भगवंतांना भक्ताचा विरह असह्य होत असतो

अध्याय एकोणतिसावा शुकमुनी परीक्षित महाराजांना म्हणाले, राजा उद्धवाला प्रत्यक्ष श्रीकृष्णाने उपदेश केला होता. त्या श्रीकृष्णाबद्दल उद्धवाला वाटणारे प्रेम हे शिष्याला सदगुरुंबद्दल किती आणि कसे प्रेम वाटावे ह्याचा एक आदर्श होता असे म्हंटलेस तरी चालेल. त्या प्रेमाचे शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य आहे. उद्धव जरी गुणातीत झाला असला तरी त्याचे गुरुचरणी अद्भुत प्रेम होते. त्याच्या दृष्टीने […]

भगवंतांना भक्ताचा विरह असह्य होत असतो

अध्याय एकोणतिसावा
शुकमुनी परीक्षित महाराजांना म्हणाले, राजा उद्धवाला प्रत्यक्ष श्रीकृष्णाने उपदेश केला होता. त्या श्रीकृष्णाबद्दल उद्धवाला वाटणारे प्रेम हे शिष्याला सदगुरुंबद्दल किती आणि कसे प्रेम वाटावे ह्याचा एक आदर्श होता असे म्हंटलेस तरी चालेल. त्या प्रेमाचे शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य आहे. उद्धव जरी गुणातीत झाला असला तरी त्याचे गुरुचरणी अद्भुत प्रेम होते. त्याच्या दृष्टीने सद्गुरु श्रीकृष्णनाथ मूर्तिमंत परब्रह्म होते. हरीच्या ठायी त्याची पूर्ण श्रद्धा असल्याने तो हरीपदाचा त्याग करू शकत नव्हता. प्रबुद्ध उद्धवाला ‘हरिमेधा’ असं म्हणतात. त्याचं कारण सांगतो. उद्धवाचे मन सदोदित हरीचेच ध्यान करत असे. त्याच्या हरीवरील प्रेमाची तऱ्हाच वेगळी होती. त्याच्या मनात सदैव मी काय केले की, माझ्या श्रीकृष्णाला समाधान वाटेल? हा विचार येत असे. ह्या प्रश्नाच्या सततच्या चिंतनामुळे त्याला इतर काही सुचतच नसे. त्यामुळे त्याच्या बुद्धीचे हरीने हरण केले होते असे म्हंटले तरी चालेल. त्यामुळे इतर कोणत्याही विषयात त्याची बुद्धी चालतच नव्हती. जो सदैव हरीचेच चिंतन करतो. त्याच्या चित्ताला इतर काही कामच उरलेले नसल्याने त्याच्या चित्ताचे हरी हरण करतो, असे म्हणतात. सर्व संतांना हा अनुभव येतोच येतो म्हणून हरीला चित्तचोर, असे विशेषण लावतात. संतांच्या मनात हरी सोडून इतर कोणताच विचार येत नसल्याने त्यांचे संसारासह इतर सर्व व्यवहार हरीच पहात असतो. त्यांचा संपूर्ण संसार हरी पार पाडतो. अशाप्रकारे उद्धवाची भगवंतांच्यावर सप्रेम श्रद्धा असल्याने त्याला हरीच्या ठायी कायम मुक्ती मिळाली आहे. तो ईश्वरस्वरूप झाला असल्याने त्याला हरीची बुद्धी लाभलेली आहे. अशा भक्ताला हरिमेधा असे म्हणतात. ईश्वर स्वत: गुणातीत असल्याने जे गुणातीत होतात ते ईश्वराला जाऊन मिळतात. गुणातीत होऊन ईश्वरी स्वरुपात मिसळलेल्या भक्तांनाही श्रीकृष्णाची भक्ती करायला आवडते. उद्धवाचा जन्म केवळ त्यासाठीच झालेला होता असे म्हंटलेस तरी चालेल परंतु त्या श्रीकृष्णांनीच उद्धवाला त्यांच्यापासून लांब जायला सांगितले आणि त्याचे द्वारकेतून प्रयाण निश्चित केले. ते सुद्धा दूर अशा बद्रिकाश्रमात! आता परिस्थिती अशी होती की, एकदा उद्धव द्वारकेतून निघाला की, पुन्हा त्यांची आणि श्रीकृष्णनाथांची भेट होणार नव्हती. श्रीकृष्णांच्या आज्ञेने उद्धवावर दु:खाचा पहाड कोसळला परंतु तो श्रीकृष्णांची आज्ञा डावलू शकत नसल्याने तेथून निघताना त्याचे भगवंतांवरील प्रेम उफाळून आले. निघताना त्याने श्रीकृष्णाला अत्यंत प्रेमाने प्रदक्षिणा घातली. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रु घळाघळा वाहू लागले. त्या अश्रंgनी श्रीकृष्णाचे दोन्ही चरण भिजून गेले. खरं बघितलं तर प्रत्येकाला कुणा ना कुणाबद्दल स्नेह वाटत असतो पण त्यात मन गुंतलेले असल्याने ती जवळीक बंधनास कारणीभूत होऊन बाधक ठरते. त्यामुळे विवेकभाव नाहीसा होऊन स्वार्थ बळावतो परंतु श्रीकृष्णाबद्दल उद्धवाला वाटणारा स्नेह सुखदायक स्नेहाळू असल्याने त्यात स्वार्थाचा लवलेश नव्हता. उद्धवाच्या दृष्टीने गुरु आणि परब्रह्म दोनी एकच होते. गुरु आणि परब्रह्म एकच आहे असे सर्वांनाच वाटत असते परंतु उद्धवाने त्याची अनुभूती घेतली होती. त्यामुळे निराकार निर्गुण असलेले परब्रह्म त्याने श्रीकृष्णाच्या रूपाने सगुण साकार झाल्याची अनुभूती घेतली होती. समोर मनुष्य रुपात दिसणारा श्रीकृष्ण हेच परब्रह्म असून ते सगुण रुपात उभे आहे हे त्याने ओळखलेले होते. श्रीकृष्णाचा कायम सुखाची अनुभूती देणारा स्नेह उद्धवाला अत्यावश्यक वाटत होता परंतु त्याच श्रीकृष्णाने त्याला दूर बद्रिकाश्रमात जायची आज्ञा केल्याने उद्धव दु:खाने व्हीवळत होता. अर्थात भगवंतांचीही अशीच स्थिती होती कारण लाडक्या भक्ताचा विरह त्यांनाही असह्य होत असतो.
क्रमश:

Go to Source