खानापूर शहरासह तालुक्यात हनुमान जयंती साजरी

ग्रामीण भागासह शहरात महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन खानापूर : शहरातील हनुमान मंदिरात मंगळवार दि. 23 रोजी पहाटे हनुमान जयंती उत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळ्यासाठी तसेच बजरंग बलीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. प्रत्येक हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथील माऊतीनगरमध्ये स्वयंभू हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी पहाटे […]

खानापूर शहरासह तालुक्यात हनुमान जयंती साजरी

ग्रामीण भागासह शहरात महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन
खानापूर : शहरातील हनुमान मंदिरात मंगळवार दि. 23 रोजी पहाटे हनुमान जयंती उत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळ्यासाठी तसेच बजरंग बलीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. प्रत्येक हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथील माऊतीनगरमध्ये स्वयंभू हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी पहाटे स्वयंभू हनुमानाची नित्यपूजा झाल्यावर जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यानंतर दिवसभर भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करून सायंकाळी महाआरती करण्यात आली. तसेच लक्ष्मीमंदिराजवळील माऊती मंदिरातही जन्मोत्सव सोहळा भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात पूजा-अर्चा, अभिषेक करण्यात आला. या ठिकाणी देखील सकाळपासून हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
याशिवाय येथील रेल्वेस्टेशन नजीक असलेल्या हनुमान मंदिरातही जन्मोत्सव सोहळा थाटात पार पडला. या ठिकाणच्या मंदिरातही भाविकांची बरीच गर्दी होती. विशेषत: स्टेशनजवळ विद्यानगर, मुरगोड प्लॉट, राजश्री शाहूनगर येथील भाविकांची या ठिकाणी विशेष गर्दी झाली होती. तसेच मलप्रभा नदीकाठावरील आर. पी. जोशी यांच्या माऊती मंदिरातही हनुमान जन्मोत्सव सोहळा थाटात पार पडला. याशिवाय जांबोटी रोडवरील सर्टीफाईड स्कूलच्या आवारात असलेल्या माऊती मंदिरातही जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीनगर, समर्थनगर, बाचोळी, रामगुरवाडी येथील भक्तगणांची या ठिकाणी विशेष गर्दी झाली होती. शिवाय लक्ष्मीनगरमधील साई हनुमान मंदिरातही जयंती उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. तालुक्यातील ग्रामीण भागातही हनुमान जयंती उत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात आला. सकाळी काकड आरती झाल्यावर बलभीमाला पाळण्यात घालण्यात आले. सकाळी 6 वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. याशिवाय चापगाव, बेकवाड, शिरोली, लोकोळी, मणतुर्गा, हेम्माडगा, यडोगा, बिदरभावी, देवनगर-जळगा येथे देखील हनुमान जयंती उत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
नंदगड परिसर
नंदगड: नंदगड परिसरातील विविध गावांतून मंगळवारी हनुमान जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त पूजा, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजनाचे कार्यक्रम झाले.
नंदगड येथील तीन मंदिरांमध्ये हनुमान जयंती
नंदगड येथील कॉलेज रस्त्यावरील हनुमान मंदिरात सकाळी पूजा, अभिषेक, झाल्यानंतर पाळण्यात घालण्यात आले. यावेळी गावातील अनेक महिलांसह भाविक उपस्थित होते. तसेच नंदगड सोनार गल्ली येथील हनुमान मंदिरात सकाळी पूजा व अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले. तर हेब्बाळ बसस्थानकाजवळील गावच्या वेशीत असलेल्या हनुमान मंदिराची प्रथेप्रमाणे पूजा-अर्चा व अनेक कार्यक्रम पार पडले.
चन्नेवाडी येथे हनुमान जयंती
चन्नेवाडी (ता. खानापूर) येथे मंगळवार दि. 23 रोजी चैत्रपौर्णिमेच्या सूर्योदयाला हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी आरती, नाम:स्मरण, तीर्थप्रसाद, श्रीफळ वाढविणे व अन्य धार्मिक कार्यक्रम झाले. दुपारी 4 वाजता कलावती भजन, 7.30 वाजता महाप्रसाद व रात्री 9.30 वाजता श्री संत एकनाथ सोंगी भजनी भारुड कारलगा यांचे भारुड भजन झाले. यावेळी क. नंदगड, झुंजवाड, झाडनावगा, बेकवाड, हलगा, हलशी या गावातील हनुमान व मारुती मंदिरात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पूजा अर्चा, अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले. प्रत्येक गावातील पूजेला भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.