पहिली ते नववी परीक्षांचा तडकाफडकी निकाल जाहीर

शिक्षण विभागाकडून तारखेत बदल : शिक्षक-पालकांची धावपळ  बेळगाव : शालांत परीक्षांचे निकाल रविवार दि. 14 रोजी जाहीर करण्याचे निर्देश जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी चार दिवसांपूर्वी दिले होते. परंतु, रविवार दि. 7 रोजी शिक्षण विभागाने तातडीने या तारखेमध्ये बदल करत सोमवार दि. 8 रोजी पहिली ते नववी वर्गांचे निकाल जाहीर करण्याच्या सूचना शाळांना केल्या. त्यामुळे साप्ताहिक सुटी असतानाही […]

पहिली ते नववी परीक्षांचा तडकाफडकी निकाल जाहीर

शिक्षण विभागाकडून तारखेत बदल : शिक्षक-पालकांची धावपळ 
बेळगाव : शालांत परीक्षांचे निकाल रविवार दि. 14 रोजी जाहीर करण्याचे निर्देश जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी चार दिवसांपूर्वी दिले होते. परंतु, रविवार दि. 7 रोजी शिक्षण विभागाने तातडीने या तारखेमध्ये बदल करत सोमवार दि. 8 रोजी पहिली ते नववी वर्गांचे निकाल जाहीर करण्याच्या सूचना शाळांना केल्या. त्यामुळे साप्ताहिक सुटी असतानाही निकाल तयार करणे, तसेच पालकांना निकाल आहे, हे कळविण्याची कसरत शिक्षकांना करावी लागली. यावर्षी प्रथमच शालांत परीक्षांसोबत पाचवी, आठवी व नववी इयत्तांच्या मूल्यांकन परीक्षा घेण्यात आल्या. मूल्यांकन परीक्षांना मार्चपासून सुरुवातही झाली. परंतु, मूल्यांकन परीक्षा घेऊ नये, यासाठी काही पालक न्यायालयात गेल्याने परीक्षांना स्थगिती मिळाली. दीड आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर सोमवार दि. 25 मार्चपासून उर्वरित मूल्यांकन परीक्षा घेण्यात आली.
चार दिवसांपूर्वी बेळगाव विभागाचे जिल्हाशिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांनी एक पत्रक काढून रविवार दि. 14 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी पहिली ते नववीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, रविवारी दुपारी शिक्षण विभागाने या तारखेत अचानक बदल केला. निकाल देण्यास आठवडाभर कालावधी असल्याने मूल्यमापनाचे काम अर्धवट होते. अचानक तारखेत बदल केल्याने काही शिक्षकांनी दुपारनंतर शाळा उघडून निकालाचे काम पूर्ण केले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. याद्वारे सोमवार दि. 8 रोजी निकाल असल्याचे जाहीर करण्यात आले. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने पालकांनाही सोमवारी तारेवरची कसरत करत पाल्यांचा निकाल घेण्यास हजेरी लावावी लागली. सकाळी 10 वाजेपर्यंत निकाल देण्याचे काम पूर्ण करण्यात आले.