पहिली ते नववी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

11 मार्चपासून होणार प्रारंभ : मूल्यांकनसह इतर वर्गाच्या परीक्षाही एकाचवेळी बेळगाव : बारावी परीक्षेपाठोपाठ पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा येत्या 11 मार्चपासून घेतल्या जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने नुकतेच एक परिपत्रक काढून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे मूल्यांकन व इतर वर्गाच्या परीक्षाही एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने मूल्यांकन परीक्षा झाल्यानंतर इतर वर्गांच्या परीक्षा […]

पहिली ते नववी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

11 मार्चपासून होणार प्रारंभ : मूल्यांकनसह इतर वर्गाच्या परीक्षाही एकाचवेळी
बेळगाव : बारावी परीक्षेपाठोपाठ पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा येत्या 11 मार्चपासून घेतल्या जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने नुकतेच एक परिपत्रक काढून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे मूल्यांकन व इतर वर्गाच्या परीक्षाही एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने मूल्यांकन परीक्षा झाल्यानंतर इतर वर्गांच्या परीक्षा घेण्याचे यापूर्वी निश्चित केले होते. परंतु, गुरुवारी बजावलेल्या आदेशामध्ये परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यावर्षी पाचवी, आठवी व नववी या तीन वर्गांच्या मूल्यांकन परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दहावी, बारावी बोर्ड परीक्षांच्या धर्तीवर विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन परीक्षा घेतली जाणार आहे. इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, सहावी, सातवी या वर्गाच्या परीक्षा सोमवार दि. 11 पासून घेतल्या जाणार आहेत. शिक्षण विभागाने आदेश बजावल्याने शाळांमध्ये तयारी सुरू करण्यात आली आहे. केवळ आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिल्याने विद्यार्थ्यांकडून उजळणी करून घेतली जात आहे. तसेच प्रश्नपत्रिका निश्चित करण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे. या वर्गांच्या परीक्षा सकाळच्या सत्रात घेतल्या जाणार आहेत. दोन आठवड्यात पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा पूर्ण होणार असल्याने धूलिवंदनापूर्वीच विद्यार्थी परीक्षांच्या तणावातून मुक्त होणार आहेत. दहावी परीक्षेपूर्वी शालेय परीक्षा पूर्ण करण्याकडे शिक्षण विभागाचा कल असल्याने वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बोर्डच्या धर्तीवर मूल्यांकन परीक्षा
यावर्षी घेण्यात येणाऱ्या मूल्यांकन परीक्षेला सोमवार दि. 11 पासून सुरुवात होत आहे. दहावीच्या परीक्षेची भीती कमी करण्यासाठी पाचवी, आठवी व नववी अशा टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षा दुपारच्या सत्रात होणार आहेत. विभागातील एका केंद्रावर प्रश्नपत्रिका दिल्या जाणार असून तेथून मुख्याध्यापकांनी शाळेपर्यंत आणावयाच्या आहेत. बोर्ड परीक्षेच्या धर्तीवर पर्यवेक्षक इतर शाळांमधील असणार आहेत.