बेळगाव-जांबरेमार्गे मोपा विमानतळ रस्ता चौपदरी करा
भारत लाईव्ह न्यूज मीडिया समूह प्रमुख, सल्लागार संपादक किरण ठाकुर यांची नितीन गडकरींकडे मागणी : प. महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक विकासाला चालना मिळणार
चंदगड : पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील विकासाच्यादृष्टीने बेळगाव, चंदगड, जांबरेमार्गे मोपा विमानतळ हा रस्ता चारपदरी करावा, अशी मागणी भारत लाईव्ह न्यूज मीडिया समूहप्रमुख,सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असून या रस्त्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ गोव्यातील मोपा येथे उभारण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील हवाई प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने बेळगाव ते मोपा असा 90 कि.मी. अंतराचा रस्ता करावा. सध्या दीड किलोमीटरचा अपवाद वगळता एकच रस्ता (सिंगल रोड) आहे. त्यावरून विमानतळाची वाहतूक करणे अशक्य आहे. सध्या तेलंगणा, आंध्रप्रदेश, पश्चिम महाराष्ट्रातून येणारी वाहने विमानतळासाठी तिलारी दोडामार्ग मार्गे मोपाला जात आहेत. त्यामुळे तिलारी घाटावर वाहनांचा प्रचंड ताण वाढला आहे. घाट सत्तर ते एwशी अंशांच्या चढावाचा आहे. त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक करणे अवघड होत आहे. बेळगाव ते चंदगड, जांबरे, कुंभवडे, तळकट मार्गे मोपा हा रस्ता चार पदरी झाल्यास या भागाच्या विकासाला मोठी गती येणार आहे. दळणवळण वाढवल्याने त्याचा फायदा चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल, राधानगरी आदी तालुक्यांनाही होणार आहे. शिवाय हुबळी, धारवाड, बेळगाव भागाच्या विकासालाही गती येणार आहे. बेळगावहून गोव्याला जोडणारा हा सर्वात जवळचा मार्ग ठरणार आहे. या रस्त्यामुळे चंदगड तालुक्याला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीनेही चंदगड तालुक्याची वेगवान वाटचाल होण्यास मदत होणार आहे.
कामांकडे केंद्र शासनाचे सातत्याने दुर्लक्ष
चंदगड तालुक्यात शिवकालीन चार किल्ले असून ऊस, नाचणा, भात, रताळी या पिकांबरोबरच काजूच्या बागा, यामुळे हा भाग समृद्ध होत असून त्याला पर्यटनाची जोड मिळाल्यास तो अधिकच समृद्ध होण्यास मदत होणार आहे. चंदगड ते मोपा विमानतळ हे अंतर केवळ 48 किलोमीटर असून चंदगड ते बेळगाव 42 कि.मी. अंतर आहे. हा 90 किलोमीटरचा रस्ता चार पदरी झाल्यास या मार्गावर वाहतूक वाढण्याबरोबरच शेतमालासह अन्य मालाची विमानतळाच्या दिशेने वाहतूक होऊन या भागातील निर्यात वाढण्यास मदत होणार आहे. शिवाय या रस्त्यात घाट लागत नाही. चौपदरीकरण थेट होत असल्याने तो रस्ता 80 ते 85 कि.मी.चा होईल. सीमाभागातील या रस्त्यांकडे केंद्र शासनाचे सातत्याने दुर्लक्ष झालेले असून बेळगाव ते मोपा, बेळगाव ते वेंगुर्ला, चंदगड ते मोरले, बेळगाव ते दोडामार्ग आदी रस्त्यांचे चार पदरी रस्त्यात रुपांतर होणे काळाची गरज असून याकडे केंद्र शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असून केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यांना निधी देवून पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील विकासाला गती द्यावी, अशी मागणी भारत लाईव्ह न्यूज मीडियाचे समूह प्रमुख सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी केली आहे.
असा होईल परिणाम अन् फायदा
सीमाभागातील प्रवाशांना मोपा विमानतळ जवळ
चंदगड, आजरा तालुक्यांचा पर्यटन विकास
चंदगड ते बांदा अंतर केवळ 51 कि. मी.
चंदगड ते बेळगाव अर्ध्या तासाचा प्रवास
कोल्हापूर-सांगली-बेळगाव जिल्ह्याला रस्ते कनेक्टीव्हिटी
बेळगावची भाजी गोव्याला, कोकणचा मासा कोल्हापूरला
शेतमाल परदेशी पाठविणे शक्य
रोजगाराच्या नवीन संधी होणार निर्माण