नित्यनूतनाचा ईश्वरी खेळ

काही वर्षांपूर्वी रेल्वे आरक्षणासाठी, बस तिकिटासाठी, बसस्टॉपवर, बँकेतून पैसे काढण्यासाठी, सिनेमांच्या तिकिटांसाठी अशा अनेक ठिकाणी माणसांची मोठी रांग दिसायची. रांगा लावून ध्येयापर्यंत पोहोचणे ही शिस्त आहे. म्हणून तर मुंग्यांच्या रांगांचे उदाहरण दिले जाते. काळ वेगाने पुढे गेला आणि काळगतीनुसार सारे काही माणसाला घरबसल्या मिळू लागले. रांगांपासून थोडा दिलासा मिळाला खरा, मात्र पूर्वीपेक्षा वेगळ्याच जागी रांग […]

नित्यनूतनाचा ईश्वरी खेळ

काही वर्षांपूर्वी रेल्वे आरक्षणासाठी, बस तिकिटासाठी, बसस्टॉपवर, बँकेतून पैसे काढण्यासाठी, सिनेमांच्या तिकिटांसाठी अशा अनेक ठिकाणी माणसांची मोठी रांग दिसायची. रांगा लावून ध्येयापर्यंत पोहोचणे ही शिस्त आहे. म्हणून तर मुंग्यांच्या रांगांचे उदाहरण दिले जाते. काळ वेगाने पुढे गेला आणि काळगतीनुसार सारे काही माणसाला घरबसल्या मिळू लागले. रांगांपासून थोडा दिलासा मिळाला खरा, मात्र पूर्वीपेक्षा वेगळ्याच जागी रांग दिसू लागली. वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी तसेच स्वरूची भोजनासाठी हातात ताट घेऊन ताटकळत असलेली लांबलचक रांग सवयीची झाली. बाराही महिने देवस्थानांमध्ये दर्शनासाठी लागलेल्या रांगांना कधीही विश्रांती नसते. या रांगा माणसांच्या चक्षूंना दिसतात परंतु न दिसणारी अदृश्य रांग समाजामध्ये लागलेली आहे. ती हळूहळू पुढे सरकते आहे. थबकते आहे. नंबर केव्हा येईल याची वाट बघणारे रांगेबाहेर आहेत. ही रांग असाध्य रोगाने ग्रासलेल्या व्यक्तींची, यमाच्या दरबारात जाण्याची प्रतीक्षा करणारी आहे. दिवसेंदिवस ती मोठी होत आहे. अंथरुणावर खिळून असलेल्या आपल्या वृद्ध जिवलगांचा नंबर कधी लागणार याची प्रतीक्षा करणारी जवळची माणसे सभोवती दिसतात हे कटू वास्तव आहे. निराधार, असहाय्य माणसांना रांग मोडून पुढे जाण्याची इच्छा आहे.
म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण असते असे म्हणतात. माणसाचे शरीर एक यंत्र आहे. जगण्याच्या लढाईत ते देखील जर्जर होते. गात्रे थकतात. मेंदूसुद्धा शिणतो. वयानुसार पिकून गेलेले शहाणपण जरी जवळ असले तरी त्याचा इतरांना उपयोग असतोच असे नाही. विकलांगतेतून देखील कधीकधी बालपण येते. ते बालपण समजून घेणारी माणसे जवळ असतील तर ते सुखावह होते. अन्यथा सारे काही संपून गेल्यासारखे आयुष्य रांगेत उभे असते. भगवान ओशो रजनीश म्हणतात, परमेश्वराला नवी सृष्टी आवडते. जुने मुळी त्याला काही आवडतच नाही. म्हणून तर तो जुना देह नष्ट करताना जुनी स्मृतीही पुसून टाकतो. नाहीतर पुन्हा जन्माला येणारी माणसे म्हातारी, शिळीच यायची. जगत्पित्याचा रोजचा सूर्य, रोजचा चंद्र नवीन असतो. त्याची सृष्टी रोज होळी खेळत नवी रंगपंचमी साजरी करते. संध्याकाळ सोनेरी, तर रात्री आकाशात चांदण्यांचा दीपोत्सव तेजाची अनोखी उधळण करतो. मराठी शाळेतल्या बालभारतीच्या पुस्तकात कवी ग. ह. पाटील यांची एक कविता होती. लहान मुले मोठमोठ्याने ती कविता समूहस्वरात म्हणायचे.
‘देवा तुझे किती, सुंदर आकाश
सुंदर प्रकाश, सूर्य देतो
सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर..
चांदणे सुंदर, पडे त्याचे..’
-परमेश्वराची झाडे, गोड गाणी गाणारी पाखरे… सारेच काही सुंदर आहे.
‘इतुके सुंदर, जग तुझे जर
किती तू सुंदर, असशील ..!’
-त्या परमात्म्याच्या सुंदरतेची कल्पना करायला माणसाचे मन अपुरे आहे. ज्या ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली तो ब्रह्मदेव कमळातून जन्माला आला. कमळाच्या फुलाकडे निरखून पाहिल्यावर कळते की त्याची रचना विधात्याने मोठ्या कौशल्याने केली आहे. कमळाच्या पाकळ्या कमालीच्या एकात एक गुंतलेल्या आहेत. दिसायला सुंदर, मात्र कुणालाही न उलगडणारे रहस्य परमेश्वराच्या निर्मितीत दडले आहे. परमेश्वराची सृष्टी अनुभवताना माणसाचे मन या गोष्टीचा विचार करीत नाही, कारण त्याच्याच मायेच्या उबदार पांघरुणात ते डोळे मिटून पहुडलेले असते. त्याची माया भुलवते आणि रमवते देखील. म्हणूनच माणसाच्या जन्ममृत्यूचे रहस्य त्याच्याजवळच अबाधित राहते.
सृजन आणि संहार हा त्याचा रोजचाच खेळ. घरोघरी कधी जन्माचा आनंद तर अकस्मात शोकछाया. त्याचे चक्र अव्याहत फिरते आहे. आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर विठ्ठलाला ‘तू वेडा कुंभार’ असे म्हणतात. उत्पत्ती, स्थिती आणि लय या गरगर फिरणाऱ्या चक्राला पूर्णता नाही. गदिमा म्हणतात, ‘तूच घडविसी तूच तोडीसी,  कुरवाळीसी तू, तूच ताडीसी!’ निर्माण करणे, घडवणे व मोडून टाकणे हा चक्रखेळ चाललेला आहे. मातीतून घडत असताना काहीच आठवत नसले तरी मातीत मिसळताना परमात्म्याच्या, त्या वेड्या कुंभाराच्या खेळाचा डाव कळायला हवा. रमेश गोविंद वैद्य यांची एक रुबाई आहे.
‘मी आलो कुठूनी याचा पत्ता नाही
पण आल्यावरती इलाज नसतो काही
मी कुठून आलो कसे मला उमजावे?
पण निदान कोठे जातो ते समजावे..!’
-जीवनाच्या काठाशी पोहोचल्यावर मन रिक्त असेल तर नव्या जन्माचा उगम हा त्या भगवंताच्या सानिध्यात असेल. आईच्या उदरात त्याचे गोड नाम ऐकू येईल. मन मोकळे, रिकामे असण्यासाठी श्री दत्तप्रभूंनी बाळाला गुरू केले. श्री दत्तगुरू बाळाकडून निराभिमानत्व हा गुण शिकले. संत एकनाथ महाराज याचे विवरण करताना म्हणतात, तीन महिन्याच्या बाळाला ना मान कळतो ना अपमान. ते आपल्या ठिकाणी सुखाने खेळत असते. या देहाची आणि घराची त्याला चिंता नसते. महाराज म्हणतात,
‘मनेविण जे विहरण, ते बाळकाच्या ऐसे जाण ।
दैवयोगे चलनवलन, वृत्तीशून्य वर्तत? ’
-बाळाच्या जगण्याचे हे सुंदर विवरण आहे. श्री दत्तमहात्म्य या ग्रंथात प. पु.  टेंबे स्वामी म्हणतात, बसल्या ठिकाणी आपण घरपरिवाराच्याच नव्हे तर जगभराच्या चिंता करीत असतो. उगीच काळजी करणे हा मनाचा स्थायीभाव आहे. वास्तविक अनेक गोष्टी माणसाच्या हातात नसतात. धन आणि मान यासाठी होणारी धडपड व्यर्थ आहे हे कळूनही मन त्यामागे धावत असते. असे चंचल मन आत्मचिंतनाकडे वळत नाही म्हणून आनंदमय बालवृत्तीचा स्वीकार करावा म्हणजे समाधान मिळून चित्त अंतर्मुख होईल. वृद्धपणी बालपण हे फक्त शरीराने, मनाने येणे हा निसर्गनियम आहे. ते आत्मचिंतनाने प्राप्त व्हावे यासाठी सुरुवातीपासूनच साधना हवी. परमेश्वराच्या खेळाकडे पाहता यायला हवे.
परमेश्वर स्वत: नितनूतन आहे. नूतनीकरणाचा खेळ त्याने मांडला आहे. कर्माच्या सारीपाटावर सोंगट्या पडत आहेत. नशिबाने सुखदु:ख वाट्याला येते आहे. जन्ममरणाच्या रांगेत अपरिहार्यपणे उभे राहावयाचे आहे. परंतु त्यापूर्वी आत्मशोधाची वाट गवसायला हवी. म्हणूनच म्हटले आहे की भगवंतांच्या नामासाठी त्वरा करा. तशी बुद्धी तो परमेश्वर सर्वांना देवो ही प्रार्थना.
-स्नेहा शिनखेडे