गोमंतकीय संस्कृतीचेही संवर्धन करावे

आमदार जित आरोलकर यांचे प्रतिपादन, पालये येथील शेटगावकर परिवारातर्फे क्रांतिदिन सोहळा  वार्ताहर /पालये गोवा मुक्तिलढ्याची चळवळ फार महान आहे. या चळवळीचा इतिहास तसेच गोमंतकीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे यादृष्टीने विद्यार्थी, पालक व शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मांद्रे मतदारसंघाचे आमदार जित आरोलकर यांनी केले. पालये येथील हनुमंत शेटगावकर व परिवारातर्फे श्री भूमिका वेताळ मंदिरात […]

गोमंतकीय संस्कृतीचेही संवर्धन करावे

आमदार जित आरोलकर यांचे प्रतिपादन, पालये येथील शेटगावकर परिवारातर्फे क्रांतिदिन सोहळा 
वार्ताहर /पालये
गोवा मुक्तिलढ्याची चळवळ फार महान आहे. या चळवळीचा इतिहास तसेच गोमंतकीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे यादृष्टीने विद्यार्थी, पालक व शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मांद्रे मतदारसंघाचे आमदार जित आरोलकर यांनी केले. पालये येथील हनुमंत शेटगावकर व परिवारातर्फे श्री भूमिका वेताळ मंदिरात आयोजित क्रांतिदिन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री संगीता गोपाळ परब, जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशांवकर, प्रमुख वक्ते मांद्रे श्री सप्तेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक तथा साहित्यिक, इतिहास संशोधक अरूण नाईक, आयडियल हायस्कूलचे निवृत्त शिक्षक पद्माकर परब, देवस्थान समितीचे अध्यक्ष एकनाथ तुकाराम परब, माजी पंचायत सचिव चंद्रकांत ऊर्फ रमेश तिळवे, ज्येष्ठ गायककलाकार शंकर कदम, नाईकवाडा सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या प्रमुख अर्चना तुकाराम परब, मधलावाडा सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या प्रमुख मीना फर्नांडिस, भंडारवाडा सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या प्रमुख वैशाली राऊळ, आयडियल हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका अक्षया कोरगावकर तसेच किरणपाणी शाळेच्या शिक्षिका सपना नाईक, कल्पना सावंत, निवृत्त मुख्याध्यापक रमाकांत नाईक,  विनायक शेटगावकर यांची उपस्थिती होती.
आयडियल इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. तसेच दिवंगत स्वातंत्र्यसैनिक कृष्णा दत्ताराम शेटगावकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. 18 जूनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोवा मुक्तिलढ्यात पालये गावातील स्वातंत्र्यसैनिकांचेही योगदान मोठे आहे. गोवा मुक्तिलढ्याचा इतिहास तसेच हौतात्म्यांचे कायम स्मरण राहावे. तसेच गोवा मुक्तिसंग्रामाचा लढा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा,असे आवाहन माजी मंत्री संगीता परब यांनी केले.
गोवा क्रांतिदिन सोहळ्यासाठी दरवर्षी शेटगावकर कुटुंबीय पुढाकार घेत असल्याबद्दल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशांवकर यांनी या कुटुंबियांना धन्यवाद दिले. जिल्हा पंचायत निधीतून पालये गावात विकासकामे राबविण्यासाठी आपले नेहमीच सहकार्य असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.  पोर्तुगीज राजवटीविरोधात डॉ. मिनेझिस ब्रागांझा, डॉ. राम मनोहर लोहिया यांनी दिलेल्या लढ्याविषयी माहिती पद्माकर परब यांनी दिली. नाईकवाडा सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी अस्मी तुकाराम परब, वैष्णवी विजय परब यांनी कविता सादरीकरण केली. तसेच भंडारवाडा सरकारी प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी सुरेश महेश गवंडी, निहाल गवंडी यांनी गोवा मुक्तिलढ्याविषयी माहिती दिली. किरणपाणी सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. व्यासपीठावरील मान्यवरांचे प्रमोद शेटगावकर, विजय शेटगावकर, सदानंद शेटगांवकर, अक्षदा शेटगावकर यांनी पुष्पे देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश परब यांनी केले,तर आभार हनुमंत शेटगावकर यांनी मानले.
पालयेतील रक्तरंजित इतिहास अजरामर : प्रा. नाईक
पालये गाव हा वैशिष्ट्यापूर्ण आहे. संत सोहिरोबानाथ आंबिये भूमी असलेल्या या गावात गोवा मुक्तिसंग्रामवेळी पन्नालाल यादव (राजस्थान) हुतात्मा झाले. गोवा मुक्तिलढ्याचा उल्लेख होतो त्यावेळी प्रामुख्याने पालये गावातील या हुतात्म्याचा उल्लेख होतो. पालयेतील हा रक्तरंजित इतिहास अजरामर ठरला आहे. पालये गावाचे महत्त्व अबाधित राहावे. तसेच या हुतात्म्याच्या स्मृती जपाव्यात, असे आवाहन प्रा. अरूण नाईक यांनी केले.