महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी हरेंद्र सिंग

वृत्तसंस्था/ बेंगळूर राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षिका जॅनेक स्कॉपमन यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी हरेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्कॉपमन यांनी पद सोडल्यानंतर या पदासाठी त्यांचेच प्रमुख नाव चर्चेत होते. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते असणाऱ्या हरेंद्र सिंग यांनी याआधी विविध भारतीय संघांना प्रशिक्षण दिले आहे. त्यात वरिष्ठ पुरुष व महिला संघांचा समावेश […]

महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी हरेंद्र सिंग

वृत्तसंस्था/ बेंगळूर
राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षिका जॅनेक स्कॉपमन यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी हरेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्कॉपमन यांनी पद सोडल्यानंतर या पदासाठी त्यांचेच प्रमुख नाव चर्चेत होते.
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते असणाऱ्या हरेंद्र सिंग यांनी याआधी विविध भारतीय संघांना प्रशिक्षण दिले आहे. त्यात वरिष्ठ पुरुष व महिला संघांचा समावेश आहे. त्यांनी अलीकडे अमेरिकन पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. गेल्या आठवड्यातच ते भारतात महिला संघाच्या शिबिरात दाखल झाले आहेत. महिलांच्या शिबिरासाठी एकूण 60 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्यांचा मूल्यांकन करून 33 खेळाडू निवडण्यात आले आहेत, हे काम हरेंद्र सिंग यांनीच केले असल्याचे साइमधील सूत्राने सांगितले. यासाठी खेळाडूंची 6 व 7 एप्रिल रोजी चाचणी घेण्यात आली होती.
साहायक स्टाफमधील बरेच सदस्य स्कॉपमन यांनी पद सोडल्यानंतर निघून गेले आहेत. आता नवीन स्टाफची जुळवाजुळव हरेंद्र सिंग यांनी चालवली आहे. लोकसभा निवडणूक असल्याने मॉडेल कोड ऑफ कंडक्टमुळे (एमसीसी) त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा हॉकी इंडियाने रोखून धरली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या शिष्टाचाराशिवाय हॉकी फेडरेशनला एमसीसीचे पालन करणे बंधनकारक आहे. कारण माजी कर्णधार व हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की हे बिजू जनता दलाच्या तिकिटावर ओडिशातील सुंदरगड मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत. हरेंद्र सिंग यांची प्रशिक्षकपदाची कारकीर्द 1997 पासून सुरू झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 11 सुवर्णपदके मिळविली असून त्यात 2015 मधील कनिष्ठ पुरुष संघाचे मिळविलेल्या विश्वचषक जेतेपद, 2017 मध्ये महिला आशिया चषक, 2018 मध्ये पुरुषांची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी या जेतेपदांचा समावेश आहे.