गणेशपुरी हल्ल्यातील तिघे गजाआड

मुख्य संशयित आरकेसह तिघे फरार : अटकेतील तिघांना 7 दिवसांची कोठडी म्हापसा : म्हापसा गणेशपुरी येथे गुऊवारी झालेल्या प्राणघातक खुनी हल्ल्यात अहमद देवडी व संदेश साळकर हे जबर जखमी झाले असून अहमद देवडी याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याची माहिती गोमेकॉतील डॉक्टरांनी दिली. दुसऱ्या बाजूने हल्ल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून मुख्य संशयित रामकृष्ण भालेकर उर्फ आर. […]

गणेशपुरी हल्ल्यातील तिघे गजाआड

मुख्य संशयित आरकेसह तिघे फरार : अटकेतील तिघांना 7 दिवसांची कोठडी
म्हापसा : म्हापसा गणेशपुरी येथे गुऊवारी झालेल्या प्राणघातक खुनी हल्ल्यात अहमद देवडी व संदेश साळकर हे जबर जखमी झाले असून अहमद देवडी याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याची माहिती गोमेकॉतील डॉक्टरांनी दिली. दुसऱ्या बाजूने हल्ल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून मुख्य संशयित रामकृष्ण भालेकर उर्फ आर. के. व त्याचे दोघे साथीदार अद्याप फरार आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मंथन च्यारी, श्रीधर किल्लेदार, अभिषेक पुजारी या तिघांचा समावेश आहे. म्हापसा पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या सहा तासात संशयितांना गजाआड करण्यात यश मिळविले आहे. या तिघाही संशयितांना येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
परप्रांतीय दारुड्यांचे गैरप्रकार
गणेशपुरी, एकतानगर येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात परप्रांतीय नागरिकांचा भरणा मोठ्या प्रमाणात वाढला असून या भागात रात्रीच्यावेळी उशिरापर्यंत हे परप्रांतीय युवक रस्त्याच्या बाजूलाच बसून दारु ढोसतात. शिवाय या बाजूने ये जा करणाऱ्यांशी हुज्जत घालून दादागिरी करतात. दारुच्या बाटल्या रस्त्यावर फोडतात. असे प्रकार अनेकदा पहायला मिळाले आहेत, असे स्थानिकांनी सांगितले.
महिलांच्या छेडछाडीचे प्रकार
महिलावर्ग, मुलीची छेडछाडही करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. स्थानिक लोक त्यांना घाबरुन त्यांच्या विरोधात कुणी तक्रार द्यायला पुढे येत नाहीत, म्हणून त्यांचे आयते फावले आहे. काहीजण आपण ‘गल्ली के दादा’ असल्याच्या गुर्मीत फिरत असतात. या भागात पोलिसांकडून पेट्रोलिंगगही होत नाही. त्यामुळे रात्रीपासून पहाटेपर्यंत हे परप्रांतीय खुलेआम रस्त्यावर बसून दारु ढोसत असतात. या भागात भुरट्या चोऱ्यानाही ऊत आल्याचे सांगण्यात आले.
भ्रमणध्वनी, लोखंडी सळी जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरुन तीन भ्रमणध्वनी संच तसेच लोखंडी सळ्या जप्त केल्या आहेत. मुख्य संशयित रामकृष्ण भालेकर उर्फ आर.के. अद्याप फरारी असून पोलीस त्याच्या मार्गावर आहे. पोलिसांनी श्वानपथक तसेच ठसे तज्ञांचा वापर पंचनाम्यावेळी केला. म्हापसा पोलिसांनी भा.दं.संच्या 307 व 34 कलमांतर्गत प्राणघातक हल्याचा गुन्हा नोंद केला आहे.