अबकारी अधिकाऱ्यांच्या हाती मोठे घबाड

काकतीनजीक 37 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त : 30 लाखांचा ट्रकही ताब्यात, दोघा संशयितांना अटक बेळगाव : गोव्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक करण्यात येत होती. अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला असून पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. तब्बल 37 लाखांची दारू आणि 30 लाखांचा ट्रक असा एकूण 67 लाखांचा […]

अबकारी अधिकाऱ्यांच्या हाती मोठे घबाड

काकतीनजीक 37 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त : 30 लाखांचा ट्रकही ताब्यात, दोघा संशयितांना अटक
बेळगाव : गोव्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक करण्यात येत होती. अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला असून पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. तब्बल 37 लाखांची दारू आणि 30 लाखांचा ट्रक असा एकूण 67 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील काकतीजवळ असलेल्या सुरभी ढाब्याजवळ ही कारवाई करण्यात आली. 16 चाकी ट्रकमधून मशरुम (अळंबी) बियाणांच्या खाली लपवून ही दारू नेण्यात येत होती. रात्री अबकारी खात्याच्या पोलिसांनी संशय आल्याने त्या ट्रकची झडती घेतली. त्यामध्ये 900 बॉक्स दारू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ट्रकचालक आदम खुतबुद्दीन मुगुटखान (वय 28) रा. कडबी शिवापूर, ता. सौंदत्ती आणि असीफ रेहमानसाब यलीगार (वय 23) रा. होनकट्टी, ता. व जि. बागलकोट यांना अटक करण्यात आली आहे.
गोव्याहून ट्रक क्रमांक केए 22, डी 3189 हा ट्रक कोल्हापूरकडे जात होता. त्यावेळी अबकारी निरीक्षकांनी त्याची तपासणी केली. यावेळी चालकाने त्यामध्ये मशरुमची बियाणे असल्याचे सांगितले. त्याची अधिक चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. माती भरून त्यामध्ये मशरुमची बियाणे घालण्यात आली होती. त्याच्या खाली मद्याचे 900 तर बियरचे 300 बॉक्स असे एकूण 1200 बॉक्स आढळून आले. संपूर्ण ट्रक रिकामा करण्यात आला. त्यामध्ये ही गोवा बनावटीची दारू आढळली. या ट्रकमध्ये 7,776 लिटर मद्य तर 3600 लिटर गोवा बियर असल्याचे अबकारी विभागाने स्पष्ट केले. याप्रकरणी ट्रकमालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास अबकारी पोलिसांनी सुरू केला आहे. अप्पर अबकारी आयुक्त एन. मंजुनाथ, अबकारी संयुक्त आयुक्त फिरोजखान किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी उपायुक्त वनजाक्षी, अबकारी अधीक्षक विजयकुमार जे. हिरेमठ, रवी मुरगोड, मंजुनाथ गलगली, सुनील पाटील, महादेवप्पा कटग्याण्णावर यांनी ही कारवाई केली आहे.
अबकारी विभाग सतर्क
यापूर्वीही प्लायवूड व कंटेनरमधून दारू वाहतूक करण्यात आली होती. तोही डाव अबकारी पोलिसांनी हाणून पाडला होता. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही दारू वाहतूक होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून दारू तस्करी केली जात आहे. मात्र, अबकारी विभागाने सतर्क राहून त्यांचे डाव हाणून पाडले आहेत. दारू पकडल्याची माहिती परिसरात पसरताच ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Go to Source