हलात्री पुलावर पाच फूट पाणी

रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यात पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता. त्यामुळे मलप्रभा नदीसह इतर नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खानापूर-अनमोड रस्त्यावरील हलात्री नदीवरील पुलावर पाच फूट पाणी आल्याने पोलिसांनी हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. तालुक्यात मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ […]

हलात्री पुलावर पाच फूट पाणी

रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद
खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यात पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता. त्यामुळे मलप्रभा नदीसह इतर नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खानापूर-अनमोड रस्त्यावरील हलात्री नदीवरील पुलावर पाच फूट पाणी आल्याने पोलिसांनी हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. तालुक्यात मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तालुक्यातील अनेक लहान-मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क खानापूरशी तुटलेला आहे. खानापूर शहराजवळील अनमोड रस्त्यावरील हलात्री नदीवरील पुलावर पाच फूट पाणी आले असून पोलिसांनी याठिकाणी बॅरिकेड्स लावून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे या भागातील चाळीसगावचा संपर्क तुटलेला आहे. या भागातील लोक खानापूरला येण्यासाठी मणतुर्गा, असोगा रस्त्याचा वापर करत आहेत. त्यामुळे पाच किलोमीटरचा फेरा मारून खानापूरला येत आहेत. नुकताच जिल्हाधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी करून उंची वाढविण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत या पुलाची उंची वाढविण्याचे काम सुरू होणार आहे. तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर केल्याने मलप्रभासह इतर नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मलप्रभा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली असून खानापूर शहरातील घाटाजवळील बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे.