात्र, काही कारखान्यांकडून वजनात फसवणूक केली जात असल्याचेही शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. आधीच उत्पादनात घट झाली आहे, त्यातच कारखान्याकडून काटामारी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
बेळगाव जिल्हा ऊस उत्पादनात आघाडीवर
राज्यात बेळगाव जिल्हा ऊस उत्पादनात आघाडीवर आहे. गतवर्षी 13.21 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा देखील साखर उत्पादन समाधानकारक होईल. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. शिवाय गळीत हंगामाला देखील वेळेत प्रारंभ झाला आहे.
-शिवनगौडा पाटील (सहसंचालक कृषी खाते)