Breaking : कोल्हापूरात ‘फॉरेक्स मार्केट’ घोटाळा; फॉरेक्स मार्केटच्या हाकेला अनेकांनी दिली ‘साद’

कोट्यावधी रूपयांचा घोटाळा; शेकडो नागरीकांनी लाखो रूपये गुंतवले मार्केटमध्ये; शेअर मार्केट, कमोडिटी मार्केट घोटाळ्यानंतर जनसामान्यांच्या पैशावर ‘फॉरेक्स’चा डल्ला कृष्णात चौगले कोल्हापूर गुंतवणूकदारांना भिकेकंगाल करणाऱ्या ए.एस.ट्रेडर्सच्या म्होरक्याच्या कोल्हापूर पोलीसांनी नुकत्याच मुसक्या आवळल्या असल्या तरी अद्याप अनेक मार्केटमधील घोटाळेबाज फरार आहेत. ‘कळंबा व्हाया चंदगड’ असे कनेक्शन असणाऱ्या एका फॉरेक्स मार्केटच्या ‘सागर’ने ‘साद’ घालून कोल्हापूर जिह्यातील शेकडो गुंतवणूकदारांना […]

Breaking : कोल्हापूरात ‘फॉरेक्स मार्केट’ घोटाळा; फॉरेक्स मार्केटच्या हाकेला अनेकांनी दिली ‘साद’

कोट्यावधी रूपयांचा घोटाळा; शेकडो नागरीकांनी लाखो रूपये गुंतवले मार्केटमध्ये; शेअर मार्केट, कमोडिटी मार्केट घोटाळ्यानंतर जनसामान्यांच्या पैशावर ‘फॉरेक्स’चा डल्ला

कृष्णात चौगले कोल्हापूर

गुंतवणूकदारांना भिकेकंगाल करणाऱ्या ए.एस.ट्रेडर्सच्या म्होरक्याच्या कोल्हापूर पोलीसांनी नुकत्याच मुसक्या आवळल्या असल्या तरी अद्याप अनेक मार्केटमधील घोटाळेबाज फरार आहेत. ‘कळंबा व्हाया चंदगड’ असे कनेक्शन असणाऱ्या एका फॉरेक्स मार्केटच्या ‘सागर’ने ‘साद’ घालून कोल्हापूर जिह्यातील शेकडो गुंतवणूकदारांना लाखो रूपयांना गंडा घातला असल्याचे समोर आले आहे. लाखो रूपयांची गुंतवणूक केलेल्या नागरीकांना हजार, दोन हजार रूपयांची रक्कम परत देऊन त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. पण गेल्या अनेक महिन्यांपासून ‘तोंड दाबून बुक्यांचा मार’ सहन करणारे गुंतवणूकदार आता पोलीसात जाण्याच्या तयारीत आहेत.
जिह्यात आजतागायत शेअर मार्केट, कमोडिटी मार्केटच्या घोटाळ्यामध्ये हजारो नागरीकांना कोट्यावधी रूपयांचा फटका बसला आहे. अल्पकालावधीत जास्त परतावा मिळवण्याच्या अपेक्षेने गुंतवलेली लाखो रूपयांची मुद्दलच परत मिळाली नसल्यामुळे अनेकांच्या आयुष्याची कमाई ‘मार्केट’च्या घशात गेली आहे. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात विविध ‘मार्केट’ कंपन्यांचा आधार घेत लोकांना कोट्यावधीचा गंडा घातला आहे. यामध्ये ए.एस.ट्रेडर्स, मेकर ग्रुप, शुभ ट्रेडर्स, गोल्ड लाईफ अशा प्रकारच्या बारा कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चुना लावला आहे. आगामी काळात आणखी काही ट्रेडर्सचे घोटाळे बाहेर पडणार आहेत.
पैसे दुप्पट होण्याच्या अपेक्षेने लोक पैसे गुंवण्यासाठी पुढे येतात. त्याचा गैरफायदा घेऊन लोकांना लुटले जात आहे. यासाठी बोगस कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल केली जात आहे. यामधील काही कंपन्यांविरेंधात पोलीसांत तक्रार दाखल झाली असली तरी जनसामान्यांची फसवणूक पेलेल्या अनेक ट्रेडर्स कंपन्यांविरोधात लवकरच गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. यामध्ये कंळबा-चंदगड कनेक्शन असलेल्या एका फॉरेक्स ट्रेडर्सच्या म्होरक्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी फसवणूक झालेले गुंतवणूदार एकत्र आले आहेत. त्यामुळे या विरोधात लवकरच स्थानिक गुन्हे अन्वेषक शाखेकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे.
फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात तक्रार दाखल करा
‘ए.एस.ट्रेडर्स’ प्रमाणेच जिह्यात आणखी काही शेअर, फॉरेक्स अथवा कमोडिटी मार्केट कंपन्यांकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असेल, त्यांनी न घाबरता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार दाखल करावी. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. महेंद्र पंडीत, जिल्हा पोलीस अधीक्षक