हरिमेधा

अध्याय एकोणतिसावा भगवंत म्हणाले, उद्धवा तुला जे शरण येतील त्यात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही स्वभावाचे लोक असतील. जे चांगले असतील त्यांचा प्रश्न नाही पण जे दुष्ट स्वभावाचे असतील त्यांना तू नीच समजू नकोस कारण सर्वांच्यातच ईश्वराचा वास असल्याने सर्वजण वंद्यच असतात हे लक्षात घेऊन सगळ्यांच्याबद्दल सद्गुरुंनी बाळगलेला पूज्यभाव हे त्यांच्या पूर्ण गुरुत्वाचे लक्षण आहे. […]

हरिमेधा

अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा तुला जे शरण येतील त्यात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही स्वभावाचे लोक असतील. जे चांगले असतील त्यांचा प्रश्न नाही पण जे दुष्ट स्वभावाचे असतील त्यांना तू नीच समजू नकोस कारण सर्वांच्यातच ईश्वराचा वास असल्याने सर्वजण वंद्यच असतात हे लक्षात घेऊन सगळ्यांच्याबद्दल सद्गुरुंनी बाळगलेला पूज्यभाव हे त्यांच्या पूर्ण गुरुत्वाचे लक्षण आहे. शिष्य चांगला आहे की वाईट आहे हे न पाहता शिष्य हा परिपूर्ण ब्रह्म आहे असे पाहणे हेच सद्गुरूंचे मुख्य लक्षण आहे. शिष्याबद्दल सद्गुरुंना वाटणाऱ्या कळवळ्याला शुद्ध ‘सद्गुरुता’ असे म्हणतात. उत्तम शिष्य कुणाला म्हणावे, शिष्याचे पाणी कसे ओळखावे ह्याबद्दल मी तुला पूर्वी सांगितले आहेच. त्यानुसार शिष्य कोणत्या पायरीवर उभा आहे हे ओळखून ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्याला उपदेश कर. तुला हे सर्व सांगण्याचा उद्देश असा की, चांगल्या शिष्यांचा संग्रह करून त्यांना उपदेश करण्यासाठी काय करायला पाहिजे हे सर्वांना समजावे. तसं बघितलं तर तू स्वत: गुणातीत असल्याने तुला अहंकाराची बाधा होणे शक्य नाही तसेच सर्वभूती ईश्वराचा वास आहे हे तू जाणत असल्याने तुला ते वेगळे सांगण्याची आवश्यकताही नाही. तेव्हा सर्वाभूती ईश्वराचा वास आहे हे लक्षात घेऊन तू आत्मज्ञानाचा उपदेश करत राहिलास तर तुझ्या गुणातीतेला कोणतीच बाधा येणार नाही. एव्हढेच नाही तर तू केलेल्या उपदेशामुळे तेही त्रिगुणावस्थेला जिंकून घेतील. आता त्यांना हे कसं साध्य होईल असं विचारशील तर तुझ्या उपदेशानुसार जे वर्तन करतात ते तुझ्या कृपेने त्रिगुणांच्या त्रिविध वृत्तीवर आक्रमण करतील. दृष्य द्रष्टा आणि दर्शन, जागृती सुषुप्ती आणि स्वप्न, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, कार्य कारण आणि कर्ता, भोज्य भोजन आणि भोक्ता, शत्रु मित्र उदासीनता असे त्रिगुणांचे त्रिविधपण असते आणि ते बाधक ठरते. म्हणून जो सत्छिष्यांना उपदेश करून माझे भजन करत असतो तो त्रिगुणांच्या त्रिपुटीचा नाश करून माझे स्वरूप होतो. माझें स्वरूप त्रिगुणातीत असल्याने त्यामध्ये गुणच नाहीत आणि त्यामुळे गुणानुसार व्यक्त होणारा स्वभावही नाही. म्हणून जे माझ्यामध्ये पूर्ण भाव ठेऊन माझी भक्ती करतात ते गुणातीत सहज प्राप्त करून घेतात. त्यामुळे ते स्वानंदात रममाण असतात. ह्याप्रमाणे भगवंतांनी उद्धवाला त्याच्या अवस्थेचा सविस्तर उलगडा करून सांगितला. नाथ महाराज म्हणतात, जो स्वत: निष्काम होता, ज्याने परब्रह्माची अनुभूती घेतलेली होती त्या शुकमुनींनासुद्धा उद्धवाला भगवंतांबद्दल जे प्रेम वाटत होते त्याचे वर्णन करताना संभ्रम पडला. ते परीक्षित महाराजांना म्हणाले, राजा उद्धवाला प्रत्यक्ष श्रीकृष्णाने उपदेश केला होता. त्या श्रीकृष्णाबद्दल उद्धवाला वाटणारे प्रेम हे शिष्याला सदगुरुंबद्दल किती आणि कसे प्रेम वाटावे ह्याचा एक आदर्श होता असे म्हंटलेस तरी चालेल. त्या प्रेमाचे शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य आहे तरी पण मी तुला ते सांगण्याचा प्रयत्न करतो ऐक. उद्धव जरी गुणातीत झाला असला तरी त्याचे गुरुचरणी अद्भुत प्रेम होते. त्याच्या दृष्टीने सद्गुरु श्रीकृष्णनाथ मूर्तिमंत परब्रह्म होते. हरिच्या ठायी त्यांची पूर्ण श्रद्धा असल्याने तो हरिपदाचा त्याग करू शकत नव्हता. म्हणून प्रबुद्ध उद्धवाला ‘हरिमेधा’ असं म्हणतात. तो आवडीने हरिचे ध्यान करत असे. त्याच्या ध्यानात सदोदित हरिचाच विषय असे. त्याच्या हरीवरील प्रेमाची तऱ्हाच वेगळी होती. ह्याच्या मनात आपला एकच विचार सदैव घोळत असे तो म्हणजे मी काय केले की, माझ्या श्रीकृष्णाला समाधान वाटेल? ह्या प्रश्नाच्या सततच्या चिंतनामुळे त्याला इतर काही सुचतच नसे. त्यामुळे त्याच्या बुद्धीचे हरिने हरण केले होते असे म्हंटले तरी चालेल. त्यामुळे इतर कोणत्याही विषयात त्यांची बुद्धी चालतच नाही.
क्रमश:

Go to Source