पाणीटंचाई निवारणासाठी स्वत:चा टँकर घ्या!

त्रैमासिक आढावा बैठकीत पालकमंत्री सतीश जारकीहोळींची ग्राम. पं. ना सूचना : विविध विकासकामांचा घेतला आढावा बेळगाव : उन्हाळ्यात पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, याबरोबरच वीजपुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. शुक्रवारी सुवर्णविधानसौधमध्ये झालेल्या त्रैमासिक आढावा बैठकीत अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी वरील सूचना केली आहे. सतीश […]

पाणीटंचाई निवारणासाठी स्वत:चा टँकर घ्या!

त्रैमासिक आढावा बैठकीत पालकमंत्री सतीश जारकीहोळींची ग्राम. पं. ना सूचना : विविध विकासकामांचा घेतला आढावा
बेळगाव : उन्हाळ्यात पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, याबरोबरच वीजपुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. शुक्रवारी सुवर्णविधानसौधमध्ये झालेल्या त्रैमासिक आढावा बैठकीत अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी वरील सूचना केली आहे. सतीश जारकीहोळी यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या विकासकामांचा खातेनिहाय आढावा घेतला. अपंगांसाठी तीनचाकी वाहनांचे वितरण करावे, दरवर्षी प्राधान्यक्रमाने किमान दोन जिल्ह्यात तरी तीन चाकींचे वितरण व्हावे, अशी सूचना केली आहे. कुडची विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात एकदा मंजूर झालेले पॉलिहाऊस नव्याने मंजूर करून लाभार्थींना हस्तांतरित करण्यात आले आहे. हा प्रकार लक्षात येताच याची गांभीर्याने दखल घेत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना केली. इमारत बांधकाम पूर्ण झालेले माता-बालक इस्पितळे पाच वर्षांनंतरही सुरू झाली नाहीत. पुढील बैठकीच्या आधी अशी इस्पितळे सुरू करावीत, अशी सूचना त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना केली. दरवर्षी किमान दोन अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत. असे झाल्यास चार-पाच वर्षात सर्व अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत चालतील, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीचा टँकर असल्यास पाणीपुरवठा करणे शक्य
उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी सर्व ग्राम पंचायतींना स्वत: टँकर खरेदी करण्याची सूचना याआधीच्या बैठकीत देण्यात आली होती. 280 ग्राम पंचायतींनी टँकर खरेदी केले आहेत. उर्वरित ग्रा. पं. नीही लवकरात लवकर खरेदी करावेत. स्वत:चे टँकर असले तरच उन्हाळ्यात सुरळीत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. या बैठकीत आमदार राजू सेठ व महांतेश कौजलगी यांनी झोपडपट्टी विकास मंडळाच्या कामकाजावर आक्षेप घेतला. त्यांनी हाती घेतलेल्या निवासी योजनांमध्ये पायाभूत सुविधा नाहीत, याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यामुळेच योजना पूर्ण होण्यास विलंब होत असल्याचा आरोपही करण्यात आला. जिल्ह्यातील चिकोडी, गोकाकसह इतर ठिकाणीही क्रीडा शाळा सुरू करण्याची सूचना क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली.
दहावी-बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जादार बसेस सोडा
दहावी-बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी जादा बसेस पुरविण्याची सूचना परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली. सध्या 32 बसेस विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात आल्या असून अतिरिक्त बसेस पुरविण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारने जारी केलेल्या गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासंबंधी अधिकाऱ्यांनी जागृती करावी, अशी सूचना त्यांनी केली.
पावसाळ्यापूर्वी कॅनॉलमधील गाळ काढण्याची सूचना
यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी पावसाळ्यापूर्वी कॅनॉलमधील गाळ काढण्याची सूचना केली. तर बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी परराज्यातील काही जण जिल्ह्यात चारा खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होणार आहे. टंचाई दूर करण्यासाठी आधीच चारा संग्रहीत करावा, असा सल्ला दिला. यावेळी खासदार मंगला अंगडी, आमदार राजू सेठ, दुर्योधन ऐहोळे, विठ्ठल हलगेकर, बाबासाहेब पाटील, महेंद्र तम्मण्णावर, विधान परिषद सदस्य एम. नागराज, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, महानगरपालिका आयुक्त पी. एन. लोकेश आदी उपस्थित होते.
बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाची कामे लवकर पूर्ण करा
शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गासह अनेक कामांना विलंब होत आहे. तेगूरपासून देसूरपर्यंतचे काम सुरू आहे. देसूर ते करवीनकोप्पपर्यंत दीडशे एकरची सुपीक जमीन जाणार आहे. त्यामुळे मार्ग बदलण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. अतिरिक्त भरपाई देण्यासाठी एक बैठक ठरविण्यात आली होती. मात्र, ती झाली नाही. 608 पैकी 444 कामे सुरू झाली आहेत. दीडशे एकर जमीन संपादन करण्यासंबंधी समस्या उद्भवली आहे. लवकरात लवकर कामे सुरू करण्याची सूचना खासदार मंगला अंगडी यांनी केली.