ग्रीनच्या नाबाद शतकाने ऑस्ट्रेलियाला सावरले
पहिली कसोटी पहिला दिवस : ऑस्ट्रेलिया प. डाव 9 बाद 279, हेन्रीचे चार बळी
वृत्तसंस्था /वेलिंग्टन
कॅमेरॉन ग्रीनच्या नाबाद शतकाच्या जोरावर आजपासून येथे सुरू झालेल्या यजमान न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 9 बाद 279 धावा जमविल्या. ग्रीन 16 चौकारांसह 103 धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्री, विल्यम ओरुरके आणि कुगेलजिन हे प्रभावी गोलंदाज ठरले. या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. स्टिव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला समाधानकारक सुरुवात करुन देताना 24.1 षटकात पहिल्या गड्यासाठी 61 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडच्या कर्णधाराने गोलंदाजीत वारंवार बदल केला. पण त्याला विशेष यश मिळाले नाही. दरम्यान उपाहारापूर्वी न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने स्मिथला ब्लंडेलकरवी झेलबाद केले. स्मिथने 71 चेंडूत 4 चौकारांसह 31 धावा जमविल्या. स्मिथ आणि ख्वाजा यांनी अर्धशतकी भागिदारी 125 चेंडूत नोंदविली. उपहारावेळी ऑस्ट्रेलियाने 27 षटकात 1 बाद 62 धावा जमविल्या होत्या. ख्वाजा 28 तर लाबुशेन एका धावेवर खेळत होते. खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची मधली फळी कोलमडली. न्यूझीलंडच्या कुगेलजिनने लाबुशेनला मिचेलकरवी झेलबाद केले. तो एका धावेवरच बाद झाला. मॅट हेन्रीच्या इनस्विंगरवर ख्वाजाचा त्रिफळा उडाला त्याने 118 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 33 धावा जमविल्या. त्यानंतर ओरुरकेने हेडला ब्लंडेलकरवी झेलबाद केले. त्याने 1 धाव जमविली. ऑस्ट्रेलियाची यावेळी स्थिती 4 बाद 89 अशी केविलवाणी होती. कॅमेरॉन ग्रीन आणि मिचेल मार्श यांनी संघाचा डाव सावरला. चहापानावेळी ऑस्ट्रेलियाने 53 षटकात 4 बाद 147 धावा जमविल्या होत्या. ग्रीन आणि मार्श यांनी पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 62 चेंडूत नोंदविली. तर ऑस्ट्रेलियाचे शतक 260 चेंडूत फलकावर लागले. चहापानावेळी ग्रीन 23 तर मार्श 39 धावांवर खेळत होते. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाने 85 धावा जमविताना 3 गडी गमाविले.
ग्रीनचे दुसरे शतक
खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये ग्रीन आणि मार्श यांनी संघाचा डाव बऱ्यापैकी सावरताना पाचव्या गड्यासाठी 67 धावांची भागिदारी केली. या शेवटच्या सत्रामध्ये हेन्रीने मिचेल मार्शला झेलबाद केले. त्याने 39 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 40 धावा जमविल्या. कुगलेजिनने कॅरेला 10 धावांवर तंबूत पाठविले. स्टार्ककडून ग्रीनला बऱ्यापैकी साथ मिळाली. या जोडीने सातव्या गड्यासाठी 35 धावांची भर घातली. ओरुरकेने स्टार्कला लॅथमकरवी झेलबाद केले. त्याने 9 धावा जमविल्या. रचिन रवींद्रने कर्णधार कमिन्सला पायचीत केले. कमिन्सने 24 चेंडूत 2 षटकारांसह 16 धावा जमविल्या. हेन्रीने लियॉनला 5 धावांवर झेलबाद केले. मात्र एका बाजूने ग्रीनने संघाचा डाव शेवटपर्यंत सावरला. दिवसअखेर ग्रीन 155 चेंडूत 16 चौकारांसह 103 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाचे दीडशतक 323 चेंडूत तर द्विशतक 417 चेंडूत फलकावर लागले. ग्रीनने आपले अर्धशतक 8 चौकारांसह 108 चेंडूत नोंदविले. डावातील 81 व्या षटकानंतर न्यूझीलंडने दुसरा नवा चेंडू घेतला. ऑस्ट्रेलियाच्या 250 धावा 484 चेंडूत नोंदविल्या गेल्या. ग्रीनचे कसोटीतील हे दुसरे शतक आहे. न्यूझीलंड संघाला 2011 नंतर ऑस्ट्रेलियावर कसोटी विजय मिळविता आलेला नाही.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया प. डाव 85 षटकात 9 बाद 279 (स्मिथ 31, ख्वाजा 33, लाबुशेन 1, ग्रीन खेळत आहे 103, हेड 1, मार्श 40, कॅरे 10, स्टार्क 9, कमिन्स 16, लियॉन 5, हॅझलवूड खेळत आहे 0, अवांतर 30, हेन्री 4-43, ओरुरके 2-59, कुगलेजिन 2-56, रचिन रवींद्र 1-19).
Home महत्वाची बातमी ग्रीनच्या नाबाद शतकाने ऑस्ट्रेलियाला सावरले
ग्रीनच्या नाबाद शतकाने ऑस्ट्रेलियाला सावरले
पहिली कसोटी पहिला दिवस : ऑस्ट्रेलिया प. डाव 9 बाद 279, हेन्रीचे चार बळी वृत्तसंस्था /वेलिंग्टन कॅमेरॉन ग्रीनच्या नाबाद शतकाच्या जोरावर आजपासून येथे सुरू झालेल्या यजमान न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 9 बाद 279 धावा जमविल्या. ग्रीन 16 चौकारांसह 103 धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्री, विल्यम ओरुरके आणि कुगेलजिन हे प्रभावी गोलंदाज […]