‘फ्लायओव्हर’ प्राधिकरणाकडून

केंद्रीय मंत्री गडकरी यांची घोषणा : जिल्ह्याला इथेनॉल हब बनविण्याचे आवाहन बेळगाव : देशभरात ग्रीन कॉरिडॉर महामार्गांचा विकास करण्याचा केंद्र सरकारचा महत्त्वाचा उद्देश आहे. देशातील प्रमुख शहरांना जोडणारे महामार्ग निर्माण करून कमी वेळेत नियोजित ठिकाण गाठण्यास सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महामार्ग हे देशाच्या विकासाचे राजमार्ग आहेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री […]

‘फ्लायओव्हर’ प्राधिकरणाकडून

केंद्रीय मंत्री गडकरी यांची घोषणा : जिल्ह्याला इथेनॉल हब बनविण्याचे आवाहन
बेळगाव : देशभरात ग्रीन कॉरिडॉर महामार्गांचा विकास करण्याचा केंद्र सरकारचा महत्त्वाचा उद्देश आहे. देशातील प्रमुख शहरांना जोडणारे महामार्ग निर्माण करून कमी वेळेत नियोजित ठिकाण गाठण्यास सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महामार्ग हे देशाच्या विकासाचे राजमार्ग आहेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. याबरोबरच बेळगाव शहरातील फ्लायओव्हर महामार्ग प्राधिकरणाकडून निर्माण करुन देण्याची घोषणा करत बेळगाव जिल्ह्याला इथेनॉल उत्पादनाचे हब बनविण्यात यावे, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले. येथील जिल्हा क्रीडांगणावर विविध विकासकामांचा शुभारंभ करून मंत्री गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी बेळगाव शहराभोवती निर्माण करण्यात येणाऱ्या 34 कि.मी. रिंगरोडच्या कामांचा व्हर्च्युअल शुभारंभ करण्याबरोबरच निर्माण करण्यात आलेल्या विविध रस्त्यांचे लोकार्पण करून नवीन विकासकामांचे उद्घाटन त्यांनी केले.
ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव रिंगरोड निर्माण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. दिवंगत केंद्रीय राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्यासह अनेक नेत्यांनी या रस्त्याचा प्रस्ताव ठेवला होता. ती घटीका आता आली आहे. राज्यामध्ये 8 हजार 200 कि.मी. राष्ट्रीय महामार्ग आहेत. राज्यामध्ये 3 लाख कोटी रुपये खर्च करुन विकास कामे हाती घेण्याचे उद्दिष्ट घेण्यात आले होते. त्यामधील अनेक कामे पूर्ण झाली असून तर अनेक कामांना चालना देण्यात आली आहे. रस्ते हे विकासाचे मार्ग आहेत. बेळगाव बायपास रस्त्यासाठी 3 हजार 400 कोटी निधी खर्च करण्यात येणार आहे. यामुळे बेळगाव-गोवामधील अंतर कमी होणार आहे. बेळगाव-रायचूर महत्त्वाचा कॉरिडॉर निर्माण करण्यात येणार आहे. 9 हजार कोटी खर्च करुन बेळगाव-हुनगुंद-रायचूर राष्ट्रीय महामार्ग काम हाती घेण्यात आले आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर साडेतीन तास वेळ वाचणार आहे. बेळगाव-संकेश्वर महामार्ग रुंदीकरण करण्यासाठी वन खात्याची परवानगी मिळाली नसल्याने काम प्रलंबित राहिले आहे. त्यामुळे राज्य सरकारने वन खात्याची परवानगी मिळवून रस्त्याच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे गडकरी यांनी सांगितले.
कश्मिर ते कन्याकुमार महामार्गाचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. या माध्यमातून प्रवासासाठी लागणारा वेळ व खर्च बचत होणार आहे. यामुळे अनेक राज्यांच्याविकासाला चालना मिळणार आहे. देशातील इतर राज्यांना जोडणारा हा महामार्ग विकासाचा मार्ग ठरणार आहे, असे ते म्हणाले. बेंगळूर शहराला वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे 17 हजार कोटी निधी खर्च करुन रिंगरोड निर्माण करण्यात येत आहे. यामुळे वाहतूक कोंडीवर मात करणे शक्य होणार आहे. जानेवारी 2025 पर्यंत हा रिंगरोड पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला. रस्त्यांच्या विकासामुळे कर्नाटक राज्याच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 17 योजनांचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यांची पाहणी करुन मंजुरीही देवू. सीआरएफ अंतर्गत 2 हजार कोटी विकास कामे मंजूर करण्यात आली असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले.
बेळगाव इथेनॉलचे हब व्हावे
बेळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. उसापासून इथेनॉल उत्पादनाला मोठी मदत मिळत आहे. पेट्रोल ऐवजी इथेनॉल वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. याबरोबरच इथेनॉल पंप उभारण्यासाठीही परवानगी देण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही मदत होणार असून प्रदुषण मुक्त पर्यावरण निर्माण करण्यास सहकार्य मिळणार आहे. बेळगावमध्ये इथेनॉल उत्पादनाला अधिक संधी आहे. यामुळे शेतकऱ्यांचा विकास होणार असून पर्यावरणाच्या दृष्टिनेही अधिक गरजेचे आहे. राज्य सरकारने याला प्रोत्साहन दिले पाहिजे. भविष्यामध्ये जगाला इथेनॉल निर्यात करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. इथेनॉल व मिथेनॉलवर चालणारी वाहने निर्माण करुन पर्यावरणाच्या रक्षणाबरोबरच शेतकऱ्यांच्या विकासाला सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले. यावेळी खासदार मंगला अंगडी, खासदार इरण्णा कडाडी यांची भाषणे झाली. जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी खासदार अण्णासाहेब जोल्ले, खासदार पी. सी. गद्दीगौडर, खासदार संगण्णा करडी, राजा आमरेश्वर नायक, आमदार विठ्ठल हलगेकर, नवी दिल्ली विशेष प्रतिनिधी आमदार प्रकाश हुक्केरी, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त एस. एन. सिध्दरामाप्पा, सीईओ राहुल शिंदे आदी उपस्थित होते.
रस्ता निर्मितीचे बादशहा
यावेळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टी व विकास कामांचे कौतुक करत ‘रस्ता निर्मितीचे बादशहा’ असे संबोधन केले. राज्यासह देशातील रस्त्यांचा विकास करण्यामध्ये मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा सहभाग आहे. त्यांच्या कार्यकाळात निर्माण करण्यात आलेले रस्ते देशाच्या विकासाला महत्वाचे कारण ठरले आहे. राज्यामधील रखडलेली विकास कामे मंत्री गडकरी यांच्या प्रयत्नांतून पुन्हा सुरू करुन कामांना चालना देण्यात आली आहे. कोणताच भेदभाव न ठेवता कामे करुन दिली आहेत. राज्यातील रस्त्यांच्या विकासाला मदत दिली आहे. देशभरात त्यांनी रस्त्यांची अनेक कामे पूर्ण केली आहेत, असे जिल्हापालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बेळगाव शहरातील फ्लायओव्हर, गोकाक फॉल्सचा विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. राज्यातील सर्व योजनांसाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन विकासाला चालना दिली आहे. भविष्यामध्ये अशाच प्रकारे सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा मंत्री जारकीहोळी यांनी व्यक्त केली.