हलगा-मच्छे रस्त्याच्या कामाला मिळणार गती

न्यायालयाने स्थगिती उठविल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा मार्ग मोकळा, काही शेतकऱ्यांच्या चुकीमुळे इतरांना फटका बेळगाव : हलगा-मच्छे बायपासच्या कामाला महिन्याभरापूर्वी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र शेतकरी संघटनेमध्ये पडलेल्या दुफळीनंतर उच्च न्यायालयाने सोमवारी रस्त्याच्या कामाला दिलेली स्थगिती उठविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून काही शेतकऱ्यांच्या चुकीमुळे अखेर हलगा-मच्छे बायपासच्या आंदोलनाला आणि न्यायालयीन लढ्याला खीळ […]

हलगा-मच्छे रस्त्याच्या कामाला मिळणार गती

न्यायालयाने स्थगिती उठविल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा मार्ग मोकळा, काही शेतकऱ्यांच्या चुकीमुळे इतरांना फटका
बेळगाव : हलगा-मच्छे बायपासच्या कामाला महिन्याभरापूर्वी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र शेतकरी संघटनेमध्ये पडलेल्या दुफळीनंतर उच्च न्यायालयाने सोमवारी रस्त्याच्या कामाला दिलेली स्थगिती उठविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून काही शेतकऱ्यांच्या चुकीमुळे अखेर हलगा-मच्छे बायपासच्या आंदोलनाला आणि न्यायालयीन लढ्याला खीळ बसली आहे. न्यायालयाने स्थगिती उठविल्याने आता या रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा रस्ता करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. गेल्या 15 वर्षांपासून त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र शेतकऱ्यांनी रस्त्यावरील लढाईबरोबरच न्यायालयीन लढाई लढून जोरदार विरोध केला. अनेकवेळा उभ्या पिकांमध्ये जेसीबी फिरविला. शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. तरीदेखील शेतकऱ्यांनी आपला लढा सुरूच ठेवला होता. मात्र आता न्यायालयाने स्थगिती उठविल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दोन महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या कामाला स्थगिती दिली होती. त्यामुळे सुरू असलेले काम कंत्राटदाराने थांबविले. मात्र त्यानंतर काही शेतकऱ्यांनी न्यायालयातून आपले अर्ज मागे घेतले. संघटितपणे आतापर्यंत लढा देण्यात आला. मात्र काही शेतकऱ्यांमुळे या लढ्याची धार कमी झाली. परिणामी न्यायालयानेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची बाजू उचलून धरत स्थगिती उठविली आहे.
शेवटपर्यंत लढा देणार
झिरो पॉईंटचे कारण पुढे करत शेतकऱ्यांनी आजपर्यंत लढा दिला होता. यापुढेही शेतकऱ्यांच्या बाजूने लढा देणार असल्याचे शेतकऱ्यांचे वकील रवीकुमार गोकाककर यांनी सांगितले.