शाळेच्या बचावासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांची धाव!

स्वच्छतागृहाचे बांधकाम रोखले : शाळेच्या विकासासाठी 2 लाख निधी मंजूर बेळगाव : सरकारी शाळेच्या आवारामध्ये मोठे स्वच्छतागृह बांधण्याचा प्रयत्न गटशिक्षणाधिकाऱ्यांनी थांबविला. शाळेच्या जागेत अतिक्रमण करून स्वच्छतागृह बांधण्याचा घाट एका लोकप्रतिनिधीने मागील काही दिवसांपासून सुरू केला होता. मराठी शाळांना लक्ष्य करून असे प्रकार होत असल्याची तक्रार पालक व काही व्यापाऱ्यांनी केली होती. शुक्रवारी स्वच्छतागृहाच्या बांधकामाला सुरुवात […]

शाळेच्या बचावासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांची धाव!

स्वच्छतागृहाचे बांधकाम रोखले : शाळेच्या विकासासाठी 2 लाख निधी मंजूर
बेळगाव : सरकारी शाळेच्या आवारामध्ये मोठे स्वच्छतागृह बांधण्याचा प्रयत्न गटशिक्षणाधिकाऱ्यांनी थांबविला. शाळेच्या जागेत अतिक्रमण करून स्वच्छतागृह बांधण्याचा घाट एका लोकप्रतिनिधीने मागील काही दिवसांपासून सुरू केला होता. मराठी शाळांना लक्ष्य करून असे प्रकार होत असल्याची तक्रार पालक व काही व्यापाऱ्यांनी केली होती. शुक्रवारी स्वच्छतागृहाच्या बांधकामाला सुरुवात होणार होती. त्यापूर्वीच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन काम थांबविले. गणपत गल्ली कॉर्नर, कंबळी खूट येथील सरकारी मराठी मुलींची शाळा क्र. 1 या शाळेच्या मागील बाजूला स्वच्छतागृह बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक वर्षांपासून मुतारी होती. या मुतारीला लागूनच स्वच्छतागृह उभारण्यासाठी हालचाली सुरू होत्या. 167 वर्षांचा वारसा लाभलेल्या या शाळेमध्ये पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्यांना त्रास होत होता. यासाठी तात्पुरत्या स्वरुपात ही शाळा जवळील शाळेमध्ये स्थानांतरित करण्यात आली होती. याचाच फायदा घेत शाळेच्या आवारात स्वच्छतागृह बांधण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले.
काम थांबविण्याची सूचना
शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या या शाळेच्या मागील बाजूला स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. शाळेच्या आवारात 20 फूट रुंद व 8 फूट लांब असे स्वच्छतागृह उभारण्यासाठी महानगरपालिकेकडून परवानगी मिळविण्यात आली आहे. परंतु, शिक्षण विभागाची परवानगी न घेताच बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने शुक्रवारी सकाळी शहर गटशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ व उपगट शिक्षणाधिकारी आय. डी. हिरेमठ यांनी शाळेला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी येईपर्यंत काम थांबविण्याची सूचना केली.
शाळेला मिळणार नवे रूप
सरकारी शाळा वाचविण्यासाठी काही जणांकडून प्रयत्न सुरू असतानाच लोकप्रतिनिधी मात्र शाळांच्या जागांचा इतर कामांसाठी वापर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच शिक्षण विभागाकडून कंबळी खूट शाळेला तातडीने दोन लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या दोन लाख रुपयातून शाळेला रंगरंगोटी सोबतच इतर विकासकामे राबविली जाणार आहेत. यामुळे शहरातील पहिल्या मराठी मुलींच्या शाळेचे भवितव्य काय? असा प्रश्न मागील काही दिवसांपासून विचारला जात होता. त्यावर आता पडदा पडला आहे.