चार भाऊ…एक नातेवाईक अन् सात खून!

सुपारी घेऊन पाडले मुडदे; खून भासवले अपघाती मृत्यू : 3 ते 30 लाखाची खुनासाठी सुपारी, पोलिसांनी शिताफीने आवळल्या पाच जणांच्या मुसक्या  बेळगाव : बेळगाव, बागलकोट, विजापूर या तीन जिल्ह्यांत सुपारी घेऊन खून करणाऱ्या पाच जणांच्या एका टोळीला बागलकोट पोलिसांनी अटक केली आहे. याच टोळीने गेल्यावर्षी रायबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील मंटूर क्रॉसजवळ एका युवकाचा खून करून […]

चार भाऊ…एक नातेवाईक अन् सात खून!

सुपारी घेऊन पाडले मुडदे; खून भासवले अपघाती मृत्यू : 3 ते 30 लाखाची खुनासाठी सुपारी, पोलिसांनी शिताफीने आवळल्या पाच जणांच्या मुसक्या 
बेळगाव : बेळगाव, बागलकोट, विजापूर या तीन जिल्ह्यांत सुपारी घेऊन खून करणाऱ्या पाच जणांच्या एका टोळीला बागलकोट पोलिसांनी अटक केली आहे. याच टोळीने गेल्यावर्षी रायबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील मंटूर क्रॉसजवळ एका युवकाचा खून करून तो अपघात भासवण्याचा प्रयत्न केला होता. ‘दृश्यम’ चित्रपटाची प्रेरणा घेऊन पोलिसांना चकवण्यात पटाईत असलेल्या या टोळीतील गुन्हेगारांनी सुपारी घेऊन सात खून केल्याचे उघडकीस आले आहे. स्वत: बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकाश यांनी बागलकोट येथे पत्रकारांना यासंबंधीची माहिती दिली आहे. बागलकोटचे जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महांतेश्वर जिद्दी, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख प्रसन्न देसाई आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बागलकोट पोलिसांनी या खतरनाक टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
एखाद्या थरार चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशा पद्धतीने हे गुन्हेगार सुपारी घेऊन खून करीत होते. पोलिसांनीही तितक्याच शिताफीने त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अनेक गुन्हे करूनही हे गुन्हेगार सहजपणे पोलिसांच्या जाळ्यात अडकत नव्हते. पोलिसांना चकवण्यात त्यांचा हातखंडा होता. मात्र, तांत्रिकबाबींचा अवलंब करत पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या टोळीतील गुन्हेगार एकाच कुटुंबातील असून चौघा सख्ख्या भावांचा समावेश आहे. 3 लाख रुपयांपासून 30 लाख रुपयांपर्यंत सुपारी घेऊन या टोळीतील गुन्हेगार खून करीत होते. खासकरून जमीनवादात या गुन्हेगारांचा वापर अधिक होत होता. एखाद्याची जमीन हडप करण्यासाठी त्याचा काटा काढायचा असेल तर या गुन्हेगारांना सुपारी देण्यात येत होती. यांनी खून केलेल्या अनेकांपैकी काहीजणांची नैसर्गिक मृत्यू प्रकरण म्हणून नोंद झाली आहे. या सर्व जुन्या प्रकरणांचाही पोलिसांनी पर्दाफाश केला.
चार सख्ख्या भावांचा टोळीत सहभाग
बिराप्पा शट्ट्याप्पा बरगी (वय 33) रा. मुगळखोड, ता. मुधोळ, जि. बागलकोट, बसवराज कृष्णाप्पा मादर (वय 32), प्रकाश कृष्णाप्पा मादर (वय 28), मंजुनाथ कृष्णाप्पा मादर (वय 25), गणेश कृष्णाप्पा मादर (वय 22) चौघेही राहणार सोकनादगी, ता. जि. बागलकोट अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. सोकनादगी येथील कृष्णाप्पा मादर याच्या सहा मुलांपैकी चार मुलांना सुपारी खून प्रकरणात अटक झाली आहे. बिराप्पा हाही त्यांचा जवळचा नातेवाईकच आहे. 21 मे 2022 रोजी गोळसंगी, जि. विजापूर येथील यलगुर्दप्पा चलवादी (वय 40) हा युवक बेपत्ता झाला होता. तीन दिवसांनंतर कलादगी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील अनगवाडी पुलाजवळ घटप्रभा नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला होता. अनोळखीचा मृत्यू अशीच या प्रकरणाची नोंद झाली होती. खरेतर त्याचा खून झाला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बागलकोट पोलिसांनी या प्रकरणाचा फेरतपास केला असता यलगुर्दप्पाचा खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तब्बल सात सुपारी खुनांची कबुली गुन्हेगारांनी दिली.
गुन्हेगार सुपारी घेऊन खून करण्यात पटाईत…
14 ऑक्टोबर 2023 रोजी रायबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील मंटूर क्रॉसजवळ दोन मोटारसायकलींच्या अपघातात कल्लाप्पा रामाप्पा बळवाड (वय 35) रा. मुगळखोड, ता. मुधोळ या युवकाचा मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले होते. रायबागचे मंडल पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला यांनी अपघात प्रकरणाचा तपास हाती घेतला, त्यावेळी कल्लाप्पाचा मृत्यू अपघातात नसून त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी काही आरोपींच्या मुसक्याही आवळण्यात आल्या होत्या. याच टोळीतील गुन्हेगार सुपारी घेऊन खून करण्यात पटाईत असल्याचे उघडकीस आले आहे.
बेळगावात सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांकडून टोळीचा पर्दाफाश
या टोळीतील बसवराज मादर व गणेश मादर हे भाऊ सध्या हिंडलगा कारागृहात आहेत. बागलकोट पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरही अटकेची कारवाई केली आहे. मुगळखोड, ता. मुधोळ येथील महादेवी डांगी व सिद्धाप्पा डांगी यांच्यात जमीनवाद होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. महादेवीला कल्लाप्पा बळवाड मदत करीत होता. त्यामुळेच कल्लाप्पाचा काटा काढण्यासाठी सिद्धाप्पा डांगीने या टोळीतील गुन्हेगारांना सुपारी दिली होती. सुपारी घेऊन गुन्हेगारांनी कल्लाप्पा बळवाडला मुगळखोडहून मोटारसायकलवरून घेऊन आले. मुधोळ-निपाणी रोडवरील मंटूर क्रॉसला नेऊन त्याचा खून करण्यात आला. त्याच ठिकाणी बिर्याणी खाऊन दोन मोटारसायकलींच्या अपघातात कल्लाप्पाचा मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले होते. एकूण सात सुपारी खून प्रकरणे उघडकीस आली आहेत. बागलकोटचे जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी याआधी बेळगावात पोलीस उपायुक्त म्हणून सेवा बजावली आहे. तर अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महांतेश्वर जिद्दी यांनीही टिळकवाडी व चिकोडीचे पोलीस निरीक्षक, गुन्हे तपास विभागाचे एसीपी म्हणून सेवा बजावली आहे. बेळगावात सेवा बजावलेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांनी सुपारी खुन्यांच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.