तापमान वाढीचे संकट कायम

ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम गेल्यावर्षी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवला होता. सदरचा परिणाम आगामी पुढील पाच वर्षातसुद्धा समस्त भारतीयांना झेलावा लागणार आहे. आगामी काळामध्ये तापमानामध्ये 1.5 डिग्री सेल्सियस इतकी वाढ  दिसून येणार आहे. या वाढीचे परिणाम फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील इतर देशांमध्येसुद्धा दिसणार आहेत. या संदर्भातला अंदाज जागतिक हवामान संघटनेने अलीकडेच मांडला आहे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये […]

तापमान वाढीचे संकट कायम

ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम गेल्यावर्षी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवला होता. सदरचा परिणाम आगामी पुढील पाच वर्षातसुद्धा समस्त भारतीयांना झेलावा लागणार आहे. आगामी काळामध्ये तापमानामध्ये 1.5 डिग्री सेल्सियस इतकी वाढ  दिसून येणार आहे. या वाढीचे परिणाम फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील इतर देशांमध्येसुद्धा दिसणार आहेत. या संदर्भातला अंदाज जागतिक हवामान संघटनेने अलीकडेच मांडला आहे.
अलीकडच्या काही दिवसांमध्ये भारताची राजधानी असणाऱ्या नवी दिल्लीमध्ये तापमानाचा पारा 52 डिग्री सेल्सियस इतक्या विक्रमी स्तरावर पोहोचला होता. तापमान फक्त दिल्लीतच वाढले होते अशातला भाग नाही. इतर शहरांमध्येसुद्धा अगदी दक्षिणेतील शहरांपासून ते उत्तरेतील शहरांमध्ये तापमान वाढीला सामान्यांना सामोरे जावे लागले आहे. लोकसभेच्या निवडणूक काळात मतदानाच्यादिवशी उष्माघाताने उत्तर भारतामध्ये काही जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. प्रमाणापेक्षा अधिक तापमानामुळे सामान्यांचे बळी गेले असल्याचे दिसून आले आहे. पुढील पाच वर्षाच्या काळामध्ये एखाद्या वर्षामध्ये तापमानाचा पारा वर म्हटल्याप्रमाणे 1.5 डिग्री सेल्सियसने वाढून विक्रम करू शकतो, असे म्हटले जात आहे.
2023 हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंदले गेले आहे. हाच सिलसिला यावर्षीसुद्धा राहिला तर नवल वाटायला नको. 2015 मध्ये विविध देशांनी एकत्रित येऊन तापमान वाढ रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. तापमानामध्ये 2 डिग्री सेल्सियस इतकी घट करण्यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले. याबाबतीत जागतिक स्तरावरील देशांनी दाद देत उपाययोजनांचा अवलंब सुरु केला आहे. जागतिक तापमान वाढीमुळे अनेक परिणाम समोर आलेले आहेत. जबरदस्त दुष्काळ, ढग फुटी सदृश्य पाऊस, पूर, समुद्राच्या पातळीत होणारी वाढ, वादळे आणि उष्णतेची लाट अशा प्रकारचे परिणाम ग्लोबल वार्मिंगमुळे दिसून आलेले आहेत.
हरित वायू प्रदूषण 43 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट 2030 पर्यंत ठरविण्यात आलेले आहे. त्याबाबतीत आता सर्वच देशांनी गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे असणार आहे. जगातील पृष्ठभागावरील तापमानाने 1.15 डिग्री सेल्सियस इतकी वाढ नोंदवून नवसंकट उभं केलेलं आहे. कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यांच्या प्रदूषणामुळे जागतिक तापमानावर परिणाम होताना दिसत आहे.  युरोपमधील वातावरण संबंधित एजन्सी कोपरनिकस यांनीसुद्धा पृथ्वीचे तापमान 1.5 डिग्री सेल्सियसने वाढल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. जानेवारीमध्ये सदरचे तापमान हे वरीलप्रमाणे वाढल्याची नोंद युरोपमध्ये झाली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून तापमान वाढीबाबत शास्त्रज्ञ आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ञांकडून वेळोवेळी उपाययोजना करण्यासंदर्भात इशारे देण्यात आले होते. मात्र या इशाऱ्यांच्या बाबतीत विविध देशांनी फारसे लक्ष दिल्याचे दिसून आले नाही. जर्मनीमधील पोस्टडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेंट इम्पॅक्ट रिसर्च यांनी केलेल्या संशोधनानुसार वातावरण बदलामुळे जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्थेला 2049 पर्यंत 38 ट्रिलीयन डॉलर्स इतक्या रकमेचा फटका बसू शकतो. याची दखल घेऊन भारताने आता कार्बनचे प्रमाण कमी करण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. वृक्ष लागवडीसारखे कार्यक्रम घेतले पाहिजेत. वाहनांचे प्रदुषण कमीत कमी करण्यासाठी पावले उचलली जायला हवीत. यासाठी इलेक्ट्रीक वाहनांचा वापर करण्याची गरज असणार आहे. सरकारने या वाहनांच्या निर्मितीसाठी पीएलआयसारखी योजना कंपन्यांसाठी आणली आहे. याचा फायदा उठवत कंपन्याही इलेक्ट्रीक गटातल्या दुचाकी, चारचाकी वाहने बनवण्यासाठी धडपडत आहेत. यांचा वापर हळुहळू भारतात वाढत आहे. सरकारने या वाहनांच्या किमती कमी केल्यास यांचा वापर आतापेक्षा दुप्पट वाढू शकेल. भारतात यंदादेखील विविध राज्यांमध्ये उष्णतेची लाट दिसून आली. याचा फायदा थंड पेय बनविणाऱ्या कंपन्यांनी निश्चितच उठवला आहे. पूर्व, उत्तर व मध्य भारतामध्ये उन्हाळा एवढा तीव्र होता की, काहींना उष्माघाताच्या धक्क्याने जीवही गमवावा लागला होता. या भागामध्ये ग्लुकोजची मागणी मोठ्या प्रमाणात राहिली होती. हे आणखी 5 वर्षे तरी असेच चालणार आहे, तेव्हा आपण आतापासून या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहायला हवे.