रंगपंचमी दिवशीच दहावीचा पहिला पेपर

विद्यार्थी-पालकांची उडणार तारांबळ बेळगाव : दहावीची परीक्षा अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपल्याने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची जोरदार तयारी सुरू आहे. परंतु यावर्षी रंगपंचमी दिवशीच दहावीचा पहिला पेपर असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यावर्षी शालेय शिक्षण विभागाच्यावतीने दि. 25 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. रविवार दि. 24 रोजी होळी साजरी […]

रंगपंचमी दिवशीच दहावीचा पहिला पेपर

विद्यार्थी-पालकांची उडणार तारांबळ
बेळगाव : दहावीची परीक्षा अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपल्याने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची जोरदार तयारी सुरू आहे. परंतु यावर्षी रंगपंचमी दिवशीच दहावीचा पहिला पेपर असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यावर्षी शालेय शिक्षण विभागाच्यावतीने दि. 25 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. रविवार दि. 24 रोजी होळी साजरी केली जाणार आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बेळगाव शहरासह उपनगरात रंगपंचमी साजरी केली जाते. त्यामुळे पहिल्याच पेपर दिवशी रंगपंचमी असल्याने विद्यार्थी व पालकांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. यावर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण 96 केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. 35 हजारहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार असल्याने शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर होणार आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा मराठी पेपर रंगपंचमी दिवशी होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच रंगपंचमीचा शहर व उपनगरांसह तालुक्यात उत्साह दिसून येतो. यामुळे रंगपंचमी साजरी करणाऱ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा विचार करणे गरजेचे आहे. वडगाव, शहापूर व ग्रामीण भागातील काही गावांमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी  रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. परंतु उर्वरित भागामध्ये सोमवार दि. 25 रोजी रंगपंचमी होणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांना धाकधूक लागली आहे. परीक्षा जवळ आल्याने उजळणीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.