सुहास्यवदन रामलल्लाचे प्रथम दर्शन!
मूर्तीची छायाचित्रे शुक्रवारी प्रसिद्ध : देशासह जगभरात ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्यासंबंधी उत्कंठा
वृत्तसंस्था / अयोध्या
अयोध्येतील रामजन्मभूमीच्या स्थानी निर्माण होत असलेल्या भव्य राममंदिराच्या गर्भगृहात गुरुवारी स्थापित करण्यात आलेल्या भगवान रामलल्लांच्या सुहास्यवदन आणि मनमोहक मूर्तीचे प्रथम दर्शन साऱ्यांना घडविण्यात आले आहे. शुक्रवारी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने या मूर्तीचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. भगवान रामलल्लांची ही मूर्ती दिसण्यास अद्भूत आहे, अशी रामभक्तांची प्रतिक्रिया आहे.
या मूर्तीचे सविस्तर वर्णनही आता ज्ञात झाले आहे. प्रथमदर्शनानेच भाविकांना मंत्रमुग्ध केलेली मूर्ती सुवर्णधनुष्यबाणधारी आहे. या मूर्तीमध्ये ॐकार, भगवान गणेश, शंख, चक्र, गदा, स्वस्तिक आणि भगवान हनुमानाच्या चिन्हाकृतीही आहेत. श्रद्धा आणि शास्त्र या दोन्हींचा सुरेख संगम या मूर्तीत आहे, असे प्रतिपादन अनेक तज्ञ आणि भाविकांनी केले आहे. भगवान रामलल्लांच्या मस्तकावरील ‘तिलक’ सनातन धर्माची विराटता आणि सामर्थ्य यांचे प्रतीक असून मूर्तीचे वदन शांत, सौम्य आणि प्रसन्न असून त्याकडे क्षणभर दृष्टीक्षेप केला तरी मनात भक्तीरस उचंबळून येतो, असा अनुभव अनेक भाविकांनी कथन केला आहे.
‘अरणीमंथना’तून अग्निनिर्मिती
शुक्रवारी या मूर्तीची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर, अनुष्ठानांच्या पुढील भागांना प्रारंभ करण्यात आला. सकाळी 9 वाजता ‘अरणीमंथन’ करून अग्नी निर्माण करण्यात आला. अग्नी प्रगट होताच चतुर्थदिनाच्या अनुष्ठानांना प्रारंभ करण्यात आला. मंडपात यज्ञ आणि होमहवनाच्या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. वेदज्ञानी आचार्यांनी यज्ञात आहुती अर्पण करून मंत्रोच्चारांचा घोष केला. श्रीगणपती आणि अन्य देवतांचे पूजन करण्यात आले. पूजनाच्या प्रक्रियेतच द्वारपालांकडून वेदांच्या सर्व शाखांचे पठण, देवप्रबोधन, औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास, कुंडपूजन आणि पंचभूसंस्कार आदी धार्मिक विधी झाले आहेत.
वेदपठण 21 जानेवारीला
‘प्राणप्रतिष्ठा’ कार्यक्रमाच्या आधीच्या दिवशी राममंदिरात चारही वेदांचे पठण पूर्ण केले जाणार आहे. हे वेदपठणाचे अनुष्ठान गुरुवारपासून केले जात आहे. मंदिराचे तोरण, द्वार, ध्वज, आयुध, पताका, दिक्पाल आणि द्वारपाल यांची पूजा करण्यात आली आहे. वेदपठण पूर्ण झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठापूर्व बव्हंशी सर्व आश्वासने पूर्ण होणार आहेत. 22 जानेवारीला दुपारी 12.20 ते 1.00 या काळात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होईल. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असतील. सहस्रावधी आमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त योग्यच !
‘प्राणप्रतिष्ठे’साठी निर्धारित करण्यात आलेला दिवस आणि मुहूर्त योग्यच आहे, असे प्रतिपादन मुहूर्त निर्धारित करणारे रामभद्राचार्य यांनी केले आहे. ज्या ‘अभिजित’ मुहूर्तावर हा सोहळा होणार आहे, तो संपूर्णत: धर्मशास्त्राप्रमाणे निर्धारित करण्यात आला आहे. हिंदू धर्मशास्त्राचा आपला सखोल अभ्यास असून निर्धारित मुहूर्ताविषयी आपण ठाम आहोत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्राणप्रतिष्ठा’ समारंभाचे प्रमुख यजमानपद स्वीकारणे, हे धर्मशास्त्राप्रमाणेच आहे. या कार्यक्रमाच्या आधी 11 दिवस ते कठोर अनुष्ठान आणि व्रतस्थ जीवन व्यतीत करीत आहेत. केवळ नारळाचे पाणी आणि दूध प्राशन करीत आहेत. ‘प्राणप्रतिष्ठा’ करण्यास ते पूर्णत: योग्य आहेत, असेही स्पष्ट प्रतिपादन रामभद्राचार्य यांनी केले आहे.
कर्नाटकमधील योगिराज यांच्या मूर्तीला मानाचे स्थान
कर्नाटकचे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगिराज यांच्याच राममूर्तीची निवड प्राणप्रतिष्ठेसाठी करण्यात आली आहे. योगिराज यांनी तयार केलेली मूर्ती कृष्णपाषाणातील आहे, अशी माहिती चंपत राय यांनी दिली आहे. गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा होणारी ही मूर्ती 5 वर्षे वयाच्या बालस्वरुप रामाची आहे. या मूर्तीचे वजन साधारणत: 150 ते 200 किलोग्रॅम इतके आहे. भगवान रामलल्ला यांची जी विद्यमान मूर्ती आहे, तीही अरुण योगिराज यांनी निर्माण केलेल्या या मूर्तीसमवेत गर्भगृहातच स्थानापन्न केली जाणार आहे.
मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे चोख नियोजन
प्राणप्रतिष्ठापूर्व अनुष्ठानाच्या कार्यक्रमासाठी देशभरातून 121 आचार्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ते सर्व उपस्थित राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठासमयी गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महंत नृत्यगोपालदास महाराज असे पाचजण उपस्थित असतील. तसेच हिंदूंच्या 150 हून अधिक परंपरांमधील साधूसंत, 50 हून अधिक जनजाती आणि वनवासी परंपरांमधील संत यांची उपस्थितीही मंदिर परिसरात वेगवेगळ्या पूजास्थानी असेल. प्राणप्रतिष्ठा समारोहाच्या आधी सकाळी 10 वाजल्यापासून प्राणप्रतिष्ठा मुहूर्तापर्यंत मंगलध्वनीचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भारतातील विविध राज्यांमधील प्रमुख 25 वाद्ये आणि दुर्लभ वाद्यांचा समावेश करण्यात आला आहे.
अनेक राज्यांमध्ये सुटी
भारतीय जनता पक्षाचे शासन असणाऱ्या किंवा तो पक्ष सत्तेत सहभागी असणाऱ्या राज्यांमध्ये 22 जानेवारीला सुटी दिली जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सरकारांनी सार्वजनिक सुटी घोषित केली आहे. तसेच उत्तराखंड सरकारने राज्य कर्मचाऱ्यांसाठी अर्धा दिवस (दुपारी 2.30 पर्यंत) सुटी घोषित केली आहे. कर्नाटकातही सुटी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मंत्रमुग्ध करणारे प्रथम मूर्तीदर्शन !
ड भगवान रामलल्लांच्या मूर्तीच्या प्रथम दर्शनाने भारावून गेले रामभक्त
ड अयोध्येतील राममंदिरात वेदपठणास प्रारंभ, 21 जानेवारीपर्यंत पठण
ड प्रभू रामचंद्रांच्या जुन्या मूर्तीचीही स्थापना गर्भगृहातच केली जाणार
ड ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्यासंदर्भात न्यासाने प्रसिद्ध केला मुख्य घटनाक्रम
Home महत्वाची बातमी सुहास्यवदन रामलल्लाचे प्रथम दर्शन!
सुहास्यवदन रामलल्लाचे प्रथम दर्शन!
मूर्तीची छायाचित्रे शुक्रवारी प्रसिद्ध : देशासह जगभरात ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्यासंबंधी उत्कंठा वृत्तसंस्था / अयोध्या अयोध्येतील रामजन्मभूमीच्या स्थानी निर्माण होत असलेल्या भव्य राममंदिराच्या गर्भगृहात गुरुवारी स्थापित करण्यात आलेल्या भगवान रामलल्लांच्या सुहास्यवदन आणि मनमोहक मूर्तीचे प्रथम दर्शन साऱ्यांना घडविण्यात आले आहे. शुक्रवारी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने या मूर्तीचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. भगवान रामलल्लांची ही मूर्ती दिसण्यास अद्भूत […]