भगवंतांनी दारूकाला उपदेश केला

अध्याय तिसावा दारूक भगवंतांना म्हणाला, यादवांनी परस्परांचा घात करून निर्वंश करून घेतला आणि श्रीकृष्णनाथ निजधामाला गेला हे वृत्त मी कोणत्या काळ्या तोंडाने जाऊन द्वारकेतील लोकांना सांगू? माझा निरोप ऐकून कित्येकांना त्यांचा प्राणांत झालाय असेच वाटेल. लोकांना एव्हढे महादु:ख देण्यासाठी हृषीकेशी मी तेथे जायला तयार नाही. ज्याला ज्याला मी हे वृत्त सांगेन त्याच्या जीवाचा मी घात […]

भगवंतांनी दारूकाला उपदेश केला

अध्याय तिसावा
दारूक भगवंतांना म्हणाला, यादवांनी परस्परांचा घात करून निर्वंश करून घेतला आणि श्रीकृष्णनाथ निजधामाला गेला हे वृत्त मी कोणत्या काळ्या तोंडाने जाऊन द्वारकेतील लोकांना सांगू? माझा निरोप ऐकून कित्येकांना त्यांचा प्राणांत झालाय असेच वाटेल. लोकांना एव्हढे महादु:ख देण्यासाठी हृषीकेशी मी तेथे जायला तयार नाही. ज्याला ज्याला मी हे वृत्त सांगेन त्याच्या जीवाचा मी घात केल्यासारखे होईल. ही दु:खद वार्ता द्वारकेतील सुहृदांना व समस्त प्रजाजनांना मी सांगितल्यावर तिथे एकच हाहाकार उडेल. आपल्या नातेवाईकांना सुखदायक, आनंद देणाऱ्या वार्ता सांगाव्यात पण ते तर बाजूलाच राह्यले, त्याऐवजी त्यांना महादु:खाच्या राशी देणारी बातमी माझ्याच्याने सांगणे कदापि होणार नाही. त्यापेक्षा तुझे अंत:कालचे श्रीमुख पाहणे ही माझ्यासाठी अत्यंत सुखदायक गोष्ट आहे. ते सोडून समस्त प्रजाजनांना दु:खदायक बातमी देण्यासाठी मी द्वारकेला कसा जाईन. तुझी आज्ञा पाळायची तर जगाला महादु:ख द्यावे लागेल आणि जर तुझी आज्ञा पाळली नाही तर माझी रवानगी नरकात होईल. त्यापेक्षा तुझ्यासमोरच विष घेऊन हे जीवन संपवले तर मला विनासायास उत्तम अलौकिक गती मिळेल. अशाप्रकारे बोलणे करून, अगतिक झालेल्या दारुकाने श्रीकृष्णापुढे लोटांगण घातले. डोक्यावर भगवंतांचे पाय ठेवून घेतले आणि ते तो काही केल्या सोडायला तयार होईना. दारूकाच्या मनातील भाव जाणून भगवंतांचे मन कृपेने द्रवले. दारूकाच्या मनाची विकल अवस्था त्यांनी ओळखली आणि त्यामागची कारणमीमांसाही समजून घेतली. शोक आणि मोहाने दारूक ग्रस्त झाला होता. ह्यापूर्वी अशीच अवस्था कुरुक्षेत्रावर भारतीय युद्धाच्यावेळी अर्जुनाची झाली होती तेव्हा त्यांनी त्याचा शोक आणि मोह गीता सांगून नाहीसा केला होता. तसेच ते निजधामाला जाणार हे समजल्यावर उद्धवाचीही अर्जुनाप्रमाणे शोक आणि मोहाने ग्रस्त झाल्याने विदीर्ण अवस्था झाली होती. ते पाहून त्यांनी उद्धवाला उद्धवगीता सांगून शोक आणि मोहाने त्याच्या चित्ताला आलेली मलीनता घालवली. आत्ताही दारुकाची अवस्था अशीच शोकाकुल झाली होती. अर्जुन आणि उद्धव ह्या आपल्या अनन्य भक्तांना शोक आणि मोह ह्यातून बाहेर काढून त्यांना कर्तव्याची जाणीव करून देण्याचे ह्यापूर्वी केलेले काम आता आपल्याला पुन्हा करावे लागणार हे भगवंतांनी ओळखले. शोक आणि मोहाचे निर्द्लन कसे करण्याचे वर्म आता ते दारूकाला सांगणार आहेत. त्याचबरोबर त्याच्या कर्तव्याची जाणीवही ते त्याला करून देणार आहेत. ते म्हणाले आता मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. माझ्या धर्माचे लक्षण आता मी तुला सांगणार आहे. त्यातील तत्वांची जीवनात प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करायची हेही मी तुला सांगतो. त्यामुळे तू ब्रह्मज्ञानाने संपन्न होशील. दारूकाच्या निमित्ताने आपल्यालाही भगवंतांनी आपला उद्धार होण्यासाठी आपण काय काय करावे हे सांगितले आहे. ते आपण हृदयाच्या आतल्या कप्प्यात अगदी नीट जपून ठेवूयात आणि त्याप्रमाणे वागायची बुद्धी भगवंत आपल्याला देऊदेत अशी प्रार्थना करूयात. भगवंत दारूकाला म्हणाले, माझे ध्यान हृदयात नित्य करत असावे. त्यासाठी मुखातून माझे नाम नित्य घेत राहावे. माझ्या कथांचे, माझ्या लीलांचे सतत श्रवण करत रहावे. माझे पूजनही नित्य करावे. देवळात जाऊन माझ्या मूर्तीचे सदैव दर्शन घ्यावे. माझे तीर्थ प्राशन करावे. अत्यंत आदराने माझ्या प्रसादाचे भोजन करावे. मला साष्टांग नमस्कार घालावा. माझ्या भक्तांना अतिशय आनंदाने आलिंगन द्यावे. माझी अत्यंत प्रेमाने सेवा केल्याशिवाय अर्धा क्षणसुद्धा घालवू नये. अशी सेवा करत असताना सर्वाभूती असलेल्या माझ्या अस्तित्वाचे दर्शन घेत राहावे.
क्रमश: