निरोप… स्वागत… जल्लोषात!

देशविदेशी पर्यटकांची गर्दी : वाहनांच्या गर्दीने वाहतूक कोंडी पणजी : नवीन वर्ष 2024 चे मध्यरात्री 12 च्या सुमारास गोव्यात सर्वत्र देशी, विदेशी पर्यटकांच्या साक्षीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. गोव्यातील बहुतेक सर्व समुद्रकिनारे पर्यटकांसह स्थानिक जनतेच्या गर्दीने फुलून गेले होते. महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यातील लोकांनी आपापली वाहने घेऊन गोव्यात येऊन मावळत्या वर्षाला 2023 ला निरोप […]

निरोप… स्वागत… जल्लोषात!

देशविदेशी पर्यटकांची गर्दी : वाहनांच्या गर्दीने वाहतूक कोंडी
पणजी : नवीन वर्ष 2024 चे मध्यरात्री 12 च्या सुमारास गोव्यात सर्वत्र देशी, विदेशी पर्यटकांच्या साक्षीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. गोव्यातील बहुतेक सर्व समुद्रकिनारे पर्यटकांसह स्थानिक जनतेच्या गर्दीने फुलून गेले होते. महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यातील लोकांनी आपापली वाहने घेऊन गोव्यात येऊन मावळत्या वर्षाला 2023 ला निरोप दिला आणि स्थानिक लोकांनी फटाके वाजवून, मौजमजा करून 2024 चे स्वागत केले. सर्वांनी एकमेकांना भेटून, आलिंगन देऊन तसेच हस्तांदोलन करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तर अनेकांनी मोबाईलच्या माध्यमातून आपापल्या प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवले. वर्ष 2023 चा शेवटचा दिवस रविवार आल्यामुळे सर्वांना सुटी होती आणि त्याचा लाभ उठवत लोकांनी हा दिवस आनंदात घालवला. राज्यातील विविध ठिकाणी तसेच बड्या हॉटेलांतून नवीन वर्ष स्वागताचे कार्यक्रम, नृत्यरजनी यांचे आयोजन करण्यात आले. त्यात देशी, विदेशी पर्यटकांनी आनंदाने नाचून गाऊन नवीन वर्षाला सलाम केला.
सर्वत्र वाहनांची गर्दी
पणजी शहरातील मिरामार, दोनापावला येथील समुद्रकिनारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्यात स्थानिक लोकांचाही सहभाग होता. रविवारची गोव्यात वाहनांची वर्दळ कमीच असते परंतु कालच्या रविवारी वर्षाचा शेटचा दिवस असल्याने इतर राज्यातील वाहने आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी पहायला मिळाली. तसेच त्यांच्या पार्कींगसाठी जागा अपुरी पडली. वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही प्रमुख ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. भाड्याने दुचाकी, चारचाकी घेऊन फिरणारी पर्यटकांची वाहने मोठ्या प्रमाणात दिसत होती. नवीन वर्ष स्वागतासाठी अनेक ठिकाणी रंगी-बेरंगी रोषणाई करण्यात आली होती तर आकाशात दारूकामाची आतषबाजी करून काही ठिकाणी नवीन वर्षाचे स्वागत झाले.
मध्यरात्री ओल्ड मॅनचे दहन
गोव्यातील विविध शहरात तसेच अनेक गावात ‘ओल्ड मॅन’ च्या प्रतिमा तयार करण्यात आल्या आणि मध्यरात्री 12 वाजता त्यांचे दहन करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. मागील वर्षातील पीडा नष्ट होऊन नवीन वर्षात काहीतरी चांगले घडावे म्हणून गोव्यात ‘ओल्ड मॅन’ ची प्रतिमा वर्षाच्या शेवटच्या दिवशी तयार करण्याची प्रथा आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रतिमा तयार करण्यात आल्याचे दृष्टीस पडले. त्याला काळे कपडे घालण्यात आले होते. लहान मुले, तरूण मंडळी ‘ओल्ड मॅन’ तयार करण्यात गर्क होता. मावळत्या वर्षाला निरोप देताना त्याला जाळण्यात आले आणि नवीन वर्षाचे स्वागत झाले.