जनसेवा करण्याची संधी द्या

उमेदवार प्रियांका जारकीहोळी : कागवाड मतदारसंघात प्रचार बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढवत आहोत. दि. 7 मे रोजी होणाऱ्या मतदान दिनी मतदारांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देऊन मतदान करून आपणाला जनसेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. चिकोडी लोकसभा मतदारसंघात कागवाड विधानसभा मतदारसंघातील जुगुळ, शिरगुप्पी, कागवाड, […]

जनसेवा करण्याची संधी द्या

उमेदवार प्रियांका जारकीहोळी : कागवाड मतदारसंघात प्रचार
बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढवत आहोत. दि. 7 मे रोजी होणाऱ्या मतदान दिनी मतदारांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देऊन मतदान करून आपणाला जनसेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. चिकोडी लोकसभा मतदारसंघात कागवाड विधानसभा मतदारसंघातील जुगुळ, शिरगुप्पी, कागवाड, उगार बी. के., ऐनापूर, मोळे आदी गावांमध्ये प्रचार करून आयोजित सभेमध्ये त्या बोलत होत्या. राज्यातील काँग्रेस सरकारने नेहमीच गोरगरिबांची साथ दिली आहे. महिलांना आर्थिकरित्या सबल करण्यासाठी सरकारकडून गृहलक्ष्मी योजना जारी करण्यात आली आहे. या माध्यमातून महिला सबलीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. दुष्काळ परिस्थितीमध्ये राज्य सरकारने जारी केलेल्या पाच गॅरंटी योजना राज्यातील जनतेसाठी वरदान ठरल्या आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान सरकारने जाहीर केलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे. यासाठी मतदारांनी काँग्रेस पक्षाला पाठेंबा देऊन राज्य सरकारला अधिक बळकट करावे. केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाला सत्तेत आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी मतदारसंघाच्या विकासाकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मतदार त्यांना नाकारत आहेत. राज्यात दुष्काळ परिस्थिती असतानाही भाजपच्या खासदारांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही. यासाठी मतदारांनी लोकहिताचे निर्णय घेणाऱ्या, सर्वसामान्यांच्या हिताची बाजू मांडणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसला पाठेंबा द्यावा, असे आवाहन प्रियांका यांनी केले. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी नेहमीच विकासकामांना प्राधान्य दिले आहे. मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य यावर भर दिला आहे. सतीश जारकीहोळी फौंडेशनच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेगवेगळ्या विषयांचे प्रशिक्षण देऊन स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. अशाप्रकारे सामाजिक कार्यामध्ये आपण कार्यरत असून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी महिला संघटनांकडून प्रियांका यांना भरघोस पाठिंबा देण्यात आला. ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत केले. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला.