तालुक्यात सुगी हंगामाची लगबग

सर्व सुगी हंगामातील कामे एकदाच आल्यामुळे मजुरांची टंचाई : भुईमूग काढणीलाही सुरुवात वार्ताहर/किणये  तालुक्यात सुगी हंगामाला सुरुवात झाली आहे. शेत शिवारमध्ये भात कापणी, मळणी, रताळी व बटाटा काढणी आदींची लगबग दिसून येत आहे. सर्वच सुगी हंगामातील कामे एकदाच आल्यामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. रविवारी सुगी हंगामासाठी सर्व शिवारे फुलून दिसत होती. यंदा दिवाळीच्या कालावधीत परतीचा पाऊस सुरू होता. त्यामुळे सुगी हंगामातील कामे खोळंबली होती. […]

तालुक्यात सुगी हंगामाची लगबग

सर्व सुगी हंगामातील कामे एकदाच आल्यामुळे मजुरांची टंचाई : भुईमूग काढणीलाही सुरुवात
वार्ताहर/किणये 
तालुक्यात सुगी हंगामाला सुरुवात झाली आहे. शेत शिवारमध्ये भात कापणी, मळणी, रताळी व बटाटा काढणी आदींची लगबग दिसून येत आहे. सर्वच सुगी हंगामातील कामे एकदाच आल्यामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. रविवारी सुगी हंगामासाठी सर्व शिवारे फुलून दिसत होती. यंदा दिवाळीच्या कालावधीत परतीचा पाऊस सुरू होता. त्यामुळे सुगी हंगामातील कामे खोळंबली होती. तसेच पावसामुळे शेतशिवारात पाणी साचले होते. यामुळे भात कापणीची कामे लांबणीवर पडली. सध्या परतीच्या पावसाने उघडीप दिली आहे. तसेच सुगी हंगामासाठी पोषक वातावरण असल्यामुळे सुगी साधण्यासाठी धावपळ सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वीच भात कापणीला आले होते. मात्र पावसामुळे ते लांबणीवर पडले. शेतकरी सध्या भात कापणी जोमाने करत आहेत. तसेच भात कापणीनंतर काही शेतकरी हुडवे घालून शिवारात ठेवत आहेत.
तर काही शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मळणी करताना दिसत आहेत. इंद्रायणी, बासमती, सोना मसुरी, सुपर सोना, शुभांगी, भाग्यलक्ष्मी, माधुरी, चिंटू आदी प्रकारची भातपिके शेतकऱ्यांनी घेतलेली आहेत. दहा-बारा दिवसांपासून तालुक्याच्या विविध गावातील शेतकऱ्यांनी भुईमूग काढणीला सुरुवात केली. सध्या भुईमूग काढणी अंतिम टप्प्यात आहे.भातकापणीसाठी महिला शेतमजुराला एका दिवसाला अडीचशे ते तीनशे रुपये देण्यात येत आहेत. भागानुसार या मजुरीत बदल आहे. तसेच ट्रॅक्टरला एका तासाला मळणीसाठी सहाशे ते सातशे रुपये भाडे देण्यात येत आहे. पूर्वी बैलगाडी व जनावरे जुंपुन मळणी करण्यात येत होती. अलीकडे मात्र बैलगाडी व जनावरांच्या साह्याने मळणी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बहुतांशी शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मळणी करत आहेत.भात कापणी व मळणीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे काही शेतकरी एकमेकांच्या शिवारातील कामे करून सहकार्य करून सुगी हंगाम साधताना दिसत आहेत.
यंदा बटाटा लागवड कमी, रताळी लागवड वाढली
दरवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामात बटाटा लागवड कमी प्रमाणात करण्यात आली आहे. तर रताळी लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे त्या खरीप हंगामातील बटाटा काढणी सुरू आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी, सोनोली, राकसकोप, हंगरगा, मंडोळी, सावगाव, बोकनूर, यळेबैल, इनाम बडस, बिजगर्णी, बहाद्दरवाडी, किणये, देसूर, झाडशहापूर, संतिबस्तवाड, वाघवडे, रणकुंडये, कर्ले, बेळवट्टी आदी भागात रताळी लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. सध्या रताळी काढणी जोमाने सुरू आहे.