मोकाट कुत्री पाहताहेत सहनशीलतेचा अंत

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये निष्कारण भरडताहेत लहान मुले-नागरिक प्रतिनिधी/ बेळगाव उखडलेले रस्ते, ठिकठिकाणी खड्डे पाण्याची टंचाई, अनियमित बससेवा, खंडित वीजपुरवठा अशा समस्यांना सामोरे जाणाऱ्या बेळगावकरांच्या सहनशीलतेचा मोकाट कुत्र्यांनी अंत पाहिला आहे. वर्षानुवर्षे कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये निष्पाप लोक लक्ष्य ठरत आहेत. कुत्र्यांचे निर्बिजीकरण, मोकाट कुत्र्यांना आश्रयस्थान अशा सर्व घोषणा फक्त आरंभापुरत्या मर्यादित झाल्या आहेत. त्यामुळे लहान मुले आणि […]

मोकाट कुत्री पाहताहेत सहनशीलतेचा अंत

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये निष्कारण भरडताहेत लहान मुले-नागरिक
प्रतिनिधी/ बेळगाव
उखडलेले रस्ते, ठिकठिकाणी खड्डे पाण्याची टंचाई, अनियमित बससेवा, खंडित वीजपुरवठा अशा समस्यांना सामोरे जाणाऱ्या बेळगावकरांच्या सहनशीलतेचा मोकाट कुत्र्यांनी अंत पाहिला आहे. वर्षानुवर्षे कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये निष्पाप लोक लक्ष्य ठरत आहेत. कुत्र्यांचे निर्बिजीकरण, मोकाट कुत्र्यांना आश्रयस्थान अशा सर्व घोषणा फक्त आरंभापुरत्या मर्यादित झाल्या आहेत. त्यामुळे लहान मुले आणि नागरिक मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये निष्कारण भरडले जात आहेत.
मोकाट कुत्र्यांची समस्या आजची नाही. एखाद दुसऱ्या व्यक्तीचा कुत्र्याने चावा घेतला तर प्रशासन आणि महानगरपालिका त्याकडे लक्षही देत नाही. एकाचवेळी अनेकांचा कुत्र्यांनी चावा घेतला आणि माध्यमांमध्ये त्याची चर्चा सुरू झाली, लोकांनी आवाज उठवला तर तात्पुरती उपाययोजना होते. परंतु, मोकाट कुत्र्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यामध्ये महानगरपालिकेला पूर्ण अपयश आले आहे.
प्राणीदया संघटना, प्राणीकल्याण मंडळ कोणती भूमिका घेणार आहे?
कुत्र्यांना दगड मारला, मारहाण केली किंवा त्यांना औषध देऊन मारण्याचा प्रयत्न झाला तर प्राणीदया संघटना कार्यकर्ते पेटून उठतात आणि कुत्र्यांच्या बाजूने उभे राहतात. भूतदया दाखवणे यामध्ये गैर काहीच नाही. परंतु, जेव्हा मोकाट कुत्री निष्पाप नागरिकांचा चावा घेतात, लहान मुलांचे हाल करतात, त्याबाबत प्राणीदया संघटना व प्राणीकल्याण मंडळ कोणती भूमिका घेणार आहेत? हेही एकदा स्पष्ट व्हायला हवे.
वाहनांच्या सुरक्षिततेसाठी पाळीव कुत्र्यांना सोडले जाते मोकाट
दुसरीकडे मोकाट कुत्र्यांना पाळीव कुत्रे म्हणून दाखवण्याची मखलाशी सुरू आहे. शहरातील बहुसंख्य सर्व्हिस रोडवर वाहने पार्क केली जात आहेत. हा सर्व्हिस रोड सर्वांसाठी आणि सार्वजनिक असला तरी काही जणांनी तो आपल्याच मालकीचा असे भासवून संपूर्ण रोडवर अतिक्रमण केले आहे. अशा रोडवर खासगी वाहने लावली जातात. रात्रीच्यावेळी या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी पाळीव कुत्र्यांना मोकळे सोडले जाते. त्याचबरोबर मोकाट कुत्र्यांच्या गळ्यातही पट्टा घालून ती पाळीव कुत्री असल्याचे भासवून आपल्या वाहनांचे आणि मालमत्तेचे रक्षण होण्यासाठी रात्री त्यांना मोकळे सोडले जाते.
टिळकवाडी परिसरात या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून नागरिकांच्या झोपेचे खोबरे केले आहे. यासंदर्भात महानगरपालिका, पोलीस स्थानक येथे कळवूनही काहीही कारवाई होत नसल्याने नागरिक वैतागले आहेत. दुसरी अडचण म्हणजे रात्रीच्यावेळी ही कुत्री नागरिकांच्या झोपेचे खोबरे करतात. वर्क फ्रॉम होम या पद्धतीने काम करणाऱ्यांना कुत्र्यांचा उपद्रव होतो. आजारी आणि लहान मुलांच्या झोपेचा विचारही केला जात नाही.
आता याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदविण्याचा विचार नागरिक करत आहेत. मुळात आपल्या खासगी वाहनांच्या सुरक्षिततेसाठी कुत्र्यांना मोकाट सोडण्याचा प्रकार सर्वत्र सुरू आहे. अशा लोकांवर कारवाई होणार आहे की नाही? हा प्रश्न नागरिक करत आहेत. अशा खासगी वाहनांनाच लक्ष्य केल्यास कुत्र्यांचा बंदोबस्त आपोआप होईल. परंतु, अद्याप नागरिक सहन करत आहेत. मात्र, ही सहनशीलता लवकरच संपुष्टात येईल, याची नोंद संबंधितांनी घेण्याची गरज आहे.
कुत्री रात्रीच्यावेळी भुंकून भुंकून झोपमोड करतात. त्यामध्ये गाड्यांच्या आवाजाचीही भर पडते आणि महानगरपालिकेचे लोक सकाळी येतात तेव्हा कुत्री गायब झालेली असतात. त्यामुळे या समस्येवर कसा उपाय शोधायचा? असा प्रश्न पडला आहे. सातत्याने मोकाट कुत्र्यांचे हल्ले सुरू झाल्यास माणसाचा जीव महत्त्वाचा, हे लक्षात घेऊन कुत्र्यांचा बंदोबस्त नागरिकांनी स्वत:च केल्यास प्राणीदया संघटनांनी विरोध करण्याचे कारण नाही. एकूणच मोकाट कुत्री हा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून प्रशासनाने त्यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.