दहावी निकाल खुंटण्यामागची कारणे शोधा

सीईओ राहुल शिंदे यांची बेळगाव-चिकोडी शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना : प्रत्येक महिन्यात पालक मेळावा सक्तीने घ्या बेळगाव : बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यांमध्ये दहावी परीक्षेचा निकाल खुंटला आहे. निकाल कमी लागण्यामागचे कारण शोधून सुधारणा करण्यात यावी. यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. मुलांना शिक्षणामध्ये गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत व उत्तम निकाल द्यावा, अशी सूचना जिल्हा पंचायत कार्यकारी […]

दहावी निकाल खुंटण्यामागची कारणे शोधा

सीईओ राहुल शिंदे यांची बेळगाव-चिकोडी शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना : प्रत्येक महिन्यात पालक मेळावा सक्तीने घ्या
बेळगाव : बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यांमध्ये दहावी परीक्षेचा निकाल खुंटला आहे. निकाल कमी लागण्यामागचे कारण शोधून सुधारणा करण्यात यावी. यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. मुलांना शिक्षणामध्ये गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत व उत्तम निकाल द्यावा, अशी सूचना जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली. जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये गुरुवारी बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील शिक्षण खात्याचा आढावा घेऊन ते बोलत होते. शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी मुलांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रारंभी टप्प्यातच पालक-शिक्षक (पीटीए) बैठक घेण्यात यावी. मुलांमध्ये परीक्षेबाबत असलेला गोंधळ व भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. अनुदानित आणि विनाअनुदानित, तसेच सरकारी शाळांच्या मुख्य शिक्षकांनी एकत्रित येवून बैठक घेऊन त्रुटी दूर करण्यावर प्रयत्न करावेत. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी विशेष दखल घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
शिक्षक आणि मुलांच्या हजेरीकडे विशेष लक्ष देण्यात यावे. 100 टक्के हजेरी रहावी यासाठी अधिक प्रयत्न करण्यात यावेत. जिल्ह्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेच्या वेळेमध्ये कोणतीही बैठक घेऊ नये. तसेच इतर कामांसाठीही शाळेतून बाहेर जावू नये. प्रत्येक महिन्याला डीडीपीआय आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सकाळच्यावेळी प्रत्येक शाळेला भेट देऊन पाहणी करावी. प्रत्येक महिन्यात पालक मेळावा सक्तीने घ्यावा. मुलांमधील त्रुटींबाबत चर्चा करावी. अतिथी शिक्षकांकडेही शिक्षकांप्रमाणेच पाहण्यात यावे. त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन शिक्षणाचा दर्जा सुधारावा. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या समस्या व मागण्या जाणून घेण्यासाठी शिक्षण अदालत घेण्यासाठी कार्यवाही करावी, अशी सूचना राहुल शिंदे यांनी केली. यावेळी चिकोडी, बेळगाव शिक्षण खात्याचे उपनिर्देशक मोहनकुमार हंचाटे, डीडीपीआय बी. एम. नलतवाड, जिल्हा योजना समन्वय अधिकारी बी. एच. मिल्लानट्टी, बेळगाव आणि चिकोडी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शाळांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या
गरज असलेल्या ठिकाणी शाळेसाठी नवीन खोली, दुरुस्ती, शौचालयांची दुरुस्ती यासंदर्भातील कृती योजना तयार करून जिल्हा पंचायत कार्यालयाला द्यावी. शाळांच्या दुरुस्तीकडे विशेष लक्ष देण्याची सूचनाही अधिकाऱ्यांना केली.