महांतेशनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
एकाच दिवसात चौघांवर हल्ला : मनपाचे जखमींकडे साफ दुर्लक्ष
बेळगाव : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. गुरुवारी महांतेशनगर परिसरात घडलेल्या या घटनेने भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारीही याच परिसरात आणखी एक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी दिवसभरात या घटना घडल्या आहेत. पहिली घटना दुपारी 12 वाजता घडली. या सर्व घटना देसाई लॉनच्या पाठीमागील बाजूस असलेल्या वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये घडल्या आहेत. शिवानी लमाणी (वय 4) या बालिकेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या घटनेनंतर लगेच एक तासाने दुसरी घटना घडली. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मोहम्मद झाकीर नाईक (वय 15) रा. दरबार गल्ली या मुलावर मन्नत कॉलनी परिसरात कुत्र्यांनी हल्ला केला. त्यानंतर सायंकाळी 5.10 वाजण्याच्या सुमारास रुमान ताजुद्दीन हंचिनमनी (वय 32) रा. बागवान गल्ली या युवकावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला झाला. चौथी घटना सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. न्यू गांधीनगर येथील आहिल मोहम्मदआसीफ कलमनी (वय 6) हा बालक भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाला. या चौघा जणांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्यांना घरी जाऊ देण्यात आले. शुक्रवारीही भटक्या कुत्र्याने एकावर हल्ला केल्याची माहिती मिळाली असून त्याचा तपशील उपलब्ध झाला नाही. एका दिवसात घडलेल्या सलग चार घटनांमुळे महांतेशनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 25 ते 50 कुत्र्यांचा कळप या परिसरात वावरत असतो. घरासमोर खेळणारी लहान मुले, तरुण यांच्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला सुरू आहे. यासंबंधी ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’ने जखमी तरुणाशी संपर्क साधला असता भटक्या कुत्र्यांवर आळा घालण्यासाठी कसलेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. गुरुवारी सायंकाळी चौघा जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, मनपाचे कोणीही अधिकारी सिव्हिलला भेट देऊन जखमींची विचारपूस केली नाही. माळमारुती पोलीस स्थानकातून चौकशीसाठी केवळ फोन करण्यात आला होता. कोणी पोलिसांनीही भेट देऊन विचारपूस केली नाही, असे जखमींनी सांगितले.
जबाबदारी कोणाची?
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांनाच जबाबदार धरले जाईल, असे उच्च न्यायालयाने वारंवार स्पष्ट केले आहे. ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात घटना घडल्यास पंचायत तर मनपाच्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या हल्ल्यांना महानगरपालिकाच जबाबदार असणार, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. बेळगावात वडगाव, अनगोळ, आझमनगर, महांतेशनगर परिसरात अशा घटना वाढल्या आहेत. तरीही सरकारी यंत्रणांचे मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याला मनपाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले
कणबर्गी रोडवरील शिवतीर्थ कॉलनी, पार्वतीनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने लहान मुलांचा चावा घेतला. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती महानगरपालिकेला देण्यात आली. त्यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता त्या कुत्र्याला पकडले. त्यानंतर त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. याचबरोबर अशा प्रकारे पिसाळलेली कुत्रीही अचानकपणे नागरिकांवर हल्ला करत आहेत. विजयनगर परिसरात काही दिवसांपूर्वी कुत्र्याने थैमान घातले होते. त्यानंतर गुरुवारी रात्री पार्वतीनगर, शिवतीर्थनगर परिसरात लहान मुलांचा चावा घेतला. त्यावेळी त्या कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्याने तेथून पलायन केले. या घटनेची माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर कुत्री पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून त्या कुत्र्याला शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास या कर्मचाऱ्यांनी पकडले आहे. सध्या त्याला रुक्मिणीनगर येथील केंद्रामध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.
Home महत्वाची बातमी महांतेशनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
महांतेशनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
एकाच दिवसात चौघांवर हल्ला : मनपाचे जखमींकडे साफ दुर्लक्ष बेळगाव : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. गुरुवारी महांतेशनगर परिसरात घडलेल्या या घटनेने भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारीही याच परिसरात आणखी एक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी दिवसभरात या घटना घडल्या आहेत. पहिली घटना दुपारी 12 […]