भारत अ संघाच्या विजयात गायकवाड, राणाची चमक
निशांत सिंधू सामनावीर : मालिकेत विजयी आघाडी
वृत्तसंस्था/ राजकोट
तीन सामन्यांच्या अनाधिकृत वनडे मालिकेत रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाचा 9 गड्यांनी पराभव करत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. ऋतुराज गायकवाडने नाबाद अर्धशतक झळकाविले तर सामनावीर निशांत सिंधू आणि हर्षित राणा यांनी प्रभावी गोलंदाजी केली.
या सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण निशांत सिंधू, हर्षित राणा व प्रसिद्ध कृष्णा यांच्या अचूक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका अ संघाचा डाव 30.3 षटकात 132 धावांत आटोपला. त्यानंतर भारत अ ने 27.5 षटकात 1 बाद 135 धावा जमवित हा सामना 9 गड्यांनी जिंकला.
दक्षिण आफ्रिका अ संघाच्या डावामध्ये प्रेटोरियसने 3 चौकारांसह 21 तर मूनसॅमीने 34 चेंडूत 7 चौकारांसह 33, फॉरेस्टरने 3 चौकारांसह 22, पॉटगेटरने 1 चौकारासह 23 तर सुब्रायनने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिका अ चा निम्मा संघ केवळ 73 धावांत बाद झाला होता. भारत अ संघातर्फे निशांत सिंधूने 16 धावांत 4, हर्षित राणाने 21 धावांत 3, प्रसिद्ध कृष्णाने 21 धावांत 2 तर तिलक वर्माने 12 धावांत 1 गडी बाद केला. दक्षिण आफ्रिका अ संघाच्या डावामध्ये एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यांच्या डावामध्ये 17 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीने भारत अ च्या डावाला बऱ्यापैकी सुरुवात करुन दिली. या जोडीने 49 चेंडूत 53 धावांची भागिदारी केली. दक्षिण आफ्रिका अ संघाच्या सिपमेलाने अभिषेक शर्माला प्रेटोरियसकरवी झेलबाद केले. त्याने 22 चेंडूत 6 चौकारांसह 32 धावा जमविल्या. कर्णधार तिलक वर्मा व ऋतुराज गायकवाड यांनी 27.5 षटकात संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. गायकवाडने 83 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 68 तर तिलक वर्माने 62 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 29 धावा जमविल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य 82 धावांची भागिदारी केली. भारत अ संघाच्या डावामध्ये 17 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिका अ च्या सिपमेलाने 33 धावांत 1 गडी बाद केला. भारत अ संघाने या मालिकेतील पहिले सलग 2 सामने जिंकल्याने आता उभय संघातील तिसरा सामना औपचारिक राहिल. भारत अ संघ आता या मालिकेत दक्षिण आफ्रिका अ संघाचा व्हाईटवॉश करण्यासाठी प्रयत्न करेल.
संक्षिप्त धावफलक – द. आफ्रिका अ 30.3 षटकात सर्वबाद 132 (मूनसॅमी 33, प्रेटोरियस 21, फॉरेस्टर 22, पॉटगेटर 23, सुब्रायन 15, निशांत सिंधू 4-16, हर्षित राणा 3-21, प्रसिद्ध कृष्णा 2-21, तिलक वर्मा 1-12), भारत अ 27.5 षटकात 1 बाद 135 (ऋतुराज गायकवाड नाबाद 68, तिलक वर्मा नाबाद 29, अभिषेक शर्मा 32, सिपमेला 1-33).
Home महत्वाची बातमी भारत अ संघाच्या विजयात गायकवाड, राणाची चमक
भारत अ संघाच्या विजयात गायकवाड, राणाची चमक
निशांत सिंधू सामनावीर : मालिकेत विजयी आघाडी वृत्तसंस्था/ राजकोट तीन सामन्यांच्या अनाधिकृत वनडे मालिकेत रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाचा 9 गड्यांनी पराभव करत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. ऋतुराज गायकवाडने नाबाद अर्धशतक झळकाविले तर सामनावीर निशांत सिंधू आणि हर्षित राणा यांनी प्रभावी गोलंदाजी केली. या सामन्यात दक्षिण […]
