दहावीचा पहिला पेपर सुरळीत

रंगोत्सवामुळे विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकांची परीक्षा केंद्रांवर गर्दी बेळगाव : दहावीच्या परीक्षेला सोमवार दि. 25 पासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर पार पडला. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी मराठी पेपर दिला. शहर व उपनगरांमध्ये रंगोत्सव असल्याने विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालक परीक्षा केंद्रांवर दाखल झाले होते. यामुळे सकाळी 9.30 वाजल्यापासून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली […]

दहावीचा पहिला पेपर सुरळीत

रंगोत्सवामुळे विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकांची परीक्षा केंद्रांवर गर्दी
बेळगाव : दहावीच्या परीक्षेला सोमवार दि. 25 पासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर पार पडला. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी मराठी पेपर दिला. शहर व उपनगरांमध्ये रंगोत्सव असल्याने विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालक परीक्षा केंद्रांवर दाखल झाले होते. यामुळे सकाळी 9.30 वाजल्यापासून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती. बेळगाव जिल्ह्यामध्ये पहिला पेपर सुरळीतरित्या पार पडला. परीक्षेसाठी सार्वजनिक शिक्षण विभागाने मागील महिनाभरापासून तयारी केली होती. कॉपीला आळा घालण्यासाठी भरारी पथक, तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रांची संवेदनशील व अतिसंवेदनशील या प्रकारांमध्ये विभागणी केली आहे. त्यानुसार पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बेळगाव शहरासह तालुक्याच्या काही भागात सोमवारी रंगोत्सव असल्याने विद्यार्थी व पालकांची तारांबळ उडाली. काही संघटनांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत सोडण्याची व्यवस्थाही केली. परंतु, ग्रामीण तसेच उपनगरातील विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकांनाच परीक्षा केंद्रांपर्यंत यावे लागले. त्यामुळे सकाळी परीक्षा केंद्रांवर गर्दी झाली होती. हॉल तिकिटाची तपासणी करूनच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडले जात होते.
मध्यान्ह आहाराला संमिश्र प्रतिसाद
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शिक्षण विभागाने मध्यान्ह आहाराची व्यवस्था केली होती. सर्व सरकारी व अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला. परंतु, शहरी भागातील विद्यार्थ्यांनी मात्र मध्यान्ह आहार घेण्याकडे पाठ फिरविली. केंद्र प्रमुखांनी कळवूनदेखील परीक्षा केंद्रातून बाहेर जाणे विद्यार्थ्यांनी पसंत केले. त्यामुळे शहरी भागात सरकारच्या या उपक्रमाला तितकासा प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यातच सोमवारी सकाळी उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने परीक्षार्थींनाही याचा फटका बसला. त्यामुळे परीक्षा केंद्रांमध्ये पंख्याची व्यवस्था करण्याची मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे.
कॉपीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही-पोलीस बंदोबस्त
सोमवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भाषा विषयांचे पेपर झाले. संपूर्ण शैक्षणिक जिल्ह्यात सुरळीतपणे परीक्षा पार पडली. कॉपीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बेळगाव व उपनगरांमध्ये रंगोत्सव असला तरी सुरळीतरित्या सर्वत्र परीक्षा पार पडल्या.
– मोहनकुमार हंचाटे (जिल्हाशिक्षणाधिकारी)

292 विद्यार्थ्यांची परीक्षेला दांडी
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात प्रथम भाषा विषयाला एकूण 33,009 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 32,717 विद्यार्थी सोमवारी परीक्षेला हजर होते. तर 292 विद्यार्थ्यांनी पहिल्याच पेपरला दांडी मारली. बेळगाव शहरात 106, बेळगाव ग्रामीणमध्ये 70, खानापूर तालुक्यात 18 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. बेळगाव शहरात दांडी मारणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.
तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना गांधीलमाशांचा दंश : अर्धातास वाया गेल्याने विद्यार्थ्यांतून नाराजी
दहावीच्या परीक्षेला सोमवारी सुरुवात झाली असून पहिल्याच पेपरला तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना गांधीलमाशांनी दंश केल्याने गोंधळ उडाल्याची घटना घडली. यामुळे विद्यार्थ्यांचा जवळपास अर्धातास वाया गेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया पालकांसह विद्यार्थ्यांतून व्यक्त केली जात आहे. बेळगाव तालुक्याच्या उत्तर भागातील ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र निर्माण करण्यात आले आहे. त्यानुसार परिसरातील विविध शाळांचे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर हजर झाले होते. प्रथम भाषा मराठी पेपर सोमवारी सकाळी 10.30 वाजता सुरू करण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर गांधीलमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. माशांना हुसकावून लावण्यासाठी आग पेटवून धूर करण्यात आला. तर यामध्ये काही विद्यार्थ्यांना गांधीलमाशांनी दंश केला. या गोंधळामध्ये विद्यार्थ्यांचा पेपर लिहिण्याचा जवळपास अर्धातास वाया गेला आहे. ही बाब केंद्राच्या प्रमुखांना माहीत असतानाही विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र प्रमुखांनी यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे वेळ मागणे गरजेचे होते. मात्र तसे कोणतेच प्रयत्न करण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांचा अर्धातास वाया गेला असला तरी पेपर मात्र वेळेत घेण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केंद्राच्या प्रमुखांकडून यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे होते, असे मतही व्यक्त केले जात आहे.
परीक्षा केंद्र प्रमुखांनी घटनेची माहिती देणे आवश्यक होते
या घटनेची माहिती परीक्षा केंद्राच्या प्रमुखांनी देणे आवश्यक होते. यावरून दहा मिनिटे कालावधी वाढवून दिला असता. कायद्याप्रमाणे वेळ वाढवून देण्यास सोय नाही. मात्र, अशा अपरिहार्य घटनांच्यावेळी माहिती देणे गरजेचे आहे.
– दासप्पण्णावर, ग्रामीण गटशिक्षणाधिकारी