खेळ जुनाच ओळख नवी ! रोलर स्पीड स्केटिंग

रोलर स्पीड स्केटिंग…एक वेगवान क्रीडाप्रकार, ज्यात काही वेळा स्केटर ताशी 50 किलोमीटरपर्यंतचा वेग गाठतो…पहिली रोलर स्पीड स्केटिंग जागतिक स्पर्धा 1937 मध्ये इटलीतील मोंझा येथे आयोजित करण्यात आली होती. त्याच्या पुढील वर्षी लंडननं ‘ट्रॅक रोलर स्पीड स्केटिंग जागतिक स्पर्धेचं यजमानपद भूषविलं…बार्सिलोना इथं 1992 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ‘क्वॉड स्केट्स’वर खेळली जाणारी ‘रिंक हॉकी’ प्रात्यक्षिक खेळ म्हणून झळकली […]

खेळ जुनाच ओळख नवी ! रोलर स्पीड स्केटिंग

रोलर स्पीड स्केटिंग…एक वेगवान क्रीडाप्रकार, ज्यात काही वेळा स्केटर ताशी 50 किलोमीटरपर्यंतचा वेग गाठतो…पहिली रोलर स्पीड स्केटिंग जागतिक स्पर्धा 1937 मध्ये इटलीतील मोंझा येथे आयोजित करण्यात आली होती. त्याच्या पुढील वर्षी लंडननं ‘ट्रॅक रोलर स्पीड स्केटिंग जागतिक स्पर्धेचं यजमानपद भूषविलं…बार्सिलोना इथं 1992 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ‘क्वॉड स्केट्स’वर खेळली जाणारी ‘रिंक हॉकी’ प्रात्यक्षिक खेळ म्हणून झळकली होती. त्यानिमित्तानं प्रथमच ऑलिम्पिकच्या मंचावर ‘रोलर स्केट्स’वरील खेळाडूंनी स्पर्धा केली…

रोलर स्पीड स्केटिंगच्या शर्यती सहसा बाहेर आणि कधी कधी इनडोअर आयोजित केल्या जातात. त्यात सहभागी होणाऱ्या स्केटर्सच्या इनलाइन स्केट्सवर जास्तीत जास्त पाच चाकांना परवानगी असते आणि चाकांचा व्यास 110 मिलिमीटरपेक्षा जास्त असू शकत नाही…
फक्त मॅरेथॉनसाठी स्केट्समध्ये 125 मिलिमीटर व्यासाची चाके असू शकतात. यात ब्रेकला परवानगी नसते. सामूहिक सुरुवात, वेलोड्रोमसारख्या भिंती आणि 200 मीटर्सचा ट्रॅक यासह अनुकूल स्थितीसाठी सतत केली जाणारी धडपड यामुळं ही शर्यत रोमांचक होते आणि अनेकदा फोटो फिनिशद्वारे त्याचा निकाल लागतो…
रोलर स्पीड स्केटिंगमध्ये पुरुष आणि महिला विभागात प्रत्येकी 14 खेळाडू तीन आवश्यक शर्यतीत भाग घेतात. यात 500 मीटर्स, 1000 मीटर्स आणि 5000 मीटर्सच्या शर्यतीचा समावेश असतो. प्रत्येक शर्यतीतील विजेत्याला 14 गुण दिले जातात. त्यानंतरच्या प्रत्येक स्थानावरील स्पर्धकाला एकेक गुण कमी मिळून 14 व्या स्थानासाठी एक गुण दिला जातो. तीन शर्यतींमध्ये प्रत्येक स्केटरनं जमा केलेल्या एकूण गुणांनुसार अंतिम क्रमवारी ठरवली जाते…
रोलर स्पीड स्केटिंगचं 2014 साली नानजिंग इथं झालेल्या उन्हाळी युवा ऑलिंपिकमध्ये प्रात्यक्षिक खेळ म्हणून प्रथम दर्शन घडलं. चीनमध्ये त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यानं ब्युनोस आयर्स इथं 2018 मध्ये झालेल्या उन्हाळी युवा ऑलिंपिक खेळांमध्ये पदार्पण केलं…
ग्वांगझू, चीन इथं 2010 मध्ये झालेल्या स्पर्धेपासून रोलर स्केटिगनं आशियाई खेळांमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर भारतानं या प्रकारात पदकांची प्राप्ती केली ती गेल्या वर्षी. त्यात भारतीय पुऊष आणि महिलांच्या स्पीड स्केटिंग 3000 मीटर्स रिले संघांनी कांस्यपदकं पटकावली…

– राजू प्रभू